भरत जाधव अन् केदार शिंदेची दोस्ती एका गाण्यावरुन तुटली असती पण…

भरत जाधव, संजय नार्वेकर, केदार शिंदे यांसारख्या कलाकारांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या हे त्रिकुट इतकं काम करत नसलं तरीही आजही ते येतात तेव्हा आपलं मनोरंजन करतात. केदार शिंदे , भरत जाधव यांची मैत्री तर आपल्या सर्वांना माहीत आहे. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमापासून हे दोघे एकत्र आहेत.

यानंतर ‘जत्रा’, ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘खो खो’ यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे आणि अभिनेता म्हणून भरत जाधव ही जोडी प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतली.

परंतु एक दिवस असा आला होता की दोघांच्या मैत्रीमध्ये मोठी दरार निर्माण होणार होती.

आणि कदाचित या दोघांची जोडी पुन्हा आपल्याला दिसली नसती.

‘सही रे सही’ नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी भरत जाधव आणि केदार शिंदे यांचं ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक आलं होतं. या नाटकाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

या नाटकातली विजय चव्हाण आणि भरत जाधव यांची बाप मुलाची जोडी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. दोघांच्या अफलातून अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. आजही नाटक युट्युब वर प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे.

या नाटकात भरत जाधवने गोड गोजिरी या गाण्यावर केलेला डान्स भयंकर लोकप्रिय झाला. विशिष्ट रीतीने पाय हलवत, हातवारे करत भरतने केलेला हा डान्स पाहिल्यावर भरपेट हसायला येतं.

या नाटकानंतर केदारने भरतला घेऊन ‘सही रे सही’ नाटक रंगभूमीवर आणण्याची तयारी सुरू केली. भरत जाधव या नाटकात एकापेक्षा अधिक बहुरंगी भूमिका साकारणार होता. सर्व उत्सुक होते. पण दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसं काहीसं झालं.

‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकात असलेलं गोड गोजिरी हे गाणं ‘सही रे सही’ मध्ये सुद्धा असावं अशी केदारची ईच्छा होती. सही रे सही मधील हरी हे पात्र या गाण्याने एन्ट्री घेईल अशी केदारची कल्पना होती.

परंतु भरतला हे मान्य नव्हतं. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, आता जरी ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक लोकप्रिय असलं तरी जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आलं होतं, तेव्हा या नाटकाला प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद दिला होता.

त्यामुळे एका नाटकात वापरलेलं गाणं पुन्हा वापरण्याच्या कल्पनेला भरतचा विरोध होता.

एकीकडे केदार मात्र स्वतःच्या निर्णयावर ठाम होता. तर दुसरीकडे ‘गोड गोजिरी’ या गाण्यावर पुन्हा नाचणार नाही या मतावर भरत अडून बसला होता. एकमेकांविरोधी मतांमुळे शब्दाला शब्द वाढत गेला.

दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली. आणि शेवटी भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटक सोडण्याचा निर्णय घेतला.

दोन जीवलग मित्रांमध्ये भांडण झाली की तिसरा मित्र ते भांडण सोडवायचा प्रयत्न करतो. या दोघांच्या भांडणाच्या वेळेस सुद्धा या दोघांचा खास मित्र अंकुश चौधरी मध्ये आला. अंकुश, भरत, केदार हे गेली अनेक वर्ष सोबत आहेत. केदारच्या अनेक सिनेमांसाठी अंकुशने सहाय्यक म्हणून काम केलं आहे. जेव्हा अंकुशच्या कानावर दोघांच्या भांडणाची गोष्ट गेली तेव्हा तो या दोघांना जाऊन भेटला.

दोघांचं मन न दुखावता काहीतरी सुवर्णमध्य काढणं गरजेचं होतं.

अंकुशने नेमकं तेच केलं.

“आपण शुभारंभाच्या प्रयोगाला हे गाणं सही रे सही मध्ये ठेवायचं आणि जर पहिल्या प्रयोगात या गाण्यात प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही तर पुढच्या प्रयोगापासून हे गाणं काढून टाकायचं.”

असा तोडगा अंकुशने काढला. केदार-भरत दोघंही अंकुशच्या या म्हणण्यावर तयार झाले. आणि शुभारंभाचा प्रयोग अखेर मार्गी लागला.

१५ ऑगस्ट २००२. ‘सही रे सही’ चा शुभारंभाचा प्रयोग.

प्रयोग सुरू झाला.

आणि तो क्षण आला ज्यावेळी भरत गोड गोजिरी या गाण्यावर डान्स करतो. हे गाणं जेव्हा भरतने सादर करायला घेतलं तेव्हा शिट्ट्या आणि टाळ्यांनी प्रेक्षकांनी नाट्यगृह डोक्यावर घेतलं. आणि मग तेव्हापासून सही रे सही नाटकात गोड गोजिरी या गाण्याचा समावेश करण्यात आला.

गेली १८ वर्ष हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे.

आजही या गाण्याला प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळतो. ‘गोड गोजिरी’ गाण्यावर भरतने केलेला डान्स हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात घर करून बसला आहे. सही रे सही नाटक सुद्धा रंगभूमीवर गाजलं. या नाटकाने अभिनेता म्हणून भरतला नवी ओळख मिळवून दिली.

या संपूर्ण प्रकरणावर “खूपदा आपल्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसांना आपलं चांगलं कळत असतं.” अशी भावना भरत जाधव यांनी व्यक्त केली.

जर त्यावेळेस भरत जाधव यांनी सही रे सही सोडलं असतं तर कदाचित भरत – केदारच्या मैत्रीवर सुद्धा याचा परिणाम झाला आणि या नाटकाने पुढे जो इतिहास घडवला तो घडला नसता. या दोघांच्या भांडणात अंकुश चौधरीने केलेली मध्यस्थी विसरून चालणार नाही.

हे दोघे अनेक वर्षांनंतर ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेतून पुन्हा एकत्र काम करत आहेत. झगमगत्या दुनियेत कोणतीही मैत्री फार काळ टिकत नाही, असं म्हणतात. परंतु अपवाद भरत – केदार या जोडीचा.

आज गेली ३०-३५ वर्ष या दोघांची मैत्री तितकीच घट्ट आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.