जखमा बऱ्या करणारी पेट्रोलियम जेली पुढे व्हॅसलिन ब्रँड म्हणून उदयास आली

हिवाळा तसा बऱ्याच लोकांना आवडणारा ऋतू आहे. मस्त अंगावर गरम दुलई घेऊन झोपणे, शेकोटी पेटवणे, चांगले चांगले अन्नपदार्थ करून खाणे खाऊ घालणे असे अनेक उद्योग लोकं करत असतात. पण आता हे झाले आवडते, आजीच्या गोष्टींमध्ये असायचं ना की एक राजा असतो त्याला दोन राण्या एक आवडती आणि एक नावडती तसा काहीसा हिवाळा ऋतू असतो. हिवाळा का आवडत नाही तर तो म्हणजे तोंड उलने किंवा त्वचा कोरडी पडणे. अशा भयानक गोष्टीनं हिवाळा बदनाम आहे. म्हणजे हिवाळ्यात अशी माणसं मिठात भाजलेल्या शेंगदाण्यासारखी दिसू लागतात.

पण या जालीम प्रॉब्लेम वर औषध सुध्दा जालीम निघालं आणि ते होतं व्हॅसलिन. 

आजही लोकांची पहिली पसंती ही व्हॅसलिनलाच असते म्हणजे इतर आजकालचे मार्केटमध्ये मिळणारे लीप- बिप बाम नंतरच्या गोष्टी झाल्या आधी व्हॅसलिन होती. बरं आता सायन्स वाल्या विद्यार्थ्याना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण आपल्यासारख्या माणसाला सुधा प्रश्न पडतो की भावड्या हा व्हॅसलिनचा चमत्कार झाला कसा ? साहजिकच आहे आपण त्याचा शोध कसा लागला त्याबद्दल जाणून घेणं, 

व्हॅसलिन फक्त हिवाळ्यात वापरली जाते असं काही नाही तर बरेच उपयोग आहेत. आधी शोध पाहूया काय भानगड झाली होती. ब्रँड वाल्या प्रत्येक माणसाचं ध्येय असतं की आपलं प्रॉडक्ट अफाट चालावं. ब्रांडच मूळ नाव विसरून प्रॉडक्टच्या नावाने हवा व्हावी. 

अमेरिकेत ब्रुकलीन इथं राहणारे रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू एक केमिस्ट होते. १८५९ हा काळ वाईट काळ म्हणून त्यांच्या आयुष्यात आला होता. दिवाळखोरीला सामोरं जाणाऱ्या रॉबर्टना एका फायदेशीर व्यवसायाची गरज होती. केरोसीनचं महत्त्व त्या काळात मोठं होतं; पण पेट्रोलियमचा व्यवसायही जोर धरू लागला होता. या व्यवसायाची चाचपणी करण्यासाठी ते पेनसिल्वानिआला गेले. तिथ मोठय़ा प्रमाणात खनिज तेलांचा व्यवसाय चालायचा.

या भेटीच्या दरम्यान खनिज तेलाचं उत्खनन जिथे चालू होतं तिथे रॉबर्ट यांना एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट आढळली. म्हणजे बघा अशा लोकांना कायम बारीसारीक गोष्टीत इंटरेस्ट असतो. तिथल्या ड्रिलिंग रॉडस् भोवती पेस्टसारखा दिसणारा पदार्थ चिकटलेला असायचा. रॉबर्ट यांच्यातील जिज्ञासू मन जागं झालं. त्यांनी तिथल्या कामगारांना विचारलं तर त्यांनाही फारशी माहिती नव्हती; पण त्यांच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट रॉबर्टना कळली, की हे जे काही आहे, ते जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.

जखमा बऱ्या करणारं जालीम असं रसायन म्हणजे ती पेस्ट होती.

