त्या दिवशी कुस्ती बघायला गेलेला पैलवान, भारतासाठीचं पहिलं कांस्य पदक घेवुन आला…
खाशाबा जाधव. स्वतंत्र भारताला पहिल वैयक्तिक पदक मिळवून देणारे पहिलवान. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताला कुस्तीत पदक मिळवण्यासाठी २०१२ साल उजडावं लागलं. तब्बल ५६ वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये पदक मिळालं.
मातीत सराव करुन मॅटवर कुस्ती खेळणारे ते पैलवान होते.
कराड जवळ असणारं गोळेश्वर हे त्यांच गाव. त्यांच्या घरी कुस्तीची परंपरा होती. त्यांनी कोल्हापूर गाठलं आणि कुस्तीचा सराव करु लागले. १९४८ सालच्या लंडन ऑलिपिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. प्लायवेट गटात त्यांनी सहाव्या क्रमांकापर्यन्त मजल मारली. या क्रमांकावर जाणारे ते पहिले भारतीय कुस्तीपटू ठरले मात्र ते पदक मिळवू शकले नाहीत.
पहिल्याच प्रयत्नात आलेल्या अपयशानंतर त्यांनी प्रयत्न चालू ठेवला.
मैदान गाजवरणाऱ्या खाशाबा जाधवांच्या समोर मात्र पैशाचा प्रश्न होता. १९५२ सालच्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते अशावेळी कोल्हापूरचे माजी खासदार व त्यावेळेचे राजाराम कॉलेजचे प्राचार्य खर्डिकर यांनी आपलं राहत घर गहाण ठेवून त्यांच्यासाठी पैसे उभारले होते.
दोन महिने बोटीने प्रवास करुन खाशाबा जाधव व त्यांच्यासोबत भारतातर्फे सहभागी ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारे संघ हेलसिंकीं येथे पोहचले होते.
त्यानंतर जे काय झालं ते….
“तुझी मॅच उद्या आहे, आज तू आमच्यासोबत फिरायला चल.”
कुस्तीचे व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद यांनी खाशाबा जाधवला हेलसिंकी फिरायची ऑफर केली. पण खाशाबा जाधवांच्या मनात पक्क होतं की आपण इथे पदक जिंकायला आलोय.
खाशाबा जाधव म्हणाले,
“तुम्ही जावून या मी इथे थांबून सामने बघतो.”
व्यवस्थापक टिम, भारताचे इतर खेळाडू हेलसिंकी फिरायला बाहेर पडले. खाशाबा जाधवांसोबत कुस्तीच छोटसं किट होतं. ते कुठं ठेवायचं म्हणून सोबत ते किट घेवून ते कुस्तीचे सामने बघायला लागले. कुठला मल्ल कसा खेळतो, त्यांची ताकद कितीय हे खाशाबा जाधवांची पारखी नजर बघत होती.
इतक्यात माईकवरुन पुढच्या खेळाडूच नाव पुकारलं गेलं. खाशाबा जाधवांना ते कळलं नाही. पण त्या नावात जाधव होतं. पुन्हा नाव पुकारलं तेव्हा लक्षात आलं हे आपलच नाव पुकारतायत. पुढची कुस्ती खाशाबा जाधवांची होती. सगळे सहकारी, व्यवस्थापक टिम आणि खेळाडू हेलसिंकी फिरायच्या दौऱ्यावर होते. आत्ता काय करायचा हा प्रश्न होता. पण या माणसाकडे निमित्त नावाची गोष्ट नव्हती. त्यांनी तात्काळ मैदानात पाऊल टाकलं.
पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी आलाच नाही. त्यांना विजयी घोषीत करण्यात आलं. त्यानंतर कॅनडाच्या मल्लाबरोबर कुस्ती होती खाशाबा जाधवांनी ती जिंकली, त्यानंतर मेक्सिको, त्यानंतर जर्मनी एकएक करत खाशाबा जाधव एकतर्फी सामने जिंकत गेले. गटवार स्पर्धेतील पाचही सामने ते विजयी झाले.
आत्ता क्वाटर फायनल होणार होती. हि लढत होती रशियाच्या ताकदीच्या अशा मेमेदबयोव्हिच्या विरोधात.
खाशाबा जाधव सलग पाच सामने खेळले होते. ऑलिंम्पिकच्या कुस्तीच्या सामन्यांचा एक नियम होता. तो म्हणजे दोन्ही सामन्यामध्ये किमान अर्धा तासांचा वेळ असायला हवा. पण सलग पाच सामने पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने खेळवण्यात आले होते. खाशाबा जाधव दमले होते इतक्यात क्वाटर फायनलची घोषणा झाली.
खाशाबा जाधव त्याच अवस्थेत मैदानात उतरले. त्यांचा ०-३ च्या फरकाने पराभव झाला.
या मॅचवेळी चुकीच्या पद्धतीने गुण देवून खाशाबा जाधवांवर अन्याय करण्यात आला, पण त्याविरोधात दाद मागण्यासाठी मैदानात ना भारतीय व्यवस्थापक टिम होती ना इतर कोणी?
खाशाबा जाधवांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मैदानात एकजरी भारतीय व्यवस्थापक टिमचा सदस्य असता तर खाशाबा जाधवांनी सुवर्ण मारलं असतं. पण या जरतरच्या गोष्टी झाल्या. मिळालेलं कांस्यपदक देखील हा एक इतिहास होता. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या खात्यात पहिल वैयक्तिक पदक मिळालं होतं.
पण “भारताचे” म्हणून आलेलं कोणीच त्यांचा सन्मान करण्यासाठी मैदानात नव्हतं. खाशाबा जाधव तिथून उठले त्यांनी तिरंगा आपल्या खांद्यावर घेतला आणि अगदी स्वत: स्वत:ला दिलेल्या सन्मानासारख ते उभा राहिले.
वैयक्तिक क्रिडाप्रकारात भारताने मिळवलेले हे पहिले पदक होते. गोळेश्वर या त्यांच्या गावी त्यांच जल्लोषात स्वागत करण्यात आले. कराडच्या स्टेशनावरुन गोळेश्वरला खाशाबांना घेवून जाण्यासाठी १५१ बैलगाड्या सजवण्यात आल्या होत्या. हजारो ढोलताश्यांच्या गजरात त्यांच स्वागत करण्यात आलं. गोळेश्वर गावाची ओळख खाशाबा जाधवांमुळे झाली ती कायमची.
सुमारे तीन वर्षांनंतर म्हणजे १९५५ साली आपल्या सरकारने त्यांच्या पहिला ऑलिंपिक पदकाची पोहचपावती म्हणून पोलिस उपनिरीक्षकाची नोकरी दिली.
कुस्तीत ऑलिंपिक मिळवणाऱ्या या खेळाडूला मार्गदर्शकच्या भूमिकेत घेण्याऐवजी सरकारने त्यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने दुय्यम असणारी पोलिस उपनिरीक्षकाची नोकरी देवू केली. पोलिस खात्यात त्यांनी २७ वर्ष नोकरी केली. राष्ट्रीय स्पोर्ट फेडरेशनकडून मिळणाऱ्या पेन्शनसाठी देखील त्यांना झगडाव लागलं. अशातच एका अपघाताचं निमित्त झालं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा.
- आत्तातरी, खाशाबा जाधवांना पहिलवान म्हणा !
- राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक !!!
- आंदळकरांचा परिसस्पर्श लाभलेल्या बाला रफिक शेख याने आज संधीच सोनं केलं.