इंगा, दंगा, भुंगा आणि फुंगा….

इंगा, दंगा, भुंगा आणि फुंगा.

शिवाजी महाराजांपासून प्रत्येक राजाला तत्कालीन ब्राम्हणांनी क्षत्रियत्व सिध्द करायला लावले. खरतर राज्याभिषेकालाच नकार दिला गेला. काशीच्या गागाभट्ट यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला तर त्यांच्याबद्दल ते शौचालयात पडून मेले अशा अफवा महाराष्ट्रात पसरवल्या गेल्या. जातीवरून एवढ्या टोकाचा विरोध शिवाजी महाराजांना सहन करावा लागला. तोच प्रकार प्रतापसिंह महाराज, महाराजा सयाजीराव यांच्याबाबतीतही झाला.

छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत मात्र हा प्रकार झाल्यावर त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला. त्यांनी थेट स्वतंत्र क्षात्रजगद्गुरू नेमले. महाराष्ट्रात गदारोळ झाला. पण महाराज खंबीर राहिले. शाहू महाराजांनी जातीयवादी माणसं ताबडतोब वठणीवर आणली. जिथे जिथे अशी प्रवृत्ती दिसली तत्काळ ठेचून काढली. ठेचून काढली यासाठी की कुणी एखाद्याला वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला तर महाराजांनी त्याला लोकांदेखत चपलेने बडवलेले आहे.

प्रबोधनकार आणि शाहू महाराज पहिल्यांदा भेटले.

शाहू महाराजानी काही क्षण प्रबोधनकार ठाकरेंना आपादमस्तक न्याहाळलं. नंतर महाराजांचे दिवाणजी प्रबोधनकाराना म्हणाले, महाराजांचे फिजीऑनमी नि सायकॉलॉजीचे ज्ञान उपजतच असून, त्यांनी एका क्षणाला काढलेले खटके फारसे चुकत नाहीत. तुमच्याशी ते बोलायला लागल्यावर माझा जीव भांड्यात पडला. नाहीतर कित्येकांना नुसते असे पाहिल्यावर चटकन सांगायचे,’ बराय, ठीक, जावा आता.’ 

जावा आता. कामचुकार आणी ढोंगी माणसाची दोन शब्दात बोळवण. शाहू महाराजांच्या कामाचा झपाटा लक्षात घेतला तर ते असे स्पष्ट आणी थेट बोलणारे का असतील याची खात्री पटते. प्रत्येक राज्यकर्त्याकडे हा गुण असलाच पाहिजे.

शाहू महाराजांना नौकरशाहीने खूप वैताग आणला होता. कारण त्यांच्या आधी काही वर्ष सगळा कारभार हा नौकरशहांच्या हाती होता. त्यात देशी आणि विदेशी दोन्ही नौकरशहा आघाडीवर होते. त्यांना चरायला कुरण उपलब्ध होते. पण शाहू महाराजांनी कारभार हाती घेतला आणि या लोकांना वेसण बसायला सुरुवात झाली.

व्हिक्टोरिया राणीने शाहू महाराजांना एक महत्वाची पदवी दिली होती. तिचा सोहळा पुण्यात होता. तिथे महाराजांच जोरदार स्वागत झालं. पण पदवीदान सुरु होताना सेनापतीच्या शेजारी बसण्याचा मान सेनाखासखेल यांना मिळाला पाहिजे का पंतसचिवांना यावरून वाद सुरु झाला. महाराजांच्या प्रतिनिधींचा हा प्रकार बघून राज्यपाल पण हैराण झाले. कसाबसा तो वाद मिटवला गेला. पण समारंभ झाल्यावर शाहू महाराजांनी तत्काळ सेनाखासखेल यांचा अधिकार त्यांना मिळवून दिला. 