रॉबर्ट यांना त्यावर अधिक संशोधन करणं गरजेचं वाटू लागलं. परतताना तो लोकांच्या दृष्टीने असलेला पेट्रोलियम कचरा एक किमती ऐवज घेऊन यावा तसा रॉबर्ट घरी घेऊन आले. त्या पेस्टवर त्यांनी संशोधन केलं. त्या पदार्थाचं शुद्धीकरण केलं आणि त्या पदार्थाला ‘पेट्रोलियम जेली’ असं नाव दिलं. ही पेट्रोलियम जेली पुढे जग गाजवेल याचा विचारही त्यांनी केलेला नव्हता. एक पूर्णत: नवी गोष्ट रॉबर्ट लोकांपुढे आणत होते.

त्यांनी स्वत:वरच अनेक प्रयोग करून पाहिले. यात ते स्वतलाच जखमी करायचे आणि ती पेस्ट लावून पाहायचे, किती वेळात कोणत्या जखमा बऱ्या होतात याचा ते अंदाज घ्यायचे. आता हा प्रकार एखादा वेडा माणूस करतो असं वाटेल पण त्यावेळी रॉबर्ट यांना अंदाज आला होता की आपल्या हाती काहीतरी जबऱ्या गोष्ट लागली आहे.

पूर्ण अभ्यास करून रॉबर्ट यांनी ही जेली बाजारात विक्रीसाठी आणायचं ठरवलं. आपल्या या उत्पादनाचं नाव त्यांनी ‘वॅसलिन’ असं निश्चित केलं.

या नावाबाबत दोन गोष्टी कायम सांगितल्या जातात त्यातली एक अशी की, रॉबर्ट यांना हे नाव स्वप्नात सुचलं, तर काहींच्या मते पाण्यासाठी वापरला जाणारा जर्मन शब्द ‘वेसर’ आणि ऑलिव्ह तेलासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द ‘इलीऑन’ याच्या मिश्रणातून रॉबर्ट यांनी हा शब्द निर्माण केला. आता काय सोयीस्कर पडत ठरवून घ्या.

१८७० मध्ये वॅसलिन विक्रीसाठी एक ब्रॅण्ड म्हणून सिद्ध झालं, पण लोकांना माहितीच नसणारा प्रॉडक्ट विकायचा कसा हीच मोठी जोखीम होती. रॉबर्ट त्या काळी स्वत: छोटय़ा बरण्यांत वॅसलिन भरून एका घोडय़ाच्या बग्गीतून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वॅसलिन फुकट वाटत असतं; पण त्यांचा आग्रह होता की, याचा फायदा होतोय का नाही किंवा काही वेगळा अनुभव असल्यास मला येऊन सांगा.

थंड हवेच्या प्रदेशात ही नवी जेली अनेकांना वरदान वाटली. गंमत म्हणजे रॉबर्टने फक्त कापणं, भाजण्याच्या जखमा समोर ठेवून प्रचार केला तरी लोकांनीच वॅसलिनचे अनेकविध फायदे शोधून रॉबर्टपर्यंत पोहोचवले.

महिला वर्गाने कळवलं की, वॅसलिन लाकडी वस्तूंना लावलं की त्या चकचकीत होतात. शेतकऱ्यांनी आपला अनुभव सांगताना वॅसलिनमुळे शेतकी अवजारं गंजत नसल्याचं कळवलं. जलतरुणपटूंना संपूर्ण अंगाला वॅसलिन लावून पाण्यात उतरणं फायद्याचं वाटलं, स्कायडायव्हर्सना ते तोंडावर लावणं बेस्ट वाटलं, बेसबॉल प्लेअर ते ग्लोव्ह्जला लावत ज्यामुळे ते चामडं मऊ  राहात असे. असे विविध फायदे कळत गेले. वॅसलिनला मागणी वाढली. रॉबर्टने काही विक्रेते नेमून नव्या १२ बग्गी विक्रीसाठी घेतल्या. फुकट मिळणाऱ्या वॅसलिनकरता लोक एक-एक पेनी मोजू लागले. हॉस्पिलमध्ये सुद्धा वॅसलिन विक्री होऊ लागली.

आता आज घडीला वॅसलिन ब्रँड आहे. जखमा, खपल्या बऱ्या करणाऱ्या पेस्टला आज मार्केटमध्ये मानपान आहे. हिवाळा आल्यावर वॅसलिनची जाहिरात टीव्हीवर येणं स्वाभाविक असतं हेच या ब्रँडच यश आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.