भारतीय लष्करात नाकारले गेलेले देशमुख थेट अमेरिकन लष्करात कर्नल झाले..

आपल्या पैकी अनेकांना शालेय जीवनापासूनच लष्करी युनिफॉर्मच आकर्षण असत. तो मिळवण्यासाठी मेहनत करण्याचीही तयारी असते पण प्रत्येकाच्या नशिबात भारतीय आर्मीचा युनिफॉर्म नसतो.  कोणी फिजिकल लिमिटेशन मुळे तर कोणी आणखी काही कारणांमुळे लष्करात प्रवेश करू शकत नाही. असच चंद्रपूर जिल्ह्यातल्याएका तरुणाच्या सोबत देखील झालं होतं. पण त्यांनी भारतीय आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणून जिद्द हरली नाही आणि योगायोग असा तो अमेरिकेच्या सैन्यात निवडला गेला. तिथे पराक्रम गाजवला. फक्त एवढंच नाही तर तिथे कर्नल म्हणून निवृत्त झाला.

नारायण जयराम देशमुख हे त्यांचं नाव.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हे कर्नल देशमुख त्यांचं मूळ गाव. वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांचा जन्म आसिफाबादला झाला आणि शिक्षण झालं हैदराबादला. तिथे एमबीबीएसला असताना ते एनसीसीत अंडर ऑफिसर होते व सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

एकदा सैन्य भरतीची जाहिरात पाहून डेहराडूनला ते राष्ट्रीय मिल्ट्री अकादमीत गेले. तेथे लेखी परीक्षेनंतरच्या मुलाखतीत ‘तू काय करतो’, असं त्यांना विचारलं असता आपण एमबीबीएस प्रथम वर्षाला असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकल्यावर तेथील अधिकाऱ्याने त्यांना ‘आधी एमबीबीएस पूर्ण कर’, असा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना परत यावं लागलं.

नारायण देशमुख एमबीबीएसला चार सुवर्ण पदकांसह ते विद्यापीठात पहिले आले.

१९६५ साली भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. त्यामुळे त्यांनी पुन्हा भारतीय सैन्याकडे अर्ज केला.  हैदराबादच्या डायरेक्टर ऑफ मेडिकल सर्व्हिसेसमधून त्यांना बोलावणं आलं व ‘तुम्हाला मिल्ट्रीत जायची इच्छा आहे ना, मग उद्या जाऊन परीक्षा द्या’, असं बाजवण्यात आलं.

त्यामुळे पुन्हा एकदा सैन्य भरतीच्या परीक्षेला ते सामोरे गेले. लहानपणी त्यांच्या पावलाला छोटंसं फ्रॅक्चर झालं होतं. भारतीय नियमानुसार अशी व्यक्ती सैन्य भरतीसाठी अनफिट ठरते, त्यांना नाकारण्यात आलं.

नारायण देशमुख एमएसनंतर सरकारी सेवेत डॉक्टर म्हणून रुजू झाले. पण या नोकरीत त्यांना फारसं समाधान नव्हतं. या नोकरीच्या चाकोरीबद्ध कामाने आपल्या ज्ञानाला फार वाव​ मिळेल असे त्यांना वाटत नव्हते. वैद्यकीय क्षेत्रात आणखी शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत होतं आणि त्यासाठी त्यांनी सरळ अमेरिकेचा रस्ता धरला.

४-५ वर्षे तेथे घालवून पुन्हा भारतात परत यायचं असं त्यांनी ठरवलं होतं पण त्या देशात त्यांचे सारे आयुष्यच बदलले.

अमेरिकेत शिक्षण पूर्ण झालं, देशमुखांनी अमेरिकेतल्याच एका छोट्या गावात आपली प्रॅक्टिस सुरु केली. दरम्यानच्या काळात त्यांना अमेरिकन सैन्यातील आरक्षित दलाविषयी कळलं होतं. देशमुखांना लहानपणापासून लष्करी वर्दीचं आकर्षण होतच. भारतात नाही तर कमीतकमी अमेरिकेत तरी तो युनिफॉर्म आपल्याला घालता येईल म्हणून त्यांनी या पोस्ट साठी अर्ज केला.  या आरक्षित दलाला युद्ध झालं तरच बोलावण्यात येतं. इतरवेळी ते आपले काम करू शकतात. मात्र, महिन्यातून दोन दिवस आणि वर्षातून दोन आठवडे त्यांना लष्करी प्रशिक्षणासाठी जावं लागतं.

१९८४ साली त्यांनी या आरक्षित दलासाठी अर्ज केला. बौद्धिक परीक्षा झाल्यावर मेडिकल टेस्टच्यावेळी त्यांनी लहानपणी आपला पाय फ्रॅक्चर झाला होता, हे सांगितलं. पण, ‘तुम्हाला शस्त्रक्रिया करता येतात ना, मग आमची हरकत नाही’, असं म्हणत दलानं शंका दूर केली.

