ज्या वयात पोरं बोर्डाचं टेन्शन घेतात त्या वयात जेठमलानी वकीलीच्या ड्रेसमध्ये कोर्टात उभे होते

सर्वोच्च न्यायालयातील एक वकिल सांगतात,

जेठमलानी साहेब बऱ्याचदा न्यायधीशांना सांगत होते, महोदय आपलं जेवढं वय नाही त्यापेक्षा जास्त तर माझा वकीलीतील अनुभव आहे. कारण न्यायाधीशांच्या निवृत्ती वय ६५ आहे.

तर राम जेठमलानी यांचा अनुभवच तब्बल ७५ वर्षांचा होता.

म्हणजे न्यायाधीशांपेक्षा तब्बल १० पावसाळे जास्त बघितलेला माणूस. त्यांचा हाच अनुभव त्यांना भारतातील सर्वात जेष्ठ आणि महागडे वकील म्हणून ओळख मिळवून देवून गेला.

१ पैसा खिशात घेवून मुंबईत आलेला माणूस आयुष्याच्या उत्तरार्धात कोर्टाच्या एका तारखेला ते १० ते ३० लाख रुपये फि घेत असल्याचा अहवाल २०१५ मध्ये लिगली इंडियानं दिला होता. देशातील टॉप १० वकिलांच्या यादीत त्यांचा नंबर पहिला होता.

राम जेठमलानी यांना इथं पर्यंत पोहचणं नक्कीच सोप नव्हतं.

पण इथवरचा त्यांचा प्रवास देखील तितकाच मनोरंजक आणि आश्चर्यकारक आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी जेवढ्या धमाकेदार केसेस लढवल्या तेवढीच त्यांची वकिलीचा पुर्वाध आणि विशेषतः एंट्री एकदम धमाकेदार आहे.

त्यांचा सुरुवातीचा प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या तत्कालीन भारत आणि आताच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतामधील शाळेपासून सुरुवात करावी लागतेय.

राम जेठमलानी तिसरीमध्ये होते. शाळेत एक कार्यक्रम चालू होता. जेठमलानींच्या शिक्षकांनी त्यांना स्टेजवर बोलवलं आणि बाकी शिक्षकांना चॅलेंज केलं की या मुलाला मुघल इतिहासातील काहीही प्रश्न विचारा.

जेठमलानींनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. उत्तर ऐकुन सर पण फॅन झाले. आणि डायरेक्ट दोन वर्षांनी पुढं ढकललं.

असं करत १३ व्या वर्षीच मॅट्रिक पण झाले. जेठमलानी यांचे आजोबा आणि वडील दोघेपण वकील. पण दोघांची ही इच्छा नव्हती त्यांच्या मुलानी या फॅमिली व्यवसायात यावं.

एका मुलाखतीमध्ये जेठमलानी सांगतात,

माझ्या वडिलांची इच्छा होती की मी इंजिनीअर बनावं. त्यामुळे त्यांनी माझा दाखला पण विज्ञान शाखेत केला होता. पण वकीली माझ्या रक्तात होती. योगायोगाने सरकारने त्याचवेळेस एक नियम बनवला की एक परिक्षा देवून कोणीही ‘लॉ’मध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. मी त्या परिक्षेत पहिला आलो आणि प्रवेश घेतला.

चारच वर्षात शिक्षण पुर्ण करुन १७ व्या वर्षी मी वकील बनलो.

वडिलांच्या इच्छेविरूद्ध अभ्यास केल्यानंतर या १७ वर्षीय वकिलालासमोर पहिलचं मोठं आव्हान उभं राहिलं, ते म्हणजे बार कौन्सिलच्या नियमांनुसार वयाची २१ वर्ष पुर्ण केल्याशिवाय कोणालाही प्रॅक्टिस करता येत नाही. त्यामुळे जेठमलानी यांना चार वर्षे थांबावे लागणार होते. जे की त्यांना मान्य नव्हतं.

वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिकल्यामुळे ते पण मदत करण्याची शक्यता कमीच हे गृहीत धरुन त्यावर त्यांचा त्यांनीच उपाय काढला न् कराची हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना अर्ज लिहिला. त्यात त्यांनी लिहिले की,

मला तुमच्यासमोर एकदा बोलण्याची आणि माझं म्हणण सांगण्याची संधी द्या.

सरन्यायाधीशांनी त्यांना भेटीची वेळ आणि बोलण्याची संधी दिली.

मुलाखतीमध्ये जेठमलानी सांगतात ‘मी सरन्यायाधीशांना सांगितले की जेव्हा मी वकीलासाठी प्रवेश घेतला किंवा नाव नोंदणी केली तेव्हा असा कोणताही नियम नव्हता की मला वयाच्या २१ वर्षापर्यंत प्रॅक्टिस करता येणार नाही. त्यामुळेच मला हा नियम लागू करु नये.

मुख्य न्यायाधीश या १७ वर्षीय व्यक्तीच्या बोलण्यावर आणि आत्मविश्वासावर इतके प्रभावित झाले की त्यांनी बार काऊन्सिलला राम जेठमलानी यांना परवाना देण्याबाबत विचारणा करण्यास पत्र लिहिले.

यानंतर हे नियम बदलण्यात आले आणि एक अपवाद म्हणून जेठमलानी यांना वयाच्या १८ व्या वर्षी वकिलीचा परवाना देण्यात आला.

आज ज्या वयात पोर बारावीच्या बोर्डाच टेन्शन घेवून असतेत त्या वयात राम जेठमलानी यांनी कराचीतुन वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली. इतक्या लहान वयात वकिली सुरू करणारे ते देशातील पहिले आणि शेवटचे व्यक्ती ठरले.

