एअरहोस्टेसनंतर तिच्या आईनेही आत्महत्या केली पण तरीही आरोपी नेता निर्दोष सुटलाच.

दिल्लीत ५ ऑगस्ट २०१२ रोजी एक २३ वर्षीय एअरहोस्टेस कागद आणि पेन हातात घेऊन टेबलवर बसली. टेबलवर बसल्या बसल्या तिनं एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत तिनं हरयाणातल्या एका वजनदार नेत्याचं नाव लिहिलं. त्यानंतर राहत्या फ्लॅटमध्ये तिनं गळफास घेत आत्महत्या केली. ऐन तारुण्यात आत्महत्या करणाऱ्या त्या एअरहोस्टेसचं नाव होतं गितिका शर्मा… 

गितिकानं जी चिठ्ठी लिहिली होती ते सुसाईड नोट होतं. सुसाईड नोटमध्ये गितिकानं ज्या वजनदार नेत्याचं नाव लिहिलं होतं, त्या नेत्याला आता दिल्लीतल्या न्यायालयानं निर्दोष मुक्त केलंय. त्यानंतर गितिकाच्या भावानं न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ‘न्यायालयाच्या निकालानं पायखालची जमिन सरकली, आम्ही निशब्द झालोय’, अशी प्रतिक्रिया गितिकाच्या भावानं दिली आहे. गितिका शर्मा आत्महत्या प्रकरण २०१२ मध्ये देशात चांगलंच गाजलं होतं. गितिका शर्मा आत्महत्या प्रकरण नेमकं काय आहे ? ते आपण समजून घेणार आहोत. 

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं वयाच्या १७ व्या वर्षी गितिका नोकरीच्या शोधात होती. लहानपणापासून गितिकानं एअरहोस्टेस व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. नोकरी शोधताना गितिका MDLR एअरलाईन्स या कंपनीत ट्रेनी म्हणून काम करु लागली. हि कंपनी होती हरयाणातले सीरसाचे आमदार गोपाल कांडा यांची. 

एअरहोस्टेस बनायचं स्वप्न बाळगून असलेली गितिका हि दिसायला सुंदर होती. त्यामुळे ती १८ वर्षांची झाल्यानंतर तीला कंपनीकडून एअरहोस्टेस बनवण्यात आलं. आमदार गोपाल कांडा यांच्या एअरलाईन्स कंपनीत गितिकाची दिवसेंदिवस प्रगती होत होती. गोपाल कांडा यांच्या MDLR एअरलाईन्स कंपनीत तरुण मुलींना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात होती. त्या मुलींपैकीच गितिका एक होती. पण गितिकाला एकानंतर एक भराभर प्रमोशन मिळत गेले. 

MDLR एअरलाईन्समध्ये गितिका अवघ्या ३ वर्षात डायरेक्टर या पदापर्यंत पोहोचली होती. गितिकाला मिळणाऱ्या प्रमोशनमध्ये गोपाल कांडांचा हात असल्याचं सांगण्यात यायचं.

एकिकडे गितिकाच्या सहकाऱ्यांना तिची प्रगती दिसत होती, पण गितिका मात्र वेगळ्याच तणावात होती. गितिकानं २०११ मध्ये गोपाल कांडा यांची कंपनी सोडून दुबईत नोकरी मिळवली होती. पण त्यानंतर गोपाल कांडा यांनी थेट गितिकाचं घर गाठलं. तिच्याकडे कंपनीत पुन्हा रुजू होण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर गितिका पुन्हा एकदा गोपाल कांडा यांच्या कंपनीत काम करायला लागली होती.

 तिने तेव्हा कांडा यांच्या कंपनीत काम करायला नकार दिला असता तर कदाचित आज ती जीवंत असती, असं गितिकाचे वडिल दिनेश शर्मा सांगतात. 

तणावात असलेल्या गितिकानं ५ ऑगस्ट २०१२ रोजी दिल्लीतल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी तीच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. 

