शिवरायांच्या स्वराज्यासाठी इस्त्रायलवरून आलेल्या ज्यू लोकांनी देखील रक्त सांडलय..

करुथा ज्यूथन म्हणजे ‘काळा ज्यू माणूस’ हा पिच्चर बघितल्यापासून कसनुसं झालं होतं. केरळमध्ये एक काळा ज्यू माणूस राहतो, तो भारतभर फिरतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यू माणसांचा सगळा इतिहास शोधतो आणि शेवटी काही मुस्लिम टोळ्यांच्या हातून मरतो.

एव्हाना आता जगभर मुस्लिम आणि ज्यू यांच्यातलं वैर जगजाहीर आहे.

पण त्यातला हिरो सलीम कुमार मध्येच महाराष्ट्रातील मराठी ज्यू लोकांचाही उल्लेख करतो.

शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला आपलंस करत अगदी स्वराज्यातही योगदान दिल्याचं समजतं.

महाराष्ट्र आणि ज्यू यांचं नातं इतकं अभेद्य आहे की २,००० वर्षांहून जास्त काळ लोटला आणि देशांच्या सीमा बदलल्या तरीही तो कमी झालेला नाही.

मराठा सल्तनतीच्या इतिहासात ज्यू धर्मियांचे मोलाचं योगदान आहे.

आज जगभर ज्यू आणि मुस्लिम यांच्यातून विस्तव जात नसला तरी कोकणात अजूनही ही दोन्ही लोकं एकदिलाने राहत आहेत. मराठी माणूस म्हणून एकमेकांचा धर्म ना बघता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रधर्म पाळणारी ही माणसं एकमेकांशी एकरूप झाली आहेत.

अरब आणि ज्यू लोकांमध्ये एवढं वाकडं आहे की इस्राएल आणि अरब देशातल्या राज्यकर्त्यांना हि डोकेदुखी संपता संपत नाही. आणि दुसरीकडे महाराष्ट्रात इतिहासापासून या दोन्ही जमाती एकदिलाने राहत आहेत. एवढंच नाही तर इथल्या कित्येक गडांवरचे कारभारी आणि दिवाण म्हणून चक्क ज्यू लोक होते.

ज्यू लोकांच्या धार्मिक समजुतीनुसार असिरियन लोकांनी इस्राएल जिंकून घेतल्यानंतर ते राज्य सोडून १२ टोळ्या वेगवेगळ्या दिशेनं गेल्या. त्यातल्या दहा टोळ्या हरवल्या होत्या. यातील एक टोळी काश्मीर, एक केरळला गेली असं मानलं जातं.

त्यांच्या मागोमाग असणारी एक टोळी कोकणात येऊन स्थिरावली. या टोळीचा इतर सर्व टोळ्यांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांनी कोकणातच वसण्याचा निर्णय घेतला. हि घटना इसवी सन पूर्व 175 च्या सुमारास घडण्याचं सांगितलं जातं.

म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यू माणसांचा इतिहास हा जवळपास २००० वर्षे मागे जातो.

अब्राहम बेन यिजू या ट्युनिश्यामधून भारतात व्यापार करणाऱ्या आणि ११३२ ते ११४९ अशी सतरा वर्षे भारतात राहिलेल्या माणसाने या कोकणातल्या ज्यू लोकांविषयी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

कोकणातील ज्यू लोक व्यापारात आणि विविध राजांच्या पदरी निरनिराळी कामे करण्यात वाकबगार असल्याचं त्यानं लिहून ठेवलं आहे. त्यांच्या नौकांना नौखुद म्हणण्यात येई. हे लोक त्यामुळेच नौकायनात आणि समुद्रात दूरवर जाण्यात पारंगत होते.

मदमून हसन या एका ज्यू व्यापाऱ्याने तर येमेनमधील एडन शहर आणि श्रीलंका असा प्रवासी आणि मालाचा व्यापार चालू केल्याचं बेन यिजू यानं लिहून ठेवलं आहे. माहरुज या त्याच्या मेव्हण्याने बेन यिजूला काही मदत लागल्यास, “माझ्या एका नौखुदा चालवणाऱ्या मित्राकडून सोनं घे” असा सल्ला दिला आहे.

आलेले काही ज्यू लोक तेलाच्या व्यवसायातही गुंतले होते. या लोकांना तिथं ‘शनवार तेली’ म्हणून ओळखले जात असे. शर्ली बेरी आयसनबर्ग यांच्या म्हणण्यानुसार हे लोक शनिवारी सुट्टी घेत असत आणि हिंदू तेली सोमवारी सुट्टी घेत असत. त्यामुळं त्यांना हे नाव मिळालं.

एव्हाना हे ज्यू मराठी संस्कृतीशी मिसळले होते. ते मराठी भाषाच बोलत आणि त्यांच्या स्त्रियाही मराठी पेहराव करत. त्यांना आपली “शेमा इस्राएल” प्रार्थना लक्षात होती.

अनेक मराठा सरदारांनी ज्यू व्यापाऱ्यांना सनदा दिल्या होत्या.

अठराव्या शतकात अनेक कागदपत्रांमध्ये याच्या नोंदी आढळतात. कोकणच्या पेण भागातील काही ठिकाणी याचे उल्लेखही कोरलेले आहेत.