शाहू महाराजांच्या काळात राजनैतिक प्रतिनिधी कर्नल विल्यम रे, दिवान मेहरजी तारापूरवाला आणि राजाराम कॉलेजचे प्राचार्य सी एच कॅन्डी हे त्रिकुट त्यांची डोकेदुखी ठरलं होतं. पण महाराजांनी मुत्सद्दीपणे या तिघांनाही आपली जागा दाखवली. खरतर इंग्रजांचे अधिकारी असल्याने रे आणि कॅन्डी खूप मग्रूर आणि शेफारलेले होते. कॅन्डी यांनी महाराजांविरुद्ध अनेक कट कारस्थानं केली. मोठ्या अधिकाऱ्यांचे महाराजांविरुद्ध कान भरले. पण वेळ येताच रे यांच्यामार्फतच कॅन्डीची गच्छन्ति करण्यात महाराज यशस्वी झाले. रे यांनी तर थेट महाराजांवर विषप्रयोगाचा खोटा आरोप लावला. त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी शांतपणे कायदेशीर पद्धतीने इंग्रजांनाच रे याची सुद्धा हकालपट्टी करायला लावली.

नौकरशहा स्वतःला कितीही शहाणे समजणारे असले तरी त्यांनी राजाशी उर्मटपणे वागू नये.  राजाच्या विरोधात कारस्थान करू नये. 

१८९७ च्या काळात दुष्काळाने करवीरनगरी हैराण झाली होती. पावसाने दगा दिल्याने महागाई वाढत होती. शाहू महाराजांनी धान्याचे भाव वाढवू नयेत म्हणून व्यापाऱ्यांना कडक समज दिली. आणि रास्त भावात धान्य विकायला प्रोत्साहन म्हणून दरबारातून तोट्याची रक्कम दिली. परिणाम असा झाला की व्यापाऱ्यांनी स्वस्त धान्याची दुकानं काढली. इतर दुकानदारांना भाव वाढवण्याची हिमतही झाली नाही आणि संधीही मिळाली नाही.

या दुष्काळानंतर शाहू महाराजांनी सगळ्यात आधी काम हाती घेतलं ते मोठमोठे तलाव आणि विहिरी बांधण्याचं. त्यातूनच राधानगरी धरण बांधून पूर्ण केलं. ही दूरदृष्टी कोल्हापूरला आजही कामी येताना दिसते. या दरम्यान शेती नसलेल्या लोकांना काम मिळावं आणि दळणवळणासाठी रस्ते बनवावेत हा विचार शाहू महाराजांनी केला. गावातच लोकांना रोजगार मिळू लागला. पण सोबतच या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार सुरु झाला. खूप लोक केवळ नाव नोंदवायचे आणि पैसे उचलायचे. शाहू महाराजांचा तळागाळातील जनतेशी चांगला संपर्क होता. त्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी योजनेत थोडा बदल केला. गावात रोजगार देणं बंद केलं आणि दूरच्या गावात काम द्यायला सुरुवात केली. मग मात्र ज्यांना खरच कामाची गरज आहे असेच लोक जाऊ लागले. भ्रष्टाचार बंद झाला. ही दूरदृष्टी असते.

अर्थात अजूनही रोजगार हमी योजनेत आपल्याला ही गोष्ट करता येत नाही. केवळ प्रजाच नाही राजाही प्रत्येक संकटातून शिकला पाहिजे. त्यातून त्याने संधीचे सोने केले पाहिजे हा आदर्श शाहू महाराजांनी घालून दिला. 

शाहू महाराजानी प्लेगच्या काळात केलेली कामगिरी तर प्रत्येक राज्यकर्त्यासाठी आदर्श आहे. गावात राहणाऱ्या लोकांना वस्तीवर राहण्यास प्रोत्साहन देण्यापासून त्यांनी सुरुवात केली. ज्यांना शक्य नव्हतं त्यांना गावाबाहेर झोपड्या बांधून दिल्या. रेल्वे स्टेशनवर बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी सुरु केली. त्यातूनही कुणी चुकार आणि फसवे लोक फिरत असतील तर त्यांची माहिती देण्यासाठी चांगले बक्षीस ठेवले.

या गोष्टींचा परिणाम असा झाला की साथ नियंत्रणात राहिली. या काळात एका क्लबच्या काही नीच लोकांनी घरफोडीचे प्रकार केले. महराजांनी त्यांना पकडून शिक्षा केली आणि तो क्लब बंद झाला. महाराजांनी ग्राम अधिकाऱ्यांना त्या काळात आपल्या सूचनांची कडक अंमलबजावणी केली नाही तर वतन बरखास्त करण्याचा आदेश दिला. आणि काही अधिकाऱ्यांना खरोखर बरखास्त केले. आजही आपण कामाचा एवढा झपाटा फार कमी वेळा बघतो. आपत्तीच्या वेळी शाहू महाराजांचं काम आणि निर्णय आठवले तरी पुरेसे आहेत. 

