भारतातल्या प्रत्येक घराच्या भिंतीवर असणारा ‘अजंता’ घड्याळाचा ब्रँड एका शाळामास्तरने बनवलाय

घरातुन बाहेर पडताना, घरी आल्यावर आधी हमखास लक्ष जातं ते भिंतीवरच्या घड्याळाकडे. हातावर बांधलेलं घड्याळ किती जरी भारीतलं असलं तरी हे भिंतीवरच्या घड्याळच महत्व अबाधितच. आणि त्यात ही जर हे घड्याळ जुनं असेल तर त्याच्याशी आपल्या देखील आठवणी जोडलेल्या असतात. कदाचित ‘लहान काटा, मोठा काटा’ असं म्हणत किती वाजले हे सांगायला त्यावरच शिकले असणार.

त्यामुळेच काहींच्या घरात असलेल्या या भल्या मोठ्या घडाळ्यांनी आता २ पिढ्या तरी सहज बघितल्या असणार, यात शंकाच नाही. आणि हि घड्याळ एकदा निरखून बघितली असेल तर त्यावर एकच नाव असतं, ते म्हणजे ‘अजंता – क्वार्ट्झ’. आणि याआधी कधी निरखून नाव बघितलं नसेल तर आज आवर्जून बघा,

कारण याच अजंता घड्याळांच्या कंपनीला यंदा ५० वर्ष पुर्ण झाली आहेत. 

गुजरातच्या ओढवजीभाई पटेल या एका शिक्षकाने याची बीज पेरली होती, आता त्याच कंपनीचे वटवृक्षात रुपांतर झालं आहे. जवळपास १ हजार २०० कोटी रुपयांची उलाढाल आणि एकुण ४५ देशांमध्ये घड्याळासोबतच इतर वस्तुंची निर्यात असा सगळा अजंताचा पसारा आहे.

पटेल यांनी ७० च्या दशकात पदवीधर झाल्यानंतर काही दिवस ते राजकोट जवळील मोर्बीच्या व्ही. सी. हायस्कूलमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकवत होते. तिथं त्यांना महिना ५५ रुपये पगार मिळत होता.

पण तरी देखील जसा इतर गुजराती माणसांच्या रक्तात बिझनेस असतो तसाच ओढवजी यांच्या देखील होता. त्यामुळे छोटसं का असेना काही तरी स्वतःच विश्व उभं करावं या विचारात ते होते.

त्यांच्या कुटुंबाकडे ते ही गोष्ट कायम बोलून दाखवतं असतं. या दरम्यानच ओढवजीभाई आणि त्यांचा मुलगा प्रविणभाई या दोघांनी कॉईल वरची मॅगनेटिक घड्याळ बनवण्याची कला बघून शिकून घेतली, आणि एक दिवसं ते अंतिम निर्णयापर्यंत पोहचलेच. शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देत ओढवजीभाई आणि प्रविणभाई यांनी एक जागा भाड्याने बघितली.

१९७१ साली एक लाख रुपये गुंतवून

‘अजंता ट्रांझिस्टर क्लॉक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ या नावानं व्यवसाय सुरु केला.

सुरुवातीला ते अगदी साधी कॉईलवरची मॅगनेटिक घड्याळ बनवतं असतं.

पण अगदी पहिल्यापासून दोघ बापलेकाचं एक तत्व होतं की जगात वेगळं काय चालू आहे हे बघून आपल्यात सुधारणा करायच्या. याच तत्वामधून त्यांनी १९७५ मध्ये जपानला भेट दिली. तिकडून परत येताना त्यांनी घड्याळात ॲडव्हान्स असणारं क्वार्ट्झ हे तंत्रज्ञान पहिल्यांदाचं भारतात आणलं. अचूक आणि अगदी सेकंदावरची वेळ दाखवण्यासाठी क्वार्ट्झ क्रिस्टल नियंत्रतीत करत असलेल्या इलेक्ट्रिक ऑस्किलेटरवर चालणाऱ्या या टेक्नॉलॉजीवर त्यांनी भारतात आणल्यावर आणखी काम केलं.

जवळपास ७ ते ८ वर्ष यासाठी वेळ घेतला आणि १९८५ मध्ये अजंता क्वार्ट्झने ‘जनता’ या नावासह क्वार्ट्झवर चालणार भारतातील पहिलं घड्याळ लॉन्च केलं. या घड्याळांना तुफान प्रतिसाद मिळाला.

पेन्डोलम, वुडन, सिरॅमिक, ग्लास, मेटल अशा प्रकारामध्ये देखील हे तंत्रज्ञान आणण्यास अजंतला लोकांनीच पत्र लिहून प्रेरित केलं.

आणखी काही वर्षानंतर म्हणजे १९९६ मध्ये अजंतने ऑरपॅट या संलग्नित ब्रॅन्डमधून टेलिफोन आणि क्यालक्युलेटर बनवायला सुरुवात केली. ‘घरगुती लागणारी प्रत्येक गोष्ट पण प्रत्येक गोष्टीला वेगळा ग्राहक’ अशा वस्तु ते बनवतं. हेच त्यांच्या यशाच गमकं होतं. आज त्यांच्या घड्याळ, टेलिफोन, हॅन्ड ब्लेंडर, रुम हिटर, क्यालक्युलेटर अशा वस्तु ४५ देशांमध्ये निर्यात होत आहेत.

