१९७२ पासून आजवर अमर जवान ज्योतीची मशाल अखंड प्रज्वलित आहे

भारताचं सैन्य हा भारतीयांच्या भावनांना साद घालणारा मुख्य मुद्दा आहे. भारताच्या जवानांसाठी भारतीयांच्या हृदयात एक विशिष्ट स्थान आहे. जेव्हा एखादा जवान शहीद होतो तेव्हा संपूर्ण देश दुःखात असतो. आजपर्यंत सीमेवर युद्धादरम्यान जे जवान शहीद झाले आहेत अशा जवानांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीच्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योत गेल्या ५० वर्षांपासून तेवत ठेवली जातेय. पण आता ही परंपरा बदलणार आहे. परिणामी सध्या  #AmarJawanJyoti हे टॉप ट्रेंडिंगवर आलंय.

झालंय असं की,  यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून ही अमर जवान ज्योत या ठिकाणावरून ती हलवली गेलीये. आता ही ज्योत  राष्ट्रीय युद्ध स्मारक म्हणजेच नॅशनल वॉर मेमोरियल इथं असलेल्या ज्योतीत विलीन झालीये. आणि यानंतर तिथे ती प्रज्वलित करण्यात येणार आहे.

देशात घडलेली आजची ही सगळ्यात मोठी घटना आहे. तेव्हा अमर जवान ज्योतीचा आणि इंडिया गेटचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया…

इंडिया गेट हे भारताचं एक राष्ट्रीय स्मारक आहे. १९२१ मध्ये ब्रिटिश सरकारनं  राजधानी दिल्लीत  हे बांधलं होतं. १९१४ ते १९२१ दरम्यान, पहिल्या महायुद्धात आणि तिसर्‍या अँग्लो-अफगाण युद्धात प्राण गमावलेल्या सुमारे ८४,०००  ब्रिटीश भारतीय जवानांच्या स्मरणार्थ  हे स्मारक बांधण्यात आलं होतं. त्यावर त्या सैनिकांची नावंही कोरलेली आहेत.

इंडिया गेटची रचना ‘सर एडविन लुटयेन्स’ यांनी केली होती. सर एडविन हे त्यावेळी नवी दिल्लीचे मुख्य वास्तुविशारदच होते, तसंच इम्पीरियल वॉर ग्रेव्हज कमिशनचे सदस्य आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कबर आणि स्मारक डिजाईन करणारे युरोपमधील प्रमुख डिझाइनर होते. या स्मारकाची  प्रेरणा त्यांना मुळात पॅरीस इथल्या ‘आर्क दे ट्रायम्फे’ या स्मारकावरून आली होती. त्यानुसार इंडिया गेट लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविलं गेलं. 

इंडिया गेट आधी ‘ऑल इंडिया वॉर मेमोरिअल’ या नावानं ओळखलं जात होतं. 

इंडिया गेटच्या इतिहासात बघितलं तर इंडिया गेटसमोर एक मंडप होतं. ज्यात ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुरळा उभारण्यात आला होता. पण भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर तो पुतळा आणि  इतर अनेक ब्रिटिशकालील पुतळे कोरोनेशन पार्क इथे हलविण्यात आले.

त्यानंतर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं. या युद्धादरम्यान जवळपास ३,८४३ जवान शाहिद झाले होते. त्यांच्याच स्मरणार्थ काही तरी करावं असं तत्कालीन सरकारला वाटलं. त्याचनुसार इंडिया गेटला सर्वप्रथम ‘अमर जवान ज्योत’ प्रज्वलित करण्यात आली. १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्योतीचं उद्घाटन केलं होतं. आणि तेव्हापासून ही ज्योत भारतीय सैनिकांच्या नावे अखंड तेवत आहे.

१९७२ पासून, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, तीन सेना प्रमुख आणि इतर मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनी अमर जवान ज्योती इथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा पाळल्या जातेय.

आता ही ज्योत ज्याठिकाणी हलवण्यात आली आहे ते ठिकाण म्हणजे राष्ट्रीय युद्ध स्मारक. केंद्र सरकारनं २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधलं होतं. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या २६,४६६ भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आलं. त्याठिकाणीही एक ज्योत प्रकाशित करण्यात आली होती. तीच ज्योत आणि अमर जवान ज्योत आता एकमेकांत विलीन झाल्या आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.