शाहू महाराजांनी आरक्षण, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी केलेल्या कामाला तर तोडच नाही. सामाजिक न्यायाची एवढी भक्कम पायाभरणी करणाऱ्या या राजाचे उपकार विसरता न येण्यासारखे आहेत.

त्यांनी एकदा एका अस्पृश्य व्यक्तीला कोर्टात नौकरीवर ठेवले. पण कोर्टात ना त्याला कुणी जवळ बोलवत होते ना काही काम सांगत होते. कुणीतरी विचित्र माणूस आलाया असे बघायचे. त्यात एक महिना झाल्यावर त्याला न्यायाधीशाने तुझे काम बिलकुल समाधानकारक नाही म्हणून तुझा पगार कापण्याची शिक्षा देण्यात येत आहे असा आदेश दिला.

दुसऱ्या महिन्यातसुद्धा बिचाऱ्याचा पगार कापण्यात आला. वर न्यायाधीशांनी शाहू महाराजांना कळवले की तुम्ही नेमलेल्या माणसाला काम येत नाही. शाहू महाराजांनी न्यायाधीशाला निरोप दिला की दंड करणे योग्य नाही. त्याला काम शिकवा. पण तसे काही न करता नायाधीशाने तिसऱ्या महिन्यात तर त्या माणसाचा पूर्णच पगार कापला आणि शाहू महाराजांना कळवले की तुम्ही नेमलेला माणूस बिनकामाचा आहे.

यावर शाहू महाराजांनी उलट उत्तर पाठवले. त्यात लिहिले होते, इतर कारकुनासारखीच शैक्षणिक पात्रता असलेल्या माणसाला तुमच्यासारख्या न्यायाधीशालाही काम शिकविता येऊ नये, हे तुमच्या अकार्यक्षमतेचे लक्षण होय. तेंव्हा ह्या अकार्यक्षमतेबद्दल तुमचा पगार तहकूब करण्यात आला आहे. आणखी एक महिन्यात त्या नवीन कारकुनास काम शिकविण्यास तुम्हास अपयश आले तर तुम्ही निखालस अकार्यक्षम आहात, असे समजून पुढील विचार करण्यात येईल. 

पुढच्या महिन्यात न्यायाधीशानी शाहू महाराजांना निरोप पाठवला, सदरहू इसमाची कामातील प्रगती अत्यंत समाधानकारक आहे.

नौकरशाही आधी कारभार आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. राजा खमक्या नसेल तर मग्रुरीने वागू लागते. राजविरोधात कारस्थान करू लागते. पण राजा शाहू महाराजांसारखा असेल तर मात्र नमते घेऊन सदरहू इसमाची कामातील प्रगती अत्यंत समाधानकारक आहे असा निरोप पाठवते. महाराजांचे नौकरशाहीतले विरोधक त्यांच्या विरोधात इंगा, दंगा, भुंगा आणि फुंगा हे प्रकार वापरायचे. 

न्यायाधीश, नौकर, पुजारी सुरुवातीला महाराजांचे आदेश न मानता त्यांना इंगा दाखवायचा प्रयत्न करायचे. महाराजांनी त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवली. महाराजांची बदनामी करणारे आरोप करणे, त्यांच्यावर कोर्टात खटले दाखल करणे हा दंगा करण्याचा प्रकार होता. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत वर्तमानपत्रांनी जी महाराजांच्या विरोधात बदनामी करण्याची मोहीम सुरु केली होती तो भुंगा लावणे प्रकार होता. आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी कुजबुज मोहीम उघडली होती त्याला फुंगा म्हणत.

या सगळ्या गोष्टींना शाहू महाराज पुरून उरले. नुसतेच पुरून उरले नाहीत तर नेहमीच प्रामाणिकपणाचा विजय होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. आपले आणि परके असे दोन्ही विरोधक त्यांनी मोठ्या समर्थपणे हाताळले.

महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शाहू महाराज नेहमीच प्रेरणादायी ठरतील. फक्त त्यांच्या पावलावर पाउल टाकण्याची इच्छाशक्ती हवी.   

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.