आजच्या हिशोबात सांगायचं तर पोलीसांनी या डाकूवर 7 कोटीचं बक्षीस लावलेलं..

मोहर सिंहचा जन्म चंबळमधल्या डांग जिल्ह्यातला. गुर्जर समाजातला हा पोरगा. प्रत्येक भागाची काहीना काही परंपरा असते. या भागाची परंपरा म्हणजे भावकीतला वाद आणि बदला. एका चुलत्याने दूसऱ्या चुलत्याचे शेत ढापायचे आणि मग राडा सुरू. मोहर सिंह तरुण असताना हीच भानगड झाली. भावकीतल्या माणसांनी त्याच्या बांध सरकवला. शेत ताब्यात घेतलं.

आपल्या हक्काची जमीन घ्यायला त्याने पोलीस केस केली.

कोर्टात गेला. पण त्या काळात ब्रिटीश जाणार होते आणि स्वतंत्र मिळणार होते. सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती होती. पोलीसांनी मोहरसिंहलाच आत टाकलं. आत्ता बदला घेण्याच्या इराद्याने पेटून उठलेल्या मोहरसिंहने मग परंपरेनुसार भावकीतल्या दोघा तिघांना थेट स्वर्गाचा रस्ता दाखवला आणि स्वत: चंबळचा रस्ता धरला.

थेट टू चंबळ खोरं…

मोहर सिंह चंबळमध्ये गेला ते साल होतं १९५८ चं. या काळ चंबळच्या संस्कृतीचा पिक पिरीयड समजला जातो. या काळात मोठ्या प्रमाणात डकैत तयार होवून चंबळचा रस्ता पकडत होते. प्रत्येकाने आपआपल्या टोळ्या तयार केल्या होत्या. मानसिंग राठौड, डाकू रुपा, लाखन सिंग, गब्बर सिंग, लुख्खा पंडीत, माधोसिंह असे एकसे एक वरचढ डाकू होते.

या सर्व लाईनीत मोहरसिंह नवा होता. त्यामुळं कुठल्याही टोळीत त्याला प्रवेश अशक्य होता. दोन वर्ष मोहरसिंह कोणत्या ना कोणत्या टोळीत प्रवेश मिळेल म्हणून भटकत राहिला. पण नौसिखिया डक्कैत अस हिणावून त्याला सर्वांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

पण मोहोरसिंह हार मानणाऱ्यातला नव्हता त्याने स्वत:ची टोळी केली. टोळीचा नियम बनवला की इथे सर्वांना प्रवेश मिळेल. यामुळे त्याच्या टोळीची सदस्य संध्या १५० च्या वरती गेली. अवघ्या काही वर्षात मोहरसिंह हा सर्वात मोठ्या टोळीचा लिडर झाला.

काही वर्षातच आपल्या कारनाम्यामुळे तो राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश पोलीसांच्या E1 लिस्टमध्ये झळकला. याचा अर्थ क्रमांक एकचा डक्कैत असा होता. मोहोरसिंह साठी तर हाच मोठ्ठा सन्मान होता.

मोहर सिंह पोलीसांच्या हाती का लागला नाही.

चंबळचे बरेच डाकू पोलीसांच्या कारवाईत मारले जात होते. मात्र मोहोर सिंह आपल्या मुखबिर तंत्रामुळे वाचत होता. मुखबिर म्हणजे खबऱ्या. प्रत्येक डक्कैतची माहिती हाच खबऱ्या पोलीसांना देत असत. मात्र मुखबिरने माहिती दिली तर त्याच्यासह संपुर्ण कुटूंबाला मारण्याची पद्धत मोहोरसिंहने अवलंबली. बोले तैसा चाले या धर्तीवर त्याने बऱ्याच मुखबिरांना त्यांच्या कुटूंबासह ढगात पाठवले. त्यामुळे त्याचा विरोधात टिप मिळणं अवघड होवून बसलं.

१९६५ च्या सालात १२ लाखांच बक्षीस ठेवण्यात आलं.

१९६५ साली त्याच्यावर १२ लाखांच बक्षीस होतं. आजच्या हिशोबात ही रक्कम ७ कोटी ४२ लाख इतकी होते. आत्ता हे कस काढलं विचाराल तर इन्फेमेशन नावाची बेवसाईड आहे. त्यावर भारताच्या महागाईच्या दरानुसार त्यावेळेची किती ते आत्ताचे किती याची माहिती मिळते. असो तर अवघ्या पाच वर्षात मोहोरसिंहने आपली दहशत संपुर्ण चंबळ खोऱ्यावर बसवली. त्याच्या टोळीचे काही नियम होते. एकतर तो कुठल्याही महिलांना आपल्या टोळीत घेत नसे.

दूसरा नियम होता की टोळीतल्या एकाही डक्कैतने महिलेकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. यामुळे महिला सुरक्षित झाल्या. प्रत्येक गुंडाचे काहीतरी चांगले नियम असतात तसेच त्याचे होते. त्यामुळे त्याची टोळी एकसंध राहिली. ती कधी फुटली नाही. त्याचे मुख्य शत्रू हे पोलीस असत. पोलीसांना त्याने घाम फोडला होता.  एकसे बढकर एक शस्त्र आणून त्याने आपली टोळी सुसज्ज केली होती.