प्रविणभाई पटेल यांनी एका माध्यमाशी मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं की,

नवीन टेक्नॉलॉजी सतत आणत राहिल्यानेच मोर्बी या देशातील घड्याळ बनवण्याची राजधानी असलेल्या शहरात ५० वर्षापासून टिकून टिकून आहोत. सोबतच आम्ही एक घड्याळ बनवायला जर ४५ रुपये खर्च येत असेल तर त्याचे १०५ रुपये आकारायचो, नफा थोडा जास्त घ्यायचो, पण हा सगळा पैसा परत कंपनीत लावायचो. त्यामुळे कंपनी तर वाढायला मदत झालीच शिवाय पैसा देखील मोकळा झाला.

२००६ पासून कंपनीने घडाळ्याच्या उत्पादनांसोबतच कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प्स बनवण्यावर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. फिलिप्स आणि ओसरम या कंपन्यांची स्पर्धा करत अजंताने देशातील ६० टक्के बाजारपेठ आपली असल्याचा दावा केला आहे. तेव्हापासुन जाहिरातीवर देखील भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहचण्यास आणखी जास्त संधी मिळाल्याचं नेविल पटेल यांनी सांगितलं.

अमेरिकेमधून इंजिनिअरची पदवी मिळवलेले नेविल पटेल हे कौटुंबिक व्यवसायात उतरलेली तिसरी पिढी आहे.

२०२१ सालच्या आकडेवारीनुसार अजंता कंपनी ४५० पेक्षा जास्त स्वतःचे डेपो आणि ५ हजार पेक्षा जास्त रिटेलर्सच्या दुकानांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे. तसेच जागतिक पातळीवर ४५ पेक्षा जास्त देशात वस्तूंची निर्यात केली जाते, २०१९-२० च्या आकडेवारीनुसार कंपनीची वार्षिक उलाढाल १ हजार २०० कोटींपर्यंत होती. 

सध्या कंपनीमध्ये ७ हजार पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत, आणि यातील एक वैशिट्य म्हणजे त्यापैकी ५ हजार महिला आहेत.

याची देखील एक वेगळीच गोष्ट आहे, १९८० मध्ये प्रवीणभाई पटेल यांना कामगारांच्या स्थलांतराला सामोर जावं लागलं होतं. दक्षिण गुजरातमधील हिऱ्यांच्या उदयोगामध्ये चांगला पगार आणि सोयीसुविधा मिळत असल्याने कामगारांनी तिकडे स्थलांतर केलं, तर उरलेले कामगार शेतीच्या कामात व्यस्त असायचे.

त्यावर उपाय म्हणून त्यांनी महिलांना कामावर घेण्याचं ठरवलं.

तसं ते शेजारच्या गावांमध्ये जाऊन महिलांना कंपनीत घड्याळाच्या कामासाठी पाठवून देण्याची विनंती करू लागले, पण घरची पुरुष मंडळी त्यासाठी तयार होत नव्हती. प्रवीणभाईनी महिलांचे मन वळवण्यासाठी आधी आपल्या पत्नीला काम शिकवले आणि कंपनीच्या कामासाठी जोडून घेतलं.

मोर्बी शहरातील त्या पहिल्या महिला कामगार होत्या, त्यामुळे इतर महिलांना देखील प्रेरणा मिळाली. आजूबाजूच्या पध्दरी, तनकारा, धरॊल या गावातील ४५०-५०० कुटुंबीय आपल्या घरातील महिलांना कामावर पाठवण्यासाठी तयार झाले.

तसेच जो पर्यंत महिला स्वतः घराबाहेर पडणार नाहीत, तो पर्यंत त्यांना कामाची शिस्त, वेळेचं महत्व आणि पैसे कसे मिळवायचे असतात या गोष्टी शिकायला मिळणार नाहीत, स्वतःच्या पायावर उभ्या राहणार नाहीत, असा ही प्रवीणभाई यांचा दावा होता. 

या महिलांची सुरक्षा म्हणून तेव्हापासूनच कंपनीमार्फत सर्वाना घरी ने-आण करण्यासाठी बस सुविधा देखील पुरवली जावू लागली, ती आजतागायत सुरु आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये एकाही कामगाराचे काम सुटणार नाही याची काळजी पटेल कुटुंबीय आणि अजंता कंपनीने घेतली होती.

६४ वर्षीय वनिताबेन देखील अजून ही कंपनीत महिलांसोबत काम करत आहेत, त्याबरोबरच कंपनीच्या नावे एक चॅरिटेबल ट्रस्ट सुरु केलं असून त्याच काम देखील त्या बघतात.

एका छोट्याश्या जागेपासून सुरु झालेला या प्रवास आज इथपर्यंत येवून पोहचला आहे, त्या साठी ओढवजी यांनी केलेली सुरुवात, प्रवीणभाईंच योगदान आणि तिसरी पिढी म्हणजे नेविल पटेल यांनी केलेले प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय आहेत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.