नाकाबंदी दरम्यान ती हालचाल टिपली नसती तर “शिना बोरा केस” कधीच बाहेर आली नसती..

21 ऑगस्ट 2015 चा दिवस.

खार पोलीसांनी एका ठिकाणी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान एका ड्रायव्हरची हालचाल संशयास्पद होती. आपल्या कंबरेला तो काहीतरी वस्तू लावून होता. पोलीसांच्या चाणाक्ष नजरेनं ही गोष्ट हेरली. तेव्हा त्याच्याकडे ७.७५ बोअरसचं पिस्तूल आणि जिवंत काडतूसं आढळून आली होती. लागलीच खार पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. 

ड्रायव्हरकडे पिस्तुल कुठून आली, त्याने ही पिस्तुल कशासाठी वापरली..चौकश्या चालू झाल्या अन् त्यानं एक चकित करणारं नाव सांगितलं.. 

हे नाव होतं इंद्राणी मुखर्जी यांच. 

इंद्राणी मुखर्जी त्यावेळीचं मिडीयामधलं बड प्रस्थ. त्यांचा नवरा पिटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी हे मुंबईच्या हायक्लास सोसायटीमध्ये मोडणारं कपल. इंद्राणी स्वत: INX मिडीयाची चेअरमन होती तर पिटर मुखर्जी INX मिडीयाच्या चेअरमन सोबतच स्टार इंडियाचे CEO राहिलेले होते.. 

बडे अधिकारी, बडे संबंध.. पेज थ्रीवर झळकणारं कपल. 

इंद्राणी मुखर्जी यांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा. याचं नाव श्याम मनोहर रॉय. पोलीसांनी त्याची चौकशी करायला सुरवात केली. उडवाउडवीची उत्तरे देवून श्याम मनोहर वेळ मारून नेवू लागला. पण पोलीसांना अजून काहीतरी मिसिंग वाटत होतच. पोलीसांनी अजून खोलात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा श्याम मनोहरने धक्कादायक गोष्ट सांगितली.. 

त्यानं सांगितलं की सुमारे तीन वर्षांपूर्वी त्याने इंद्राणी मुखर्जी यांच्या सांगण्यावरून एका मुलीचं प्रेत रायगडच्या जंगलात पुरलं आहे. सुरवातीला बड्या माणसांना अडचणीत आणण्यासाठी वाट्टेल ते बोलतोय असा पोलीसांचा अंदाज होता. त्याच वेळी पिक्चरमध्ये एन्ट्री झाली ती राकेश मारिया यांची. राकेश मारियांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जावून चौकशी करण्याचे आदेश दिले.

ठरल्याप्रमाणे पोलीसांचे एक पथक श्याम मनोहर रॉय दाखवत असलेल्या ठिकाणी गेलं. मुंबई पासून १०० किलोमीटर लांब गागोदे गावाजवळील एका निर्मनुष्य ठिकाणी प्रेताचे अर्धवट तुकडे पुरलेले श्याम मनोहर रॉयने दाखवले. हे तुकडे पोलीसांनी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवले.. 

पेण पोलीसांकडे बेवारस स्थितीत सापडलेल्या प्रेतांची चौकशी करण्यात आली… 

तेव्हा २०१२ च्या मे महिन्यात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडल्याची नोंद मिळाली. हे प्रेत एका महिलेचं होतं. बरीच चौकशी केली तरी पोलीसांना खून्यापर्यन्त पोहचता आलं नव्हतं. गेल्या तीन वर्षात ही फाईल बंदच करण्यात आली होती. ते अवशेष व हे अवशेष एकच असल्याचा अंदाज पोलीसांना आला… 

या सर्व तपासादरम्यान इंद्राणी मुखर्जीला मागमूस देखील लावून देण्यात येत नव्हता. कारण पीटर व इंद्राणी हे बड प्रस्थ होतं. पोलीसांच्या तपासाची हालचाल जरी त्यांच्या लक्षात आली असती तरी ते वरिष्ठ पातळीवरून दबाब निर्माण करू शकत होते.. 

इंद्राणी मुखर्जीला काहीही संशय येणार नाही अशा स्थितीत तपास चालू होता. इंद्राणी मुखर्जीची एक बहिण तिच्यासोबत होती व ती सध्या अमेरिकेत आहे याची माहिती मिळाली. 

गेल्या तीन वर्षात ती कोणाबरोबरही बोलली नव्हती का ती सध्या कुठे आहे याचीही ठिक माहिती कोणाकडे नव्हती. फक्त तिच्याबाबत इंद्राणी मुखर्जीला ठावूक होतं. पोलीसांचा अंदाज होता की मृत मुलगी शिना बोराच असावी.. 

पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर पोलीसांनी इंद्राणी मुखर्जीला ताब्यात घेतलं. तिच्याकडे शिना बारो कुठे आहे याची विचारणा करण्यात आली. सुरवातीला शिना अमेरिकेत आहे, तिला कोणाबरोबरही संबंध ठेवायचे नाहीत म्हणून मी तिला फोन करणार नाही असा बचाव इंद्राणी मुखर्जीने केला.

पोलीसांनी तिला थेट ड्रायव्हर समोर चौकशीला बसवलं. या तपासात आपणच शिना बोराचा खून केल्याचं तिनं मान्य केलं व तसा पोलील जबाब देखील दिला… 

तपासात एकामागून एक सत्य बाहेर पडू लागलं आणि ही केस भारतातील हाय प्रोफाईल केस झाली.. 

