इंग्रजांना हाकलण्यासाठी अफगाण राजाला भारतावर स्वारी करायला लावायचा प्लॅन बनला होता?

भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतातल्या नेत्यांनी जेवढे खटाटोप केले तेवढे जगात इतर कुठल्याच राष्ट्रवादी चळवळीत झाले नसतील. जगात उपलब्ध असणारे सगळे मार्ग भारताच्या स्वातंत्र्यासाठी वापरले गेले होते. यामध्ये सैनिकांच्या उठावापासून ते राणीला निवेदन देण्यापर्यंत, हिटलरची मदत मागण्यापासून ते अधिकाऱ्यांना ठार करण्यापर्यँत, उपोषणे करण्यापासून ते लूटमार करेपर्यंत अनेक गोष्टी करून झाल्या होत्या.

पण एकेकाळी ब्रिटिशांच्या तावडीतून भारत सोडवण्यासाठी देशातल्या मोठमोठ्या नेत्यांनी चक्क एका मुसलमान राजाची मदत घेतली होती.

या राजाने भारतावर आक्रमण करून इथून ब्रिटिशांना हुसकावून लावावे असा प्लॅन यामागे होता.

या मोहिमेत ज्याची मदत होणार होती तो माणूस होता अफगाणिस्तानचा अमीर. अमीर अमानुल्ला. अफगाणिस्तानचा १९१९–२९ या काळातील तो सर्वसत्ताधीश होता. ७ वर्षे त्याने अफगाणिस्तानवर आपली सत्ता गाजवली.

ब्रिटिशांचा कट्टर वैरी म्हणून त्याला ओळखलं जाई. आज पाकिस्तानात असणाऱ्या वझिरीस्तान भागासाठी त्याच्यात आणि ब्रिटिशांमध्ये सतत मुकाबले होत असत.

त्या काळात भारतात लोकमान्य टिळक काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. देशभरात त्यांच्या नावाने सभा उभारलय जात आणि आंदोलने होत. टिळक हे जगाच्या राजकारणावर लक्ष ठेवून असत. जगातील विविध देशांमध्ये काय सुरु आहे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्याची काय मदत होऊ शकेल याचा ते सदोदित विचार करत असत.

म्हणूनच ब्रिटिश साम्राज्याच्या सगळ्याच शत्रुंना त्यांनी आपला मित्र मानले होते.

ब्रिटिशांनी जेव्हा आयर्लंडवर प्रचंड अत्याचार केले तेव्हा तेथील एका विदुषीला सोबत घेऊन त्यांनी भारतीय स्वतंत्र्यासाठी मोठी चळवळ उभारली. त्या विदुषी होत्या ऍनी बेझंट. होमरूल चळ्वळीतच त्यांची दूरदृष्टी आणि जगाच्या राजकारणाचा फायदा करून घेण्याची त्यांची दृष्टी स्पष्ट झाली होती.

त्याच वेळी अफगाणिस्तानमध्ये अमिराती आणि इंग्रजांचा झगडा सुरु झाला. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीअमीर अमानुल्लाने १९१९ मध्ये इंग्रजांबरोबर युद्ध सुरू केले होतं. यालाच तिसरं इंग्रज–अफगाण युद्ध म्हणून ओळखले जाते. याचे पडसाद जगभर उमटत होते. 

मराठ्यांच्या इतिहासापासून महाराष्ट्राचं अफगाणिस्तानाशी नातं होतं. नेतोजी पालकर हे मुघलांसोबत असताना त्यांनी अफगाणिस्तानात मोठा पराक्रम गाजवला होता. मुहम्मद कुलीखान नाव धारण केल्यावर ते काबुल आणि कंदहारमध्ये पठाणांविरुद्ध लढले होते. तेव्हा गांधार हा मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचाच भूभाग मानला जाई.

काबुल सुभा हा भारताचाच भाग असल्याचे मानून अटकेच्या लढाईत मराठ्यांनी तेथूनही महसूल गोळा केला होता.

ज्याप्रमाणे नजीबखानाने मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी भारतावर स्वारी करायला अफगाणिस्तानच्या अबदलालीला बोलावले होते . त्याचप्रमाणे अशी खेळी परत खेळून ब्रिटिशाना भारतातून हुसकावून लावायचे अशी योजना बनवली गेली.

यात लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि अरविंद घोष या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. 

याची मूळ योजना भाई परमानंद यांनी आखली होती. भाई परमानंद हे लाहोर येथून अनेक चालवली चालवत असत. त्यांनी अफगाणिस्तानच्या अमिराशी संपर्क केला होता. अफगाणिस्तानच्या अमिराने आपले सैन्य भारतात घुसवून ब्रिटिशांना पळवून लावायचे असा हा कट होता.

याच्या मोबदल्यात सरहद्द प्रांतातील सिंधू नदीपलीकडचा सर्व प्रदेश असणारा (सध्याचा बहुतेक पाकिस्तान) हा पूर्णपणे अफगाणिस्तानला जोडला जाणार होता. सिंधूच्या अलीकडचा भाग भारताकडे राहील अशी तरतूद करण्यात आली होती.

या योजनेत भारतातील मुसलमानांनी अफगाणिस्तानात जायचे आणि सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या सर्व हिंदू नागरिकांनी अफगाणिस्तान सोडून भारतात यायचे अशी योजना यात होती. डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पुस्तकात या योजनेचा सविस्तर आढावा दिला आहे.