याच काळात एकामागून एक डक्कैत एकतर शरण जात होते नाहीतर पोलीस कारवाईत मारले जात होते.

१९६३ मध्ये डाकू सरगाना फिरंगी सिंह, १९६४ मध्ये देवीलाल शिकारी, १९६४ मध्ये छक्की मिर्था, १९६५ मध्ये शिवसिंह आणि रमकल्ला यांच्यासारखे बडे डक्कैत मारले गेले आणि मोहोरसिंह हा एकमेव मोठ्ठा डक्कैत उरला.

१९७० च्या काळात मोहोर सिंहने २६ लाखांची खंडणी वसूल केली होती.

हे ऑपरेशन चंबळ मधील पहिले ऑपरेशन समजले जाते. अशा प्रकारे पैसा मिळवला जावू शकतो याचा विचार देखील यापूर्वी कोणी केला नव्हता. झालेलं अस की शर्मा नावाचा एक जून्या मुर्तींचा तस्कर दिल्लीत रहात होता. त्याचं अपहरण केल्यास मोठ्ठी रक्कम मिळेल अशी टिप मोहोर सिंहला मिळाली.

मोहरसिंहने जाळं पसरवलं. त्याने शर्माला टिप दिली की चंबळमधील एकाकडे प्राचीन मुर्ती आहेत. शर्मा हूशार होता. त्याने पहिल्यांदा आपल्या एका माणसाला चंबळला पाठवलं. मोहरसिंहने त्यांना किडनॅप केलं आणि त्याच्याकडून सर्व काही सुरक्षित असल्याचा निरोप पाठवला.

शर्मा ग्वालियरला आला. तिथेच मोहरसिंहच्या माणसांनी त्याला ताब्यात घेतलं. अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा शर्मा मोठा व्यक्ती होता. त्या काळात आपल्या सुटकेसाठी त्याने २६ लाखांची खंडणी दिल्याचं सांगण्यात येत.

आत्ता आला तो मोहरसिंहच्या आयुष्यातला दूसरा टप्पा.

मध्यप्रदेश पोलीसांनी चंबळची भूमी साफ करण्याच ठरवलं होतं. साधारणं १९६५ ते १९७० या काळात मोहोरसिंहच्या पोलीसांसोबत सुमारे ७० हून अधिक चकमकी घडल्या. एकीकडे दूसऱ्या डकैतांच्या टोळ्या आणि दूसरीकडे पोलीस असा दूहेरी सामना त्याला करावा लागत असे.

याच काळात तो टॉपला पोहचला होता. त्याच्या टोळीत सुमारे ५०० डकैत होते. चंबळमधला क्रमांक एक त्याला मिळाला होता. नंतरच्या काळात म्हणजेच १९७१ च्या दरम्यान जयप्रकाश नारायण यांनी चंबळच्या डकैतांना शरण येण्याचं आवाहन केलं होतं.

मोहरसिंहचा डावा हात म्हणून माधो सिंह हा डकैत ओळखला जायचा. कालांतराने त्याने दूसरी गॅंग तयार केली होती. मोहरसिंह आणि माधोसिंह यांच्यात चांगली दोस्ती होती. माधोसिंहने जयप्रकाश नारायण यांच्या सुचनेनुसार शरण जाण्याचं ठरवलं.

माधोसिंहचा हा निर्णय पाहून मोहरसिंह देखील शरण जाण्याचा विचार करू लागला.

अन् तो दिवस आला.

जौरा बांध इथल्या गांधी मैदानात मोहोरसिंह आणि त्याच्या ५०० डकैत सहकाऱ्यांनी आपल्या बंदुका जयप्रकाश नारायण यांच्या पायावर ठेवल्या. तीन राज्यांना देखील सापडू न शकणारा हा डकैत स्वत:हून पोलीसांना शरण गेला.

त्यानंतरच्या काळात त्याचे अनेक किस्से गाजले. तो जेलमध्ये रोज अडीच किलो चिकन खायचा. न्यायाधिशांनी त्याला फासीची शिक्षा देखील सुनावली. मात्र पुढे त्याचं आत्मसमर्पण विचारात घेवून २० वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला.

१९८० सालीच म्हणजे अवघ्या आठ वर्षात त्याला सोडून देण्यात आलं. आत्मसमर्पण केल्यामुळे सरकारमार्फत त्याला ३५ एकर शेतजमीन देण्यात आली. भिंड जिल्ह्यातल्या मेहगाव मधील आपल्या ३५ एकरात तो स्थायिक झाला. पुढे तो कॉंग्रेसमध्ये गेला. १९९४ साली मेहगाव नगरपंचायतीवर अध्यक्ष म्हणून निवडून आला. पिक्चरच्या प्रेमापोटी त्याने एका पिक्चरमध्ये डाकूचाच रोल केला.

नंतरच्या काळात मात्र तो धार्मिक होत गेला. आपलं गावाच्या आसपास त्याने मंदीर बांधले. समाजसेवी मोहर दद्दा म्हणून तो ओळखला जावू लागला. अखेर वयाच्या ९५ व्या वर्षी तो गेला.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.