तेव्हापासून एअर इंडियाला जगभरात महाराजा म्हणून ओळखलं जाऊ लागलं…

इतके दिवस ज्याची चर्चा सुरु होती त्यावर आज पडदा पडला. एअर इंडिया पुन्हा टाटांच्या मालकीची होणार यावर शिक्कामोर्तब झाला. स्वतः रतन टाटा यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

 

आज सगळीकडे बातमी लागली की महाराजा पुन्हा टाटांच्या ताफ्यात दाखल. सगळ्यांनी हि बातमी शेअर देखील केली. आनंदाची व अभिमानाची गोष्ट पण मुख्य प्रश्न असा पडला कि एअर इंडियाला महाराजा कधी पासून म्हटलं जातंय ?

एअर इंडियाची स्थापना कशी झाली यापासून हे उत्तर मिळेल.

जेआरडी टाटा अगदी तरुण असताना त्यांच्यावर टाटा उद्योगसमूहाची जबाबदारी मिळाली. त्यांनी वयाच्या ३२व्या वर्षी टाटा उद्योगसमूह जबाबदारीने सांभाळला आणि सोबतच तो मोठा करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले.

जेआरडी टाटा हे यशस्वी उद्योजक असले तरी त्यांचं पहिलं प्रेम विमान उडवणे हे होतं. ते स्वतः पायलट होते. आगाखान यांनी आयोजित केलेली विमान उड्डाणाच्या स्पर्धत त्यांनी भाग घेतला होता. या प्रेमातूनच त्यांनी स्वतःची विमान कंपनी सुरु करायचा निर्णय घेतला.

नेव्हिल व्हिन्सेंट नावाचा तगडा इंग्लिश वैमानिक त्यांच्या सोबतीला आला. या दोघांनी मिळूनच टाटा एअरलाईन्सची स्थापना केली. 

एप्रिल १९३२ साली ब्रिटीशांनी त्यांनी हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याची परवानगी दिली, व त्याच वर्षीच्या ऑक्टोंबरमध्ये जेआर डी टाटांनी स्वत: टपालविमान चालवत कराचीहून अहमदाबादमार्ग मुंबईला आणले होते. कंपनीची स्थापनाच दोन विमान व एक वैमानिकावर करण्यात आली होती. पण त्याही काळात टाटांनी आपला वक्तशीरपणा आणि नीटनेटकेपणाची परंपरा जपली होती.

जेआरडी पूर्णपणे विमानकंपनीच्या स्वप्नात रंगले होते. इतके, की या काळात विमानकंपनीचं बोधचिन्हही जन्माला आलं. त्याचं झालं असं, की काही वर्षांपूर्वी बॉबी कुका नावाचा एक तरुण जेआरडींकडे नोकरी मागायला आला होता. ऑक्सफर्डला शिकलेला बॉबी मोठा उत्साही होता. 

जेआरडींच्या आधी त्याची भेट झाली होती व्हिसेंटबरोबर. त्यांनाही तो आवडला होता. 

व्हिंसेंटनं विचारलं, “किती पगार घेशील?” हा म्हणाला, “तुम्ही द्याल तितका.” 

व्हिंसेंटनी त्या वेळी १०० रुपये महिना त्याला देऊ केले. ही गोष्ट १९३८ सालची. हा कुका तेव्हा लागला टाटांच्या कंपनीत. पुढे ‘एअर इंडियाच्या विक्रीविभागात गेला तो. नंतर संचालकही झाला. त्या वेळी ‘एअर इंडिया’ची तिकीटविक्री ‘थॉमस कुक कंपनी’ करायची. नंतर ‘एअर इंडिया’नं स्वत:च त्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं.

बॉबी मोठा उत्साही. जे. वॉल्टर थॉमसन ही जाहिरातकंपनी ‘एअर इंडिया’ची जाहिरात करायची. या कंपनीत एक चित्रकार त्याचा मित्र होता. उमेश राव नावाचा. त्याला बॉबीनं सांगितलं,

“तिकीटविक्रीच्या जाहिरातीत आपल्याला एक चित्र हवंय. आरामशीर पहडलेल्या भारतीयाचं. हातात हुक्का वगैे. म्हणजे आपल्याला दाखवायचंय, की आपली विमान कंपनी किती आरामशीर, शाही सेवा देते ते.”

त्याच्या सूचनेप्रमाणे उमेशनं चित्र काढलं. गोलमटोल. दांडग्या मिशा असलेला भारतीय. चटईवर पहुडलाय आणि ती चटईच आकाशातनं उडत चाललीय. ते चित्र अनेकांना आवडलं.  कुकाला वाटलं, ते चित्र सर्वच जाहिरातीत वेगवेगळ्या रूपांत वापरायचा.

मग हा ऐषारामी भारतीय प्रत्येक जाहिरातीत दिसायला लागला.  त्याला नावच पडलं. महाराजा. ‘एअर इंडिया’चा महाराजा तो. तेव्हापासून आजपर्यंत एअर इंडियाचा हा महाराजा संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात फेमस झालाय. एअर इंडियाची ओळख बनलाय.

संदर्भ- टाटायन गिरीश कुबेर  

हे ही वाचा भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.