सिंध प्रातांत त्यांच्या जोडीला ए. के. ब्रोही हे वकील मित्र देखील होते. १९४८ कराचीमध्ये दंगल भडकली आणि ब्रोही यांच्या सल्ल्यानुसार ते मुंबईत दाखल झाले. योगायोगाने हे दोघेही मित्र पुढे आपआपल्या देशाचे कायदा मंत्री झाले.

जेठमलानी यांचे मुंबईतील सुरुवातीचे काही दिवस निर्वासितांच्या छावण्यांमध्ये गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते आले तेव्हा केवळ खिशात १ पैसा आणि वकिलीची डिग्रीसोबत होती. एका बॅरिस्टरनेच मेज उभी करण्यासाठी ६० रुपये दिले आणि पुन्हा शुन्यापासून वकिलीचा प्रवास चालू झाला. इथेच ते आपल्या अशिलांना देखील भेटायचे.

भारतातील त्यांची पहिली केस म्हणून बॉम्बे रिफ्युजी ॲक्ट ही केस मुंबई उच्च न्यायालयात लढवली. या केस पासून सुरु झालेला प्रवास अगदी सोहराबुद्दीन बनावट एन्डकाऊंटर खटल्या पर्यंतचा होता.

१९५९ नंतर….

जेठमलानी यांच्या प्रसिद्धीचा काळ सुरु झाला तो १९५९ च्या नानावटी खटल्याने. या खटल्यात ज्युरीनी नानावटी यांना निर्दोष सोडले होते पण जेठमलानी यांनी उच्च न्यायालयात हा खटला रिओपन करुन नानावटीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात मोठी कामगिरी बजावली. सोबतच या खटल्याने भारतातील ज्युरी सिस्टिम कायमची संपवून टाकली.

६० च्या दशकात राम जेठमलानी हे तस्कर, अंडरवर्ल्ड आणि नामचिन आरोपींचे वकील म्हणून समोर आले. अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, स्टॉक मार्केट घोटाळ्यांचा आरोपी हर्षद मेहता आणि केतन पारेख, जेसिका लालचा मारेकरी मनु शर्मा, इंदिरा गांधींचे मारेकरी, राजीव गांधींचे मारेकरी, संजय दत्तचा A/K 47 चा खटला, लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकलेले आसाराम बापू, २६/११ हल्ल्यातील कसाब, सोहराबुद्दीन हत्याकांड अशा अनेकांचे वकीलपत्र त्यांनी घेतले.

इतकेच काय तर बड्या बड्या राजकारण्यांचे वकिल म्हणून ते ओळखले जात होते. येडियुरप्पा यांचा अवैध उत्खनन आणि उत्पन्नाचा आरोप. जादा मालमत्तेच्या प्रकरणात अडकलेल्या जयललिता, चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव, लालकृष्ण आडवाणी, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनासाठी त्यांनी वकिली केली.

राम जेठमलनी यांची तत्थांशी खेळण्याची आणि फिरवण्याची शैली अप्रतिम होती.

त्यामुळेच त्यांनी संविधानातील कायद्यांच्या बारकाव्यांचे खटले लढण्यापेक्षा गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या आयपीसी आणि इतर कायद्यातील तथ्यांचे खटले जास्त प्रमाणात लढवले. आणि याचमुळे कदाचित त्यांना जास्त ओळख आणि यश मिळवून दिले.

ते वकिल म्हणून जितके लोकप्रिय झाले तेवढेच ते राजकारणी म्हणून यशस्वी झाले. त्यांची राजकीय सक्रियता, वैयक्तिक जीवनशैली आणि त्यांची सार्वजनिक ठिकाणची विधाने यामुळे बऱ्याचदा वादांमध्ये देखील अडकले. बराच वेळ ते भाजपमध्ये होते. पण कधी ते भाजपच्या विरोधात पण लढताना दिसले. लोकसभेत ते भाजपचे सदस्य होते. तर राज्यसभेत कधी भाजपचे, कधी लालूंच्या राजदचे, तर कधी नॉमिनेटेड.

वाजपेयींच्या १९९९ च्या मंत्रिमंडळात ते देशाचे कायदामंत्री झाले.

पण ॲटर्नी जरनलसोबत झालेल्या वादामुळे मंत्रिमंडळातुन बाहेरही जावं लागलं होत. पुढे २००४मध्ये मध्ये त्यांनी अटलबिहारीं विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली. याशिवाय त्यांनी स्वतःला राष्ट्रपतीपदाचे दावेदार म्हणूनही सांगितले.

भाजपशी बिनसल्यावर त्यांनी अरुण जेटलींच्या विरोधात अरविंद केजरीवालांचे वकिलपत्र घेतले. राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणूकीवेळी ते लालूंच्या आरजेडीच्या तिकिटावर खासदार होते. तरीही क्रॉस वोटिंग कदत एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. एकुणच काय तर तर कधीच ते एका पक्षीय चौकटीत अडकले नाहीत.

वकिल आणि राजकारणी म्हणून जेवढे बिनधास्त होते तेवढे सार्वजनिक आयुष्यात हरपनमौला. सार्वजनिक ठिकाणी त्यांचे वादात अडकायचे आणखी एक कारण म्हणजे दारु आणि महिलांशी जवळीक.

पण ते म्हणायचे वयाचे ९५ व्या वर्षी देखील एक्टिव्ह आहे त्याच कारण म्हणजे दारु आणि स्त्रिया.

एकदा ‘आप की अदालत’ कार्यक्रमात रजत शर्मा यांनी राम जेठमलानी यांना त्यांच्या दोन लग्नांबद्दल विचारले असता, ते म्हणाले “होय, मला दोन बायका आहेत.” आणि दोघीही तुझ्या बायकोपेक्षा जास्त खूश आणि सुखी आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.