इंद्राणी मुखर्जी सारख्या व्यक्तीला खूनाच्या आरोपात अटक झाल्यानंतर ही केस मिडीयात गाजू लागली. दरम्यानच्या काळात शिना बोरा आणि इंद्राणी मुखर्जी यांच नात काय? व खून करण्याचा उद्देश काय होता याच्या चौकशीला पोलीस लागले.. 

तपासात शिना बोरा आणि इंद्राणी मुखर्जी या एकमेकांच्या बहिणी नसून त्यांच्या आई आणि मुलीचं नातं असल्याचं समोर आलं. 

पीटर मुखर्जीचं तिसरं आणि इंद्राणी मुखर्जी यांच देखील तिसरं लग्न 2002 साली झालं. इंद्राणी मुखर्जी यांच पहिलं लग्न 18 व्या वर्षीच कलकत्ता येथे झालं होतं. तिचं पहिलं लग्न झालं ते सिद्धार्थ दास या व्यक्तीसोबत.. काही दिवस संसार टिकल्यानंतर ती आपल्या पतीला व दोन मुलं शीना बोरा आणि मिखाईल बोरांना सोडून मुंबईत आली. दरम्यानच्या काळात तिने दूसरं लग्न संजीव खन्ना सोबत केलं होतं. पुढे त्यांचाही घटस्फोट झाला. 

इथे तिची ओळख पीटर मुखर्जी सोबत झाली. तिने पीटरला आपला भूतकाळ सांगितला नव्हता. एक दावा असा करण्यात येतो की पीटर मुखर्जीला शिना बोरा आणि इंद्राणी यांच्या नात्यांची कल्पना नव्हती. तर दूसरा दावा अस सांगतो की पीटरला याची पुर्ण कल्पना होती. 

दूसरीकडे पीटर मुखर्जींना पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता, त्याचं नाव राहूल मुखर्जी

बराच काळ लोटल्यानंतर शिना बोरा आईच्या शोधात मुंबईत आली. इथे ती आईची लाईफस्टाईल, तिचं पेज थ्री जगणं व आपलं कलकत्त्यामधलं गरिबीत राहणं पाहून चिडू लागली. इंद्राणी मुखर्जीने पीटर व राहूलला शिना आपली बहिण आहे सांगून ओळख करून दिली.. 

त्यानंतर शिना बोरा आणि राहूल मुखर्जी यांची जवळीक वाढू लागली. राहूलच्या मते ती आपली मावशी होती. मात्र दोघांच खरं नातं हे  सावत्र भाऊ-बहिणीचंच होतं.. 

यातूनच इंद्राणी शिनाला राहूलपासून लांब राहण्यासाठी बजावू लागली. मात्र आईचा बदला घेण्याचा आलेला चान्स पाहून शिना राहूलच्या अधिकच जवळ जावू लागली. प्लॅट व पैशाची मागणी करू लागली. काहीही करुन शिना बोराला बाजूला काढणं हेच इंद्राणी यांच्या पुढचं टार्गेट झालं.. 

त्यानंतर इंद्राणी मुखर्जीने आपला दूसरा नवरा संजीव खन्ना याला कलकत्त्यावरून बोलावून घेतलं. 

इंद्राणीने बोलायचं आहे म्हणून शिनाला गाडीत बसवलं. या गाडीत इंद्राणीचा पुर्वीचा नवरा संजीव खन्ना, ड्रायव्हर श्याम राय आणि इंद्राणी होते. मुंबईच्या आरडी नॅशनल कॉलेजच्या गल्लीत गाडी गेल्यानंतर तिथेच शिना बोराचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर गाडी गॅरेजमध्ये लावण्यात आली. दूसऱ्या दिवशी ड्रायव्हरला पैसे देवून शिना बोराच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आलं. 

ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर रायगड जिल्ह्यातल्या गागोदेमध्ये मध्यरात्री गेला. तिथे अर्धवट स्थितीत प्रेत जाळले व काही तुकडे पुरले..  

या सर्व घडामोडी २०१२ च्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या. त्यानंतर तीन वर्ष म्हणजेच २०१५ पर्यन्त कोणतिही हालचाल घडली नाही… 

पीटरचा मुलगा राहूल मात्र आईकडे शिना बोराची चौकशी करु लागला. तेव्हा इंद्राणीने तुझ्यापासून लांब ती अमेरिकेला गेली असल्याचं सांगितलं. असही सांगितलं जात की राहूल शिना बोराच्या गायब होण्याची केस देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला होता मात्र पोलीसांनी त्याची केस घेतली नाही. 

त्यानंतर हे प्रकरण पुर्णपणे पचल्यात जमा होता पण त्या दिवशी एका पोलीसाला ड्रायव्हरचा संशय आला. त्याच्याकडे रिव्हॉल्वर सापडली व त्यातून इतकं मोठ्ठं कांड समोर आलं…

पुढे हा तपास CBI कडे वर्ग झाला. पीटर मुखर्जींला २०२० साली जामीनावर सोडण्यात आलं तर इंद्राणी मुखर्जी यांची २०२२ मध्ये तब्बल सहा वर्षानंतर जामीनावर मुक्तता झाली.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.