इरफानला तो म्हणाला,” भाई रुक, पहले तुम्हे नॅशनल अवॉर्ड दिला देता हूं , फिर चले जाना “

प्रसिद्ध स्टोरीटेलर निलेश मिश्रा यांचा यू ट्यूब वर शो आहे. ‘द स्लो इंटरव्ह्यू’ या नावाचा. या शो मध्ये त्यांनी आजवर अनेक नामवंत लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यातील एका भागात त्यांनी तिग्मांशू धूलिया यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये निलेश मिश्रांनी इरफान बद्दल तिग्मांशू ला बोलतं केलं. संपूर्ण मुलाखतीमध्ये इतर प्रश्नांना मनमोकळी उत्तरं देणारे तिग्मांशू या प्रश्नाला मात्र थांबले. त्यांनी थोडा वेळ घेतला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं.

आणि त्यांनी गहिवरल्या डोळ्यांनी इरफान विषयी भावना व्यक्त केल्या. त्यावेळी इरफान कॅन्सरशी लढा देत होता. तिग्मांशू च्या डोळ्यातील पाणी.. त्याची आणि इरफान ची किती गाढ मैत्री आहे हेच दर्शवत होतं.

१९८४ साली इरफान ने NSD जॉईन केलं. इरफान नंतरच्या बॅच ला तिग्मांशू सुद्धा NSD मध्ये दाखल झाला. इरफान तिग्मांशू ला सिनियर होता. इरफान ने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,

“तिग्मांशू माझा ज्युनियर असल्याने मी त्याची शक्यतो रॅगिंग सुद्धा केली होती.”

परंतु तिग्मांशू आणि इरफान मित्र म्हणून एकत्र आले. आणि त्यांच्यात पक्की मैत्री झाली. NSD च्या कालखंडात दोघे दिल्लीला एकत्र राहत होते. त्यामुळे एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ ते घालवायचे. त्यामुळे मैत्री आणखी घट्ट झाली.

NSD मधून तिग्मांशू आणि इरफान दोघेही पास आऊट झाले. इरफान हा कॉलेजच्या काळापासून काहीसा वेगळाच आणि मनस्वी माणूस. कामाच्या शोधात इरफान जिकडे तिकडे धक्के खाऊ लागला. पण गोष्टी जुळून येत नव्हत्या. अपेक्षित काम मिळत नव्हतं.

एके दिवशी इरफान आणि तिग्मांशू भाजी खरेदी करून रूमवर आले. तेव्हा इरफान ने जिवलग दोस्ता समोर मन मोकळं केलं. कामं मिळत नसल्याने इरफान वैतागला होता. त्याने पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. हे ऐकताच तिग्मांशूने इरफान च्या पाठीवर जोरात मारलं. आपण कधी मित्राच्या पाठीवर गमतीत मारतो, तसं तिग्मांशूने मारलं होतं. निराश झालेल्या इरफान ला तिग्मांशू म्हणाला,

“अरे थांब मित्रा, तुला एक नॅशनल अवॉर्ड द्यायची इच्छा आहे. तो घे आणि मगच जा.”

हळूहळू इरफान आणि तिग्मांशू यांना कामं मिळू लागली. इरफान मालिका करू लागला.

तर तिग्मांशू सुद्धा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करू लागला. तिग्मांशूने २००३ साली ‘हासील’ सिनेमा बनवायला घेतला. विद्यार्थी निवडणुकीवर आधारीत सिनेमाचा विषय. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी तिग्मांशूने आपल्या खास दोस्ताला म्हणजेच इरफान ला खलनायकी भूमिका दिली. सिनेमा रिलीज झाला. परंतु इतका चालला नाही. पण हासिल मुळे इरफान हा कोणत्या लेवलचा अभिनेता आहे, हे सर्वांना कळलं.

सर्वांची खात्री होती की, हासिल साठी इरफान ला नॅशनल अवॉर्ड मिळेल. स्वतः इरफान ला सुद्धा आशा होती. अडचण अशी झाली की, या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिग्मांशू आणि सिनेमाच्या निर्मात्याचं भांडण झालं होतं. त्यामुळे निर्मात्याने सिनेमा नॅशनल अवॉर्ड साठी पुढे पाठवलाच नाही.

आणि इरफानची राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची संधी हुकली.

हासिल नंतर मात्र इरफान ला सिनेमे मिळू लागले. तिग्मांशू सुद्धा सिने दिग्दर्शनात व्यस्त झाला. साल २०१०. तिग्मांशूने आपला महत्वाकांक्षी सिनेमा ‘पान सिंग तोमर’ चा घाट घातला. पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत इरफान. या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव खूप थकवणारा होता, असं स्वतः इरफान ने म्हटलं होतं. जिथे डाकूंची वस्ती आहे, अशा खऱ्या जागेवर हा सिनेमा शूट करण्यात आला होता.

सिनेमा रिलीज झाल्यावर पुन्हा एकदा इरफान चं अभिनय सामर्थ्य प्रत्ययास आलं. पान सिंग तोमर नॅशनल अवॉर्ड साठी पाठवला गेला.

३ मे २०१३ चा दिवस. आणि तो क्षण आला. २०१३ च्या नॅशनल अवॉर्डस् मध्ये पान सिंग तोमर सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला. तर याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून इरफान ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्राला दिलेला शब्द तिग्मांशू ने पूर्ण केला होता. इरफान राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना तिग्मांशू च्या मनात काय भावना असेल, ती आपण शब्दात मांडू शकत नाही.

“अगर मेरा बस चले तो मैं तिग्मांशू को गोद लेके उसे घर पे लेके जाऊगा”,

असं इरफानने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ज्या मित्रासोबत सुख दुःखांचे अनेक क्षण जगलो, त्याच जिवलग मित्राच्या पार्थिव देहाला आधार देताना तिग्मांशू मनातून नक्की हादरला असावा. इरफान बद्दल बोलताना तिग्मांशू च्या डोळ्यात आलेलं पाणी, त्यांच्या जिगरी मैत्रीची साक्ष आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.