या योजनेची टिळकांना संपूर्ण कल्पना होती. अफगाणिस्तानच्या अमिर हा लोकमान्य टिळकांना भेटण्यासाठी पुण्यात येणार होता. या योजनेवर विश्वास ठेवून ती तडीस लावण्याचे टिळकांनी ठरवले होते.

म्हणून त्यांनी याची पूर्ण जबाबदारी ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्यावर सोपवण्यात आली. पुण्यातील नागरिकांकडून त्यांचा सत्कार करायचा आणि त्याचाशी सल्लामसलत करून ही मोहीम पार पडायची असं टिळकांनी ठरवलं होतं.

पण या योजनेची कुणकुण ब्रिटिशांना लागली होती. रशिया किंवा अफगाणिस्तानच्या बाजूने भारतावर हल्ला होईल असे त्यांना सुरुवातीपासून वाटत होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगली आणि अफगाणिस्तानच्या अमिराला त्यांनी पुण्यात येऊच दिले नाही.

त्यामुळे या योजनेचा बहुतेक प्लॅन बारगळला. पण तरीही टिळकांनी अफगाणिस्तानच्या अमिराशी पुन्हा संपर्क केला होता. यावेळी त्यांनी अमिराला पुण्यातील नागरिकांकडून देण्यात येणारे मानपत्र पोचते केले होते.

हिंदुत्वनिष्ठांप्रमाणे टिळक मुसलमानांना भीत नव्हते. त्यामुळे स्वदेशी अथवा परदेशी मुसलमानांची मदत घेऊन ब्रिटिशांना भारताच्या बाहेर घालवून देण्यात त्यांना कोणतीही अडचण वाटत नव्हती

असा खुलासा डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पुस्तकात मांडला आहे.

अ. ज. करंदीकर यांनीही या विषयावर भाष्य केले आहे.  नथूराम गोडसे आणि नारायण दत्तात्रय आपटे यांनी चालविलेल्या ’अग्रणी’ या मराठी दैनिकात त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या मते, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल,भाई परमानंद आणि अरविंद घोष या मोठ्या नेत्यांनी याची मूळ योजना आखली होती. पण त्यांनी ही योजना टिळकांपासून लपवून ठेवण्यात आली होती असं म्हंटल आहे. 

‘प्रज्ञालोक’चे प्रधान संपादक डॉ. ब. स. येरकुंटवार यांनीही आपल्या लेखनात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. पण त्यांचं मत अ. ज. करंदीकर यांच्या पूर्ण विरोधात आहे. त्यांच्या मते टिळकांना या कार्यक्रमाची पूर्ण कल्पना होती. 

एका हिंदुत्ववादी लेखकाने तर या सगळ्या कटाचा दोष महात्मा गांधीजींना दिला आहे. ‘गांधी-मुस्लिम कॉन्स्पिरसी’ या नावाने हे पुस्तक लिहिलं आहे. जीवाला धोका असल्याच्या भयाने सदर लेखकाने आपलं नाव ‘एक हिंदू राष्ट्रवादी’ एवढंच छापलं आहे. १९४१ साली मुंबईवरून प्रकाशित झालेल्याया पुस्तकात ही योजना गांधीजी आणि त्यांच्या मुस्लिम सहकाऱ्यांनी राबवली होती अशी मांडणी केली आहे.

अर्थात याचा उल्लेख त्या पुस्तकातच केलेला आढळतो. पण लवकरच ही योजना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग बंद झाला.

अफगाण आणि इंग्रज यांच्यात नंतर झालेल्या युद्धानंतर एक तह करण्यात आला. त्यामुळे परिस्थिती अचानकच बदलली. तहानुसार इंग्रजांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रीय संबंध नियंत्रित करण्याचा आपला अधिकार सोडून दिला. त्याचबरोबर त्यांनी अफगाणिस्तानला देण्यात येत असलेली आर्थिक मदतसुद्धा बंदकरून टाकली.

स्वतंत्र अफगाणिस्तानचे नवे संविधान अमानुल्लाने तयार केले. त्याने १९२७ मध्ये यूरोपचा दौरा केला व परत येताच पाश्चात्त्य पद्धतींवर अफगाणिस्तानात सामाजिक सुधारणा घडवत  सक्तीचे प्राथमिक शिक्षण, पडदा-पद्धत बंद करणे इ. सुधारणा केल्या. पण यामुळे सनातनी समाज नाराज झाला. अफगाणिस्तानात यादवी सुरू झाली.

याचा परिणाम म्हणून आमिराला देश सोडून जावे लागले. भारतात आश्रय घेण्याचा त्याचा प्रयत्नही फसला. कोणत्याच नेत्याशी त्याचा संपर्क झाला नाही. १९२९ मध्ये अमानुल्लाला राज्यत्याग करून इटलीमध्ये शरण घ्यावी लागली. मृत्यूपर्यंत तो तेथेच होता.

काही इतिहासकारांच्या मते ही योजना अमीनुल्ला नव्हे तर त्यापूर्वीच अमीर हबिबुल्ला खान याच्या काळात राबवण्याचा टिळकांचा प्रयत्न होता. अर्थात अमीर हबिबुल्ला खान याने ब्रिटिशांशी १९०५ सालीचा मित्रत्वाचा करार केला होता. त्यामुळे यासंबंधी साशंकता आहे.

जर त्याने भारतावर स्वारी केली असती तर भारताचा इतिहास निश्चितपणे वेगळा घडला असता.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.