विरोधानंतर बुलेट ट्रेनचं काम रुळावर, सुरतमधल्या पहिल्या स्टेशनचा आराखडा रेडी झालाय

भारतात अगदी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी देशभरातून सर्व भारतीयांना एकत्र आणण्यापासून ते अगदी स्वातंत्र्यानंतर देशाला एकत्र बांधून ठेवण्यापर्यन्त रेल्वेने मोठी कामगिरी बजावली आहे. रेल्वेच्या किफायतशीर भाड्यामुळं रेल्वे लाखो भारतीयांसाठी दळवळणाचं प्रमुख साधन आहे. मात्र रेल्वेच्या तिकिटाच्या किंमती जेवढ्या कमी वेगाने वाढल्या तेवढ्याच कमी वेगाने रेल्वेचं आधुनिकीकरण झालं अशी टीका करण्यात येत होती. मग मोदी सरकारनं रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाऊलं उचलत बुलेट ट्रेन आणण्याची घोषणा केली.

त्यानुसार मुंबई -अहमदाबाद या प्रकल्पाची बुलेट ट्रेनसाठीचा पहिला प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली.

त्यानुसारच मग सप्टेंबर २०१७ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबादमधील साबरमती येथे १.१ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. मात्र या प्रकल्पाला विरोधही होत होता. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा हा घाट आहे असं म्हणत मेट्रोच्या बांधकामाची एक वीटही उभार राहू देणार नाही अशा वल्गना राजकीय पक्षांकडून करण्यात येत होत्या. मात्र हे सगळे आता मागे सारत बुलेट ट्रेन धावणार हे नक्की झालं आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर अहमदाबाद, सुरत, साबरमती, वडोदरा, आनंद, बिलीमोरा, भरूच, विरार, बोईसर, वापी, मुंबई, ठाणे या एकूण १२ स्थानकांचा समावेश असेल.

काही दिवसांपूर्वी, रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी एक ट्विट केलं होतं की गुजरातमधील सुरत हे शहर नेहमीप्रमाणेच नवीन पायंडा पाडेल तसेच देशाच्या प्रगतीला नवीन उंचीवर नेईल. सुरत शहरातील आगामी HSR स्टेशन हे देशातील पहिल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्प अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर तयार होणारे पहिले स्टेशन बनेल, असे त्यांनी सांगितले होते.

आता त्यांनी या स्टेशनचं प्रतीकात्मक मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत.

डायमंड सिटी सुरतच्या नावाला साजेशी असं स्टेशनचं डिझाइन बनवण्यात आले आहे.  याचबरोबर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL), जे देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे, नुकतेच लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (L&T) सोबत डिझाइनसाठी तसेच सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्टच्या बांधकामासाठी करार केला आहे.

या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२६पर्यंत सूरत आणि बिलीमोरा दरम्यान सुरू होईल.
या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ २.०७ तास (मर्यादित थांबे), २.५८ तास (स्थानकांवर थांबणे) कमी होईल. बुलेट ट्रेन जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावर चालवली जाईल, जी त्याच्या विश्वासार्हता आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ट्रेनचा कमाल डिझाईन स्पीड- ताशी ३५० किमी असेल आणि कमाल ऑपरेटिंग स्पीड ३२० किमी प्रति तास असेल.

मात्र या प्रकल्पाचे फक्त दोन स्टेशनं महाराष्ट्रात असल्याने याचा महाराष्ट्राला किती फायदा होईल असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळं या प्रकल्पावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कंमेंट करून जरूर सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.