भोसले घराण्याच्या संस्थानचा दिवाण एक ज्यू व्यक्ती होती हे तुम्हाला माहित आहे का..?

मुरुड-जंजिरा घराण्याचे स्टेट कारभारी म्हणून काम पाहणाऱ्या शलोम बापूजी इस्राएल वारघरकर यांचे ते सुपुत्र म्हणजे,

हायिम शालोम. 

आत्ता तुम्ही म्हणालं हे काय नाव झालं का? तर भावांनो ते धर्माने ज्यू होते पण कर्तृत्वाने अस्सल महाराष्ट्रीयन होते.

मुंबई प्रांत आणि हैद्राबाद संस्थानात दुवा असणाऱ्या अक्कलकोटच्या भोसले घराण्यात मराठा सरदारांचं प्राबल्य होतं. घराण्यातील पाचवे राजा दुसरा शहाजी ( १८२८-१८५७) यांचा काळ धामधुमीचा होता. ते अल्पवयीन असल्याने या संस्थानचा कारभार साताऱ्याचे राजे प्रतापसिंह पहात असत. इथल्या भागात अनेक सरदार घराणी पसरलेली होती त्यामुळं इथं अराजक मोजण्याचा सतत धोका असे.

१८३० मध्ये बोरगावच्या शंकरराव सरदेशमुखाच्या नेतृत्वाखाली रयतेने बंड केले. रयतेच्या प्रतापसिंहाविरुद्धच्या तक्रारी रास्त असल्याचा निर्णय घेऊन इंग्रजांनी संस्थानचा कारभार प्रतापसिंहाकडून काढून इंग्रज रीजंटाकडे सोपविला.

१८४८ साली साताऱ्याचे राज्य खालसा झाले आणि अक्कलकोटकर ब्रिटिशांचे मांडलिक बनले. पण गादीची परंपरा पुढे चालू राहिली.

इथल्या गादीसाठी १८९६ मध्ये कॅप्टन फत्तेसिंहराव राजे भोसले तिसरे यांची निवड झाली.

बाबासाहेब शाहजीराजे भोसले तिसरे यांनी फत्तेसिंहराव याना दत्तक घेतलं होतं. मात्र ते पहिले शाहजीराजे बाळासाहेब यांच्या थेट वंशपरंपरेतले होते. त्यांना “फत्तेसिंहराव तिसरे शहाजी राजे भोसले” असं नाव देण्यात आलं.

१८९६ साली त्यांच्याकडे अक्कलकोटच्या गाडीचा राज्यकारभार सोपवण्यात आला. त्यांचा जन्म कुर्ल्यात २४ ऑगस्ट १८९४ मध्ये झाला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यामुळे ते वयात येईपर्यंत त्यांच्या आईने (दत्तकविधान केलेल्या) टग्यांच्या नावाने राज्यकारभार हाकला.

वयाच्या बाविसाव्या वर्षी २० ऑगस्ट १९१६ रोजी त्यांनी राजकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. अक्कलकोटच्या राजवाड्यातून संस्थानाचा सर्व कारभार पाहण्यास सुरुवात झाली.

कॅप्टन फत्तेसिंहराव राजे भोसले तिसरे म्हणून ते प्रसिद्ध झाले.

राजा म्हणून त्यांचे प्रजेवर आणि इंग्रज दरबारी दोन्हीकडं वजन होतं. आपल्या संस्थानासाठी त्यांनी उत्तम राज्यकारभाराची जाण असणाऱ्या दिवाणाची शोधाशोध केली.

त्यावेळी त्यांचा हायिम यांच्याशी परिचय झाला. हायीम यांनीही मराठा सल्तनतीची जबाबदारी चोखपणे पार पाडली. ब्रिटिशांना या मोक्याच्या संस्थानांवर आपलं अधिपत्य ठेवण्यासाठी कार्यक्षम माणूस हवा होता.

त्यामुळं हायीम शलोम इस्राएल यांना पाचारण करण्यात आलं.

शलोम यांच्या मुलाचं हाईम हे नाव औंध संस्थानाच्या कारभारी जेकब बापूजी यांच्या आजीने (आईची आई) ठेवलं होतं. त्यांना आपल्या नातवाचं नामकरण करण्याचं भाग्य मिळालं हे जेकब यांनी लिहून ठेवलं आहे.

त्यांचं शालेय शिक्षण पुण्यात झालं होतं. सेंट व्हिन्सेंट हायस्कुलमधून १९०४ साली ऊत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सनदी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बहुसंख्य सोबती हे एकतर ब्रिटिश किंवा स्कॉटिश अधिकाऱ्यांची मुलं होती किंवा मग पारशी घराण्यातील श्रीमंत लोक. त्यामुळे त्यांची पोहोच इंग्रज दरबारी वरपर्यंत होती.

कॅप्टन फत्तेसिंहराव राजे भोसले यांची दिल्लीदरबारी बरीच कामे असत. आपले शिक्षणही राजकोट आणि डेहराडूनला झाल्याने त्यांचा दिल्लीत राबता असे. कोल्हापूरच्या पहिल्या इन्फन्ट्रीमध्ये १९१० पासून त्यांना सेकंड लेफ़्टनंट म्हणून मान दिला गेला होता. त्यामुळे सैनिकी बाबतीतही त्यांचा ओढा होता. त्यामुळं कारभारी म्हणून संस्थानाची जबाबदारी हायीम शालोम यांच्यावरच होती.

त्यांच्या कार्यकाळात संस्थानाचा कारभार सुव्यवस्थित राहिला. बंडाची सर्व निशाणे पुसून टाकली गेली आणि राज्यकारभारात पुन्हा अक्कलकोटच्या गादीचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. यामागे हायिम शालोम इस्राएल यांचीही भूमिका होती.

ब्रिटिशांनी त्यांच्या या कामासाठी त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा राजा जॉर्ज पाचवा याच्या ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.

पुढील काळात त्यांची पूर्व खान्देश भागाचे मामलेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुण्यात असिस्टंट कमिश्नर म्हणून १९३१ च्या दरम्यान त्यांनी काम केलं होतं. आपले वडिल शालोम बाप्पूजी इस्राएल वारघरकर यांच्या प्रमाणेच हायिम यांचा आपल्या धर्मातील लोकांच्या मनावर प्रभाव होता.

त्यांना ज्यू समाजात मनाचे स्थान होते.

हायिम यांचा मुलगा जोसेफ हायिम यांनी त्यांनतर ब्रिटिश सैन्यात प्रवेश केला. नंतर त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि देशातील विविध सीमांवर आपल्या प्राणाची बाजी लावली.

जेकब बापूजी इस्राएल यांचा मुलगा बेंजामिन यांनीही १९२९ साली ब्रिटिश सरकारकडे नोकरी केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय खात्यात त्यांनी १९५९ पर्यंत काम केले. एकीकडे १९४७ साली इस्राएल तयार झाल्यानंतर भारतातील बहुतांश ज्यू कुटुंबे तिकडे परत गेली.

मात्र शालोम बाप्पूजी इस्राएल वारघरकर कुटुंबातील अनेक घराणी येथेच राहिली. मेजर जोसेफ इस्राएल हे त्यापैकीच एक होते. नावातील वारघरकर काळाच्या ओघात गळून गेलं; यानंतरही त्यांचा महाराष्ट्रावरील स्नेह कमी झाला नाही.

आजही तेथील ३०,००० हुन जास्त ज्यू नागरिक मराठी भाषाच बोलतात.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.