चिमुटभर पावसात पाण्याखाली जाणाऱ्या भिडे पुलाचा इतिहास माहित आहे का ? 

नदीच्या दोन्ही टोकांना जोडण्याच काम पूल करतो. शाळेच्या पाठ्यपूस्तकातून पुल नावाची संकल्पना समजावून सांगण्याची गरज कधी भासली नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही गावात गेलात की पाच किलोमीटरच्या परिसरात एखादा पूल तरी दिसतोच.

काही पूल नद्यांवर असतात तर काही नाल्यांवर. काही ओढ्यांवर तर वाळूच्या वाळवंटात. पण पूल महत्वाचा. कारण पूल फक्त माणसचं जोडत नाही तर संस्कृती जोडतो. 

पुण्यात देखील असाच एक पूल आहे. दरवर्षीच्या चिमुटभर पावसात सर्वात पहिला पाण्याखाली जाण्याचा मान या पुलाला मिळतो.

खडकवासला धरणातून जेव्हा पाणी सोडण्यात येते तेव्हा कालपर्यन्त नाला वाटणारी एका रात्रीत नदी होते, आणि हा पूल पाण्याखाली जातो. 

 

फोटो क्रेडिट : अभय कानविंदे

गंम्मत अशी की बाहेरच्या लोकांना पूल पाण्याखाली गेला म्हणजे प्रचंड पाऊस झाला अस वाटतं. पण पुण्यात सगळ्याचं गोष्टींना अपवाद असतो. तसाच हा भिडे पूल. नदी पात्रापासून साधारण १०-१२ फुट उंचावर असणारा पूल. साधारणं नदी जेव्हा नाल्याच्या स्वरूपात वहात असते तेव्हा दोन ते तीन फूटांच्यावर पाणी असतच. त्यावर जास्तीत जास्त आठ-दहा फुट उंचीवर असणारा हा पूल. 

इतिहासात सांगितलं जातं की,

डेक्कन परिसरातून पेठांच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वीच्या काळी चार कॉजवे होते. आजचा जो संभाजी पूल अर्थात लकडी पूल आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन कॉजवे अस याचं स्वरूप होतं. एकीकडे गरवारे कॉलेज आणि पांचाळेश्वर तर दूसरीकडे पूलाची वाडी आणि सध्याच्या भिडे पूलावर हे कॉजवे होते. 

फोटो क्रेडिट : अभय कानविंदे

आत्ता झालं अस की १९९२-९३ च्या सुमारास पेठा विस्तारल्या, पुणे वाढू लागलं आणि दूचाकी आणि चारचाक्यांची वर्दळ वाढू लागली. कॉजवे उपयोगात येईनात म्हणून संभाजी पूलाच्या एका बाजूला पुना हॉस्पीटलपासून एक पूल बांधण्यात आला तर दूसरीकडे डेक्कन जिमखाना ते सध्याच्या मनसे ऑफिसदरम्यान Z अक्षरात दूसरा पूल बांधण्यात आला. हे दोन्ही पूल फक्त दूचाकींसाठी ठेवण्यात आले. संभाजी पूल अर्थात लकडी पूल फक्त चारचाकींसाठी राखीव ठेवला आणि पूर्वींपासून असणाऱ्या चार कॉजवे मधील तीन कॉजवे मोडून टाकण्यात आले. 

पण पुणेकरांना Z ब्रिज म्हणजे वळसा घालून जाण्याचा प्रकार वाटू लागला. नारायण पेठेतून येणाऱ्यांसाठी Z ब्रिजवर गाडी घेवून जाणं आणि उगीच वळसा घेणं चुकीचं वाटू लागलं. त्यामुळेच भिडे पुलाच्या ठिकाणी असणाऱ्या कॉजवे वरची वर्दळ कायम राहिली. उलट ती वाढू लागली. 

१९९६ साली कॉजवे पाडून इथे छोटा पूल बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. २४ जून २००० साली विधानपरिषद विरोधी पक्षनेते नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं उद्धाटन करण्यात आलं. नारायण पेठेचे तत्कालीन नगरसेवक विकास मठकरी यांनी ही मागणी जोर लावून धरली व कॉजवे पाडून हा पूल बांधण्यात आला. 

पुलाचं नामकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघाचे जेष्ठ नेते बाबा भिडे यांच्या नावाने करण्यात आले. 

रहदारीसाठी मोठे पूल आहेतच. पण सोयीसाठी एखादा खुश्कीचा मार्ग असावा म्हणून हा पूल बांधण्यात आला. झेड ब्रीजवरून जाण्याऐवजी भिडे पूलावरून गेल्यास पेट्रोलमध्ये 0.003 मिली लिटरची बचत होत असल्याची जाणीव पुणेकरांना झाली. शिवाय वेळेत देखील चक्क २ सेकंद वाचू लागल्याने पूल फेमस झाला. 

फोटो क्रेडिट : अभय कानविंदे

आत्ता पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असला तरी पूणेकरांना याचं वाईट वाटतं नाही. उलट पुल पाण्याखाली गेला म्हणजे सिंहगड हिरवागार झाला हे मोजण्याचं गणित पुणेकरांनी मांडलं. दरवर्षी चिमुटभर पाण्यात पाण्याखाली जाणाऱ्या या पूलास मनापासून सॅल्यूट. 

फोटो : अभय कानविंदे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.