तीस वर्षांपूर्वीची मैत्री विसरले नाहीत. दिवंगत मित्रासाठी ५ लाख रुपये उभारले

आज जागतिक मैत्री दिन. फ्रेंडशिप डेचा दिवस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मित्रांच्या सहवासात, त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करत असतो. मात्र असेही काही मित्र आहेत ज्यांनी दिवंगत मित्राच्या कुटूंबासाठी पाच लाखाचा निधी गोळा केलाय.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना गेल्या वर्षभरात अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. अनेक घरांमधील कर्त्या व्यक्तींचे कोरोनाने निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची उदाहरणेही समोर आली. अशा वेळी अनेक कुटुंबांना मित्र, आप्त-स्वकीय, सामाजिक संस्था आदींनी  मदतीचा हात पुढे केल्याने संबंधित कुटुंबांना धीर मिळाला. खास करून, व्हॉट्सअपसारख्या सोशल मिडियातून मित्रांच्या ग्रुपवर केलेल्या आवाहनाला सकारात्मक व भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले..

हृदय विकारा मुळे निधन झालेल्या वर्गमित्राच्या कुटुंबीयांना तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैत्रीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. नारायण कोळेकर (वय ४९) असे या वर्गमित्राचे नाव असून, हे सर्व मित्र तीस वर्षांपूर्वी एका वर्गात शिकत होते, हे विशेष.

पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या १९८९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्राच्या कुटुंबीयांना हा आधार देऊन मोलाची मदत केली आहे.

खरे तर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वच जण नोकरी, व्यवसाय किंवा अन्य बाबतीत आपापल्या जीवनात व्यस्त झाले होते. त्या काळी मोबाईल नसल्याने एकमेकांशी संपर्कासाठी पत्रव्यवहार हे एकमेव माध्यम होते. त्यामुळे निवडक मित्र संपर्कात राहत असले, तरी सर्व वर्गमित्रांचा संपर्क तुटलेलाच होता. मात्र मोबाईल, स्मार्ट फोनचा आणि त्यातही व्हॉट्सऍपच्या उदयामुळे अनेक जुने मित्र एकमेकांच्या संपर्कात आले. त्यातून व्हॉट्सऍप ग्रुप स्थापन होऊन आणखी संपर्क वाढून मैत्री दृढ होऊ लागली.

कृषी महाविद्यालयांमध्ये पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शिकत असलेल्या मित्रांचेही ग्रुप स्थापन झाले.

महाविद्यालयीन जीवनातील मैत्रीला पुन्हा धुमारे फुटले. त्यातील काही जण आधुनिक शेती करण्यात व्यस्त आहेत, तर काही नोकरी-व्यवसायात यशस्वी जीवन जगत आहेत. अनेक जण राज्य व केंद्र सरकारमध्ये उच्चपदस्थ म्हणूनही कार्यरत आहेत. त्यातच पुणे कृषी महाविद्यालयातील १९८९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ऍग्रीकॉस ८९ फौंडेशन स्थापन केले असून, त्यात या बॅचच्या दोनशेहून अधिक जणांचा समावेश आहे.

दरम्यान, याच ग्रुपचे सदस्य असलेले नारायण कोळेकर (वय- ४९, मूळ रा. खांबेवाडी, करमाळा, जि. सोलापूर) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले.

कोळेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कोळेकर हैदराबाद येथील फोराजेन सीड्स प्रा. लि. या कंपनीत ब्रीडर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांची एक मुलगी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत असून, दुसरी मुलगी कराड येथे फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. दोन्ही मुली हुशार असून, शिक्षण पूर्ण करून, वडिलांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

कोळेकर यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्यांचे वर्गमित्र आणि ऍग्रीकॉस ८९ फौंडेशनच्या सदस्यांनी या कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरविले. खास करून, कोळेकर यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागविता येईल, इतकी रक्कम जमवून त्यांना देण्याचे या वर्गमित्रांनी ठरविले. त्यासाठी व्हॉट्सऍप ग्रुपवर आवाहन केले.

या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. आपापल्या इच्छेनुसार सर्वांनी फौडेशनच्या बँक अकौंटवर कोळेकर मदतनिधी म्हणून रक्कम जमा केली. त्यातून आठच दिवसांत तीन लाख रुपये जमा झाले, परंतु ही रक्कम पुरेशी नसल्याचं मत काही सदस्यांनी व्यक्त केलं. त्यानंतर आणखी रक्कम जमा करण्यासाठी आणखी एक आठवड्याची मुदत देण्यात आली. या कालावधीत आणखी दोन लाख रुपये जमा झाले.

अशा एकूण पाच लाख रुपयांचा धनादेश नुकताच दिवंगत नारायण कोळेकर यांच्या कन्या धनश्री आणि वेदश्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या रकमेचा विनियोग शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी करणार असल्याचे सांगत धनश्री आणि वेदश्री यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या वेळी ऍग्रीकॉस ८९ फौंडेशनचे अध्यक्ष गुरुप्रसाद आगवणे यांच्यासह पदाधिकारी राजू रासकर, जगन्नाथ भोंग, दीपक रेंगडे, ज्ञानेश्वर आखाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, ऍग्रीकॉस ८९ फौंडेशनच्या माध्यमातून, विविध अडचणींमध्ये असलेल्या वर्गमित्रांना मदतीसह सामाजिक कार्य करण्याचाही प्रयत्न असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष गुरुप्रसाद आगवणे यांनी सांगितले.

WhatsApp Image 2021 08 01 at 11.56.24 AM

दिवंगत नारायण कोळेकर यांच्या कन्या धनश्री आणि वेदश्री यांच्याकडे पाच लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करताना ऍग्रीक़ॉस ८९ फौंडेशनचे पदाधिकारी.

शाळा कॉलेजमधील मैत्री पुढे टिकेल कि नाही असं अनेकांना वाटत असत. आपल्या करियरच्या दिशेने जाताना अनेकदा हि जुन्या आठवणीमध्येच राहते. पण कॉलेजनंतर तीस वर्षांनीही आपली मैत्री जपणारे व बांधिलकी पाळणारे हे मित्र म्हणजे याचंच उदाहरण आहेत.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.