हिंदू आणि हिब्रू लोकांचे संबंध असेच वृद्धांगत झालेले आढळतात. गांधीवादी ज्यू संशोधक योहानन बेन डेव्हिड यांनी आपल्या लेखनात शिवाजी महाराजांना ज्यू लोकांसंबंधी कळवळ होती असा निष्कर्ष काढला आहे.

ते आपल्या “द ज्यूज ऑफ इंडिया” या पुस्तकात म्हणतात..

बेने इस्राएल अथात भारतातील ज्यू समुदायाला औरंगजेबाच्या दुटप्पी धोरणांचा हिंदूंइतकाच त्रास होत होता. पुण्याच्या कसबा भागात राहणारे ज्यू नागरिक अजूनही शिवाजी महाराजांबद्दल आत्मीयतेने बोलतात. इतका आदर ते इतर कोणत्याही राजाला देत नाहीत.

इस्राएल देशात गेलेल्या अनेक परिवारांनी आपल्याला पूर्वजांना मराठ्यांकडून स्वराज्याच्या रक्षणासाठी भेट म्हणून दिलेल्या अनेक तलवारी जपून ठेवल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या आरमारात मुस्लिमांबरोबर ज्यू लोकांचाही भरणा असला पाहिजे. स्वराज्याचा वारसा म्हणून त्यांनी या तलवारी जपून ठेवल्या आहेत”

आपल्या औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी ज्यू लोकांचा उल्लेख केला असल्याचेही त्यांनी लिहिलं आहे. इतकेच नाही तर ज्यू लोक शिवरायांच्या गुप्तचर विभागात काम करत असत आणि रायगडाच्या रक्षणातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्यू आणि इस्लाम हे दोन्ही अब्राहमपासून आलेले धर्म असल्याने ज्यू नागरिकांना मुस्लिम म्हणून वावरता येणे शक्य होते. त्यामुळेच रायगडाशी निष्ठा असणाऱ्या या बेने इस्राएल लोकांसाठीच शिवाजी महाराजांनी आवाज उठवला असे डेव्हिड म्हणतात.

हायीम सॅम्युएल किहिमकरांचा संदर्भ देऊन डेव्हिड सांगतात की,

“चुर्रिकर बेने इस्राएल हे आंग्रेच्या आरमारात नाईक म्हणून होते. त्यांनी स्वराज्यात आरमाराची केलेली सेवा म्हणून त्यांना इनामात जमीन आणि सरनद म्हणजेच सनद मिळाली होती.”

एक बेने इस्राएल इलोजी हे मोठे कवी होते. 

तेही आंग्रेंच्या सोबत मराठ्यांसाठी आर्थिक मुद्द्यांवर आणि परराज्य धोरणावर सल्ला-मसलत करत असत. इंडो-ज्युडाइक स्टडीज या आपल्या संशोधनात त्यांनी ही माहिती दिली आहे.

या चुर्रिकर बेने इस्राएल याना चारीकर म्हणूनही ओळखले जायचे. या घराण्याची स्थापना कुणी केली हे नक्की ठाऊक नसले तरी एक धार्मिक म्हणून (ऍरॉन) याच्या मूळ पुरुषाला कान्होजी आंग्रेच्या आरमारात नाईक म्हणून ठेवले होते.

१७ व्या शतकात नाईक म्हणून ज्यू लोकांनी स्वराज्याची सेवा केली.

त्यांचे नौकायन एवढे कुशल होते कि खुश होऊन आरमार प्रमुखांनी त्यांना मोठमोठे इनाम दिले. अजूनही त्यांच्या वंशजांकडे या जमिनीचा ताबा आहे. आरमारातल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या चुर्रिकर घराण्याकडे सोपवल्या जात असत.

आपल्या लेखनात डेव्हिड म्हणतात की ज्यू लोकांनी मराठी संस्कृती इतकी आत्मसात केली होती कि आपल्या हिब्रू नावांनीही त्यांनी मराठी भाषेचे वळण दिले होते.

एलिजाह हे नाव बदलून इलोजी असे करण्यात आले होते. तर सॅम्युएलचे समाजी आणि आयझॅकचे नाव इसाजी असे केले होते. आयझॅक संकर यांनी शिवाजी महाराजांच्या काळात राहणाऱ्या व स्वराज्याला मदत करणाऱ्या ज्यू लोकांवर संशोधन केले आहे. 

एच.एस.खेहिमकर यांनीही आपल्या संशोधनात कोकणातील ज्यू लोकांच्या विषयी माहिती सांगितली आहे. 

जंजिऱ्याच्या संस्थानाजवळ त्यांचे मुळगाव नौगाव येत असल्यानं सिद्दीच्या सैन्यातही ज्यू सरदारांचा आणि लोकांचा भरणा होता. जंजिरा संस्थानात असलेल्या साडेतीन तालुक्यांमध्ये अनेक जागी ज्यू सिनेगॉग आढळतात. यांना स्थानिक ज्यू लोकही सिनेगॉग न म्हणता मशिदी म्हणत असत.

या घराण्यातील लोकांनी पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात मोठं योगदान दिलं. आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अठरापगड जातींचा मोठा उल्लेख केला जातो. पण त्यामध्ये ज्यू व्यक्तींचेही योगदान होते ही बाब हिंदवी स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सगळ्या रयतेचं राज्य होतं ही गोष्ट अधोरेखित करते.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.