‘त्यांनी मला स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन घेतलं. माझं जीवन उध्वस्त केलं. हे लोक माझ्या परिवाराला उध्वस्त करतायेत. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे’

असं गितिकानं तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. तिनं गोपाल कांडा यांनी लैंगिक शोषण केल्याचंही सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. गितिकानं सुसाईड नोटमध्ये गोपाल कांडा व MDLR एअरलाईन्सच्या मॅनेजर अरुणा चढ्ढा यांचा उल्लेख केला होता.

गितिकाच्या आत्महत्येनंतर ८ ऑगस्ट रोजी गोपाल कांडा यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. 

गोपाल कांडा हे त्यावेळी हरयाणातील काँग्रेस सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. गितिका शर्मा आत्महत्या प्रकरणानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अखेर १८ ऑगस्ट रोजी कांडा यांनी आत्मसमर्पण करत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोपाल कांडा यांना या प्रकरणात १८ महिने तिहार जेलमध्ये कारावास भोगावा लागला होता. २०१४ मध्ये कांडा यांची कारावासातून सुटका झाली होती.

गितिकाच्या आत्महत्येनंतर तिची आई अनुराधा शर्मा यांनी गितिकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. पण गोपाल कांडा यांच्या राजकीय प्रभावामुळे गितिकाची आई दबावात आली होती. गितिकाच्या आत्महत्येनंतर ६ महिन्यातच गितिकाच्या आईनेही आत्महत्या केली होती. गोपाल कांडा व त्यांचे सहकारी आपल्या कुटुंबावर दबाव टाकतायेत, असं गितिकाची आई अनुराधा शर्मानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

गितिका शर्माच्या आत्महत्या प्रकरणाचा खटला दिल्लीतल्या राऊज अवेन्यू कोर्टात सुरु होता. गोपाल कांडा यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्यानं त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येतंय, असं न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालपत्रात म्हटलंय. 

तब्बल ११ वर्षांनंतर २५ जुलै २०२३ रोजी या प्रकरणाचा निकाल लागलाय. 

दरम्यान, या प्रकरणाचा गोपाल कांडा यांच्या राजकीय भवितव्यावर फार काही परिणाम झाला नव्हता. २०१९ मध्ये कांडा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. गोपाल कांडा हे सध्या सीरसाचे अपक्ष आमदार आहेत. 

त्यांनी हरयाणा लोकहित पार्टीची स्थापना केली आहे. कांडा यांचा पक्ष भाजपप्रणित एनडीएचा मित्रपक्ष आहे. गितिका शर्मा आत्महत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर कांडा यांना भाजपने ऑफर दिली आहे. कांडा हे त्यांच्या पक्षाचे हरयाणातले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं हरयाणाचे भाजप प्रवक्ते संजय शर्मा यांनी म्हटलंय.  

तिकडे गितिकाच्या कुटुंबाला मात्र न्यायालयाच्या निकालानं मोठा धक्का बसलाय. आम्ही निकालानं खूप निराश आहोत. आम्हाला आशा होती की निकाल आमच्या बाजूनं येईल. हि केस पुर्णतः स्पष्ट होती. कांडाने माझ्या बहिणीचं शोषण केलं होतं आणि तिला आत्महत्येसाठी उकसवलं होतं, हे मेसेजेसवरुन स्पष्ट होतं. 

पण गोपाल कांडा हा दबंग प्रवृत्तीचा असल्यानं हे सगळं होतंय, अशी प्रतिक्रीया गितिकाचा भाऊ अंकित शर्मानं दिलीये. तर गोपाल कांडा यांनी निर्दोष मुक्त झाल्यानंतर म्हटलंय कि माझ्याविरोधात एकही पुरावा नव्हता. हे प्रकरण फक्त आणि फक्त बनवण्यात आलं होतं. हे का आणि कोणत्या विचारानं बनवण्यात आलं ते आज न्यायालयानं सांगितलंय. ते सगळ्यांच्या समोर आहे, असं गोपाल कांडा यांनी म्हटलंय. 

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.