आणि चक्क चंद्रपूरच्या नारायण देशमुख यांनी अमेरिकन लष्करात प्रवेश झाला.

१९९० च्या ऑगस्ट महिन्यात सद्दाम हुसेनने कुवैतवर हल्ला केला होता. डॉ. देशमुख यांचा युद्धाचा पहिलाच प्रसंग होता. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्यापूर्वी लष्करानं त्यांना युद्धभूमीवर कसं वावरायचं, रासायनिक अस्त्रांपासून कसं संरक्षण करायचं, येथपासून तर बंदूक चालविण्यापर्यंत सारं प्रशिक्षण दोन महिने दिलं आणि १९९१ च्या ऑगस्ट महिन्यात ते सौदी अरेबियाला पोहोचले.

सैन्य जसजसं पुढे जाईल तसतसं यांच्या मेडिकल टीमला देखील युद्धभूमीत त्यांच्या मागे राहावं लागायचं.

एक दिवस अचानक इराकचा एक बॉम्ब अमेरिकन सैन्याच्या तुकडीवर पडला आणि ३० सैनिक डोळ्यादेखत प्राणास मुकले. त्यानंतर अमेरिकन सेना इराकमध्ये घुसली. त्यावेळी तेथे असलेल्या युद्धकैद्यांच्या छावणीत दोनच दिवसांत इराकचे १० हजार सैनिक दाखल झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी करणं, जखमींवर उपचार करणं ही जबाबदारी या डॉक्टर सैनिकांची होती.

युद्धभूमीवर खाण्या-पिण्याची आबाळ व्हायची. कारण डॉ. देशमुख शाकाहारी होते. तेथे त्यांना नियमित ते अन्न मिळायचं नाही. मात्र त्यांनी कधी जिद्द सोडली नाही.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. संपूर्ण जग हादरून गेलं. ओसामा बिन लादेनसारख्या कट्टरवाद्यांनी पसरवलेला दहशतवाद मोडून काढण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तानविरुद्ध युद्ध पुकारलं. त्या युद्धासाठी पुन्हा मे २००२ मध्ये डॉ. देशमुख यांना कंदहारला पाठविण्यात आलं. येथे ते फॉरवर्ड सर्जिकल टीमचे प्रमुख होते.

या टीमला सैन्याच्या अगदी जवळ राहावं लागतं. त्याचप्रमाणे आपण कुठे आहोत, हे घरी सांगण्याची परवानगी नसते. कंदहारला असताना कॅम्पमध्ये एकदा त्यांच्या पत्नीचा फोन आला. त्यावेळी त्यांनी आपण दुर्योधनाच्या आईच्या माहेरी असल्याचं सांगितलं होतं.

अफगाणिस्तानमधून परत येताच २००४ मध्ये इराकवर चढाई झाल्यानं ते बगदादला गेले. युद्धभूमीशी त्यांचं नातं कायमच राहील.

खरं तर डॉ. देशमुखांना २००० सालीच कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र, कॅन्सरशी यशस्वी लढाई करून ते प्रत्यक्ष रणांगणावरील लढाईत जात राहिले. इराकला असताना त्यांना पुन्हा कॅन्सर झाला. मग मात्र अमेरिकेत परतल्यावर त्यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं. तोवर त्यांची २० वर्षे लष्करातील सेवा झाली होती आणि पदोन्नती मिळून ते कर्नलही झाले होते.

विशेष म्हणजे निवृत्त झाल्यावरही २००६ साली अफगाण युद्धाच्यावेळी त्यांनी पुन्हा आपली तेथे जाण्याची इच्छा असल्याचं लष्कराला कळवलं. त्यांची इच्छाशक्ती पाहून लष्करानं त्यांना मान्यताही दिली. मात्र, प्रोस्टेट कॅन्सरची टेस्ट करायला सांगितलं. दुर्दैवानं ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यांना त्या युद्धात सहभागी होता आलं नाही.

डॉ.देशमुख एका मुलाखती मध्ये म्हणतात,

‘माझी लष्करात जाण्याची इच्छा अमेरिकेनं पूर्ण केली. अमेरिका माझी मातृभूमी नसली तरी माझ्या दोन्ही मुलांची मातृभूमी आहे आणि आज माझा मुलगाही अमेरिकन लष्करात आहे. मात्र, पाकिस्तान किंवा चीनच्या लष्करात जाण्याची संधी मिळाली असती तर आपण कधीच गेलो नसतो’

कर्नल देशमुखांचा मुलगा देखील लष्करात आहे. छत्रपतींचा वारसा परदेशी रणांगणात देखील गाजवणाऱ्या या मराठी कुटुंबाचा पराक्रम येत्या अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत असा आहे हे नक्की.

संदर्भ- अमेरिकन लष्करातील मराठी कर्नल महाराष्ट्र टाइम्स 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.