युपीमध्ये महागठबंधन तुटण्यामागे खूप वर्षापूर्वी झालेलं मायावती गेस्टहाऊस कांड आहे

परवा अख्ख्या इंडियावर एक बॉम्ब पडला. ह्याची कुणकुण होतीच म्हणा. मोदींना हरवण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये एकत्र आलेले सपाची सायकल आणि बसपाचा हत्ती यांचा पराभवानतर एक महिन्याच्या आत घटस्फोट झाला . खरं तर गेली कित्येक वर्षे बहेनजी मायावती आणि मुलायमसिंह यांच्या दुश्मनीच्या चर्चा गल्ली पासून दिल्ली पर्यंत होत्या. तरीही मायावती आणि अखिलेश यादव ही बुवा भतीजाची जोडगोळी लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली.

लोक म्हणत होते सूर्य पश्चिमेला उगवला की काय? काही वर्षापर्यंत तर यांच्यात विस्तव जात नव्हता. काय होती यांच्यात नेमकी भांडण?

१५ जानेवारी १९५६ रोजी एका दलित कुटुंबात मायावतीचा जन्म झाला. वडील पोस्टात कामाला होते. पोरीला त्यांनी शिकवलं. पोरगी पण हुशार निघाली. बी.ए. केलं मग बी.एड. करून शाळेत शिक्षिकेची नोकरी पकडली आणि युपी बिहारच्या प्रत्येक गरीब मुलाप्रमाणे आयएएस बनण्यासाठी युपीएससीच्या अभ्यासाच्या खस्ता खाऊ लागली. याच दरम्यान दलित चळवळीतले नेते कांशीराम यांच्या संपर्कात ती आली. त्यांना मायावतीच्या क्षमतेच अंदाज आला. त्यांनी तिला वचन दिले,

“मै तुम्हे ऐसा नेता बनाउंगा तुम्हारे आगे ऐसे द्सियो IAS सर झुका के खडे रहेंगे.”

मायावती शिक्षिकेची नोकरी सोडून राजकारणात आली. कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. १९८९ मध्ये मायावती लोकसभेमध्ये निवडून आली. तिला कांशीरामनी आपला उत्तराधिकारी घोषित केले.

त्याकाळात लालकृष्ण अडवाणींची अयोध्येत राममंदिर व्हावे यासाठी रथयात्रा जोरात सुरु होती. या पार्श्वभूमीवर जनता दलाचे तुकडे पडून त्यातून मुलायम सिंग यादवांनी समाजवादी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येत बाबरी मशीद पडली आणि देशाचे राजकारण बदलले ते कायमचे.

केंद्रातल्या नरसिंहराव यांनी युपीच्या त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या कल्याणसिंह यांचे सरकार बरखास्त केले, राष्ट्रपती राजवट लागू केली. १९९३ च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा रथ रोखण्यासाठी सपा आणि बसपा एकत्र आले. समाजवादी पक्षाचे १०९ तर बसपाचे ६७ आमदार निवडून आले. मुलायम सिंह यादवांना मुख्यमंत्री करण्यात आलं. बसपा सरकार मध्ये गेली नाही बाहेरून पाठिंबा दिला.

सार काही आलबेल चालू होत. पण एक दिवस बातमी आली मायवती भाजपाच्या गळाला लागल्या. युती तुटणार. यादव मंडळीची डोकी फिरली.

२ जून १९९५ ला दुपारी लखनौच्या मीरा गेस्ट हाउसच्या रूम नंबर १ मध्ये मायावतीनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिटिंग बोलावली होती. बसपाचे आमदार मायावतींच्याबरोबर पक्षाची पुढील वाटचाल ठरवत होते. अचानक बाहेर गलका सुरु झाला.

समाजवादी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते तिथे गोळा झाले होते. त्यांनी गेस्टहाउसवर हल्ला केला. दिसेल त्या बसपा कार्यकर्त्याची जोरदार पिटाई करण्यात आली. यातून आमदारही सुटले नाहीत. अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले, ज्यांना जमले नाही ते लाथा बुक्क्याचा मार खाऊन रक्तबंबाळ झाले.

गेस्ट हाऊस सपाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात गेले होते.

पण मायावती कुठे होत्या?

मायावतींना एका खोलीत लपवले होते. सपाचे गुंड बाहेरून जोरदार शिवीगाळ करत धडका देत होते. काही जण तुम्हाला वाचवण्यासाठी आलोय दार उघडा असं सांगत होते. पण दार उघडले नाही. दार तुटले तरी आत कोणाला येता येऊ नये म्हणून कपाटखुर्च्या दाराशी लावण्यात आल्या.

अनेक तास मायावती आत राहिल्या. बाहेर मिडिया पत्रकार जमा झाले होते. बसपाचे नेते पोलीस तिथे यावेत म्हणून मोठमोठ्या अधिकाऱ्याना फोन करत होते पण कोणीच फोन उचलला नाही. शेवटी पत्रकारांच्या दबावामुळे सपाचे कार्यकर्ते हळूहळू तिथून निघून गेले.

जीवावर बेतलेल पण मायावती थोडक्यात बचावल्या. पण हा हल्ला त्या कधी विसरल्या नाहीत. 

भाजपाचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री बनल्या. पुढे तब्बल सत्तावीस वर्षे साप मुंगुसासारखे सपा आणि बसपा हे दोन्ही पक्ष भांडले.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर दोन्ही पक्षाची वाताहत झाली. विधानसभेच्या निवडणुकीत सपशेल पराभव झाला, भाजपचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले, तेव्हा कुठे हत्ती आणि सायकलीचे डोळे उघडण्यास सुरवात झाली. मागच्या वर्षी कैराना आणि आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मधल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले. मुलायमसिंह यादव याच्या विरोधात होते पण पुत्र अखिलेशने युती साठी एक पाउल पुढे टाकले.

कैराना आणि गोरखपूरचा प्रयोग यशस्वी ठरला. भाजपाचे हे दोन्ही बालेकिल्ले पडले. आता मोठ्या निवडणुकीतही महागठबंधन होणार अशी चर्चा सुरु झाली. मोदी आणि अमित शहा हे होऊ नये यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. ऐनवेळी काँग्रेस या गठबंधन मध्ये असणार नाही ही बातमी आली. आता सपा बसपा हे तर पुर्वापारचे विरोधक. काहीना काही कारणाने यांची युती विस्कटणार याची सगळ्यांना छातीठोक खात्री होती.

पण तरीही लोकसभा निवडणुकीपूर्वी सगळे योग जुळून आले. अखिलेश यादव आणि मायावतींनी जाहीर केलं की लोकसभेच्या जागा  निम्यानिम्या वाटून घेतल्या आहेत आणि भावकीतली भांडणे बाजूला ठेवून बाहेरच्या शत्रूला लढण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे. तेव्हासुद्धा मायावतींनी आपल्यावर झालेल्या गेस्टहाउस कांडाचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये केलाच. त्या म्हणाल्या गेस्ट हाउसकांडापेक्षा देश हिताला महत्व देऊन आम्ही एकत्र आलो आहे.

याचाच सरळ अर्थ होता गेस्ट हाउसवरचा हल्ला मायावती विसरणार नाहीत आणि निकालानंतर महागठबंधनचं भवितव्य खरे नाही.

आणि झालंही तसंच. निवडणुकीमध्ये भाजपाने या महागठबंधनचा प्रचंड मोठा पराभव केला. या पराभवानंतर मायावतींनी आपल्या भतीजाला टाटाबाय बाय केले. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.