इंग्लिश ग्रामरला घाबरून पोरं इंटरनेटवरनं निबंध कॉपी करतायत हे बघून या भिडूंनी ही आयडिया शोधली

इंग्रजांनी जेवढं नुकसान आपल्यावर १५० वर्षे राज्य करून केलं तेव्हडंच नुकसान त्यांनी त्यांची इंग्लिश भाषा भारतात ठेवून केलंय यावर तुमच्यापैकी अनेक जण सहमत होतील.  इंग्लिशच्या मास्तरांनी ग्रामरचे तक्तेच्या तक्ते पाठ करून घेतले पण ग्रामर कधी जमलं नाही.

कालांतराने इंग्लिश सुधारली मोडकी तोडकी बोलायला पण यायला लागली पण ग्रामर जे मागे राहिलं राहिलंच. ते काय सुधारायचं नाव घेईना. आता एकमेकांचे CV कॉपी करून नोकरी मिळवली खरी पण रोज जेव्हा कामावर मेल पाठवावे लागत होते तेव्हा मात्र पुन्हा वांदे. मग मदतीला आलं ग्रामेरली.

एक छोटाशा पॉप अप स्क्रीनवर असतोय जो आपली ग्रामरची बोंबाबोंब आपसूकच ठीक करतोय.

तर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या भिडूंसाठीच  ग्रामरलीचा शोध लागलाय. ग्रामरली या कल्पनेचा जन्म तेव्हापासून झाला जेव्हा ॲलेक्स शेव्हचेन्को आणि मॅक्स लिटवीन आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठ, युक्रेनमध्ये एकत्र गेले.

२००० मध्ये, जेव्हा इंटरनेट नुकतेच लोकप्रिय होऊ लागले, तेव्हा या दोन विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की जवळजवळ प्रत्येकजण इंटरनेटवरून निबंध डाउनलोड करत आहे हे कोणालाही कळत नाहीये.

बऱ्यापैकी आळस आणि त्यात ग्रामरची झकझक यामुळं हि पोरं लै ताण नं घेता सरळ कॉपी हाणत होती. अशा प्रकारे, विद्यार्थी स्वतःच्या क्रीटीव्हिटीचा उपयोग न करता नुसता नेट वरनं जश्याच्या तसं छापतायेत हे काय ह्या पोरांना पटलं नाही.

मग सुरवातीला शेवचेन्कोने विद्यार्थ्यांच्या मनातून ही कॉपीच फॅड काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर लिहायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे २००४ पर्यंत त्यांनी माय ड्रॉपबॉक्स नावाची सेवा सुरू केली. त्याने, लिटविन आणि इतर १५ लोकांसह, एक टीम तयार केली आणि या प्रकल्पावर काम केले. निबंधांसाठी साहित्यिक चोरी तपासणे ही सॉफ्टवेअरची मुख्य उपयुक्तता होती. ही एक शुल्क आकारलेली सेवा होती, आणि तरीही, २००७ पर्यंत ८०० विद्यापीठे हे उत्पादन वापरत होती.

माय ड्रॉपबॉक्ससाठी खूप मोठे यश होते कारण याशिवाय, संपूर्ण जगात फक्त एकच कंपनी समान तंत्रज्ञानासह व्यवसाय करत होती. 

त्याच वर्षी, शैक्षणिक प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध कंपनी, ब्लॅकबोर्डला उत्पादन विकले गेले.

माय ड्रॉपबॉक्स कंपनी विकत घेताना ब्लॅकबोर्डची अट अशी होती की लिटविनला पुढील दोन वर्षे त्यांच्यासाठी काम करावे लागेल लिटवीनने ऑफर स्वीकारली, परंतु ज्या दिवशी ब्लॅकबोर्डशी करार संपला त्याच दिवशी तो आपला मित्र शेवचेन्कोसोबत काम करण्यासाठी टोरोंटोला पळून गेला. आत त्यांनी कॉलेजच्या मित्रांचा दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह कऱण्याचा ठरवत ग्रामरमध्ये मदत करण्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. आणि काही दिवसात, त्यांनी त्यांचे नवीन उत्पादन, Grammarly लाँच केले.

Grammarlyचा सर्वात चांगला भाग म्हणजे ते केवळ व्याकरणाच्या चुका किंवा विरामचिन्हांच्या चुका  शोधात नाही तर चुकीची वाक्ये देखील शोधते. त्याचबरोबर ते वापरकर्त्याला त्यांच्या चुका सुधारण्यासाठी काही पर्यायही सुचवते आणि कुठे चूक झाली याचे योग्य स्पष्टीकरण देखील देते.

२०१२ मध्ये, कंपनीने सुमारे $१० दशलक्ष कमावले Grammarly चे सुमारे १० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. २०१७ मध्ये, कंपनीने जनरल कॅटॅलिस्ट, IVP आणि स्पार्क कॅपिटल कडून $११० दशलक्ष देखील उभे केले आहेत.

बाकी कंपनीची उलाढाल जोरात चालू आहे आणि तिच्या जीवावर आपलं इंग्लिशपण.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.