एक मराठा वीर योद्धा हिटलर व मुसोलिनीच्या सैन्याला भारी पडला होता.

मराठा लाईट इन्फन्ट्री म्हणजे भारतीय सैन्यदलाचा अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची परंपरा जपणारी ही बटालियन इंग्रजांच्या काळातही जगातील सर्वोत्तम सैन्य तुकडी पैकी एक होती. १८०२ मध्ये या पलटणला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण होय. त्यावेळी अशा प्रकारच्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धात मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या मावळ्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे हिटलरच्या जर्मन सैन्याला इटलीमध्ये धडा शिकवला होता.

यात युद्धात पराक्रम केलेल्या मध्ये सर्वात आघाडीवर नाव येते मराठा योद्धा यशवंत घाडगे यांचं.

यशवंत बाळाजी घाडगे हे मुळचे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातले. १६ नोव्हेंबर १९२१ रोजी पळसगाव-आंब्रेची वाडी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते अवघे तीन महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

दोन मुले व चार मुली अशा सहा अपत्यांचा भार आई विठाबाई यांच्यावर येऊन पडला.

घराला आधार मिळाला म्हणून सर्वात मोठा भाऊ वामन हे सैन्यात भरती झाले. बाकीचे भावंडे व विठाबाई हे दुसऱ्याच्या शेतात राबून खात होते. वामन यांच्या तुटपुंज्या पगारावर कसाबसा कुटुंबाचा गाडा हाकला जात होता.

यशवंत यांनी शिकून मोठ व्हाव अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यांना मराठी शाळेत घातल. यशवंत घाडगे चौथी पास झाले. पुढील शिक्षणासाठी शहरात जाणे शक्य नव्हते यामुळे वयाच्या अकराव्या वर्षी यशवंता देखील आपल्या इतर भावांसोबत शेतामध्ये राबू लागले.

कुस्ती, दांडपट्टा, मल्लखांब याची त्यांना लहानपणापासून आवड होती.

मोठ्या भावाप्रमाणे आपणही सैन्यात जाव, शत्रूशी सामना करावा असे विचार त्यांच्या मनात येत. पण सर्वात धाकटा असल्यामुळे आईची त्यांच्याबद्दल जास्त काळजी होती. तिने त्यांना सैन्यात जाण्यास नकार दिला.

एक मुलगा आधीच युद्धात लढतोय आणखी एका मुलाला जीवाची बाजी लावू  देण्यास त्या माऊलीच काळीज तयार होत नव्हत.

पण यशवंता हट्टाला पेटला. पुढे त्यांचे बंधू निवृत्ती घेऊन गावी परतआले तेव्हा त्यांच्या मागे भुणभुण सुरु केली. अखेर यशवंत जर लग्न करून घ्यायला तयार असेल तर त्याने सैन्यात नोकरी करावी अशी अट घालण्यात आली.

लग्नानंतर बायकोच्या ओढीने यशवंता फार काळ सैन्यात टिकणार नाही असाच सगळ्यांचा अंदाज होता.

पाटणूसच्या पांडुरंग महामुणकरांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्यांच लग्न झाल.

याच काळात युरोपमध्ये दुसरे महायुद्ध पेटले. जर्मनीचा हिटलर व इटलीचा मुसोलिनी यांच्या हुकुमशाही साम्राज्यवादी धोरणांमुळे अख्खे जग महायुद्धात फरफटले गेले. तसा अर्थाअर्थी भारताचा महायुद्धाशी संबंध नव्हता. पण आपण ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांनी आपल्यालाही या युद्धात ओढले.

ब्रिटीशांनी भारतभर सैन्य भरती सुरू केली. सावरकरांच्या सारख्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना सैन्यात सामील व्हा असे आवाहन केले. यामुळे मोठ्या प्रमाणात भरती सुरु झाली.

 १९३८ साली यशवंत घाडगे देखील पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये साधे शिपाई म्हणून दाखल झाले. कठोर प्रशिक्षणाचा अडथला पार पाडल्यानंतर त्यांना युद्धभूमीवर धाडण्यात आले. यशवंत घाडगे यांचे अंगभूत शौर्य, कठोर निष्ठा याचा प्रत्यय आल्यामुळे त्यांची लवकरच नाईक पदी बढती करण्यात आली.

दुसरे महायुद्ध जेव्हा ऐन भरात होते तेव्हा जर्मन सैन्य इंग्रज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर भारी पडत होते. सर्व आघाड्यांवर त्यांची पीछेहाट सुरु होती. उत्तर आफ्रिका व इटलीमधील जंगले, उंच दऱ्याखोऱ्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय लश्करातील मराठा इन्फन्ट्रीला पाचारण करण्यात आलं.

यावेळी मोहिमेसाठी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीसोबत यशवंत घाडगे इटलीला आले. 

तो पर्यंत १९४४ साल उजाडले होते. दोस्त राष्ट्रांनी अक्ष देशांना दाबण्यास सुरवात केली होती. इटलीवर विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचे जोरदार प्रयत्न सुरु होते मात्र इटलीच्या मदतीला जर्मन सैन्य उतरलं होतं. मराठा बटालियनचा त्यांच्याशी सामना करावा लागत होता.

१० जुलै रोजी टायबर नदीच्या खोऱ्यात यशवंत घाडगे यांच्या मराठा पलटणीची जर्मन सैन्याशी गाठ पडली. जंगलाचा आधार घेऊन लपून बसलेल्या जर्मन सैन्याने अचानक  हल्ला केला. हेवी मशीनगन्सचा धडाका सुरु झाला.

असा हल्ला होईल याचा कोणताही अंदाज नसल्यामुळे भारतीय सैन्यात खळबळ उडाली. 

अगदी जवळून गोळीबार होत असल्यामुळे अनेकजण थेट मृत्युमुखी पडले तर कित्येकजण जायबंदी झाले.

यशवंत घाडगे यांनी मात्र एकाकी लढा देण्याच ठरवलं. एकीकडे जर्मन सैन्यावर उलट गोळीबार सुरु केला मात्र आपल्या सैन्यावर सर्वात जास्त हानी पोहचवणाऱ्या मशीनगन फायर करत असलेल्या शत्रूवर हातबॉम्ब फेकला.

यशवंत घाडगे यांची ही खेळी कामी आली. मशीनगन चालवणाऱ्या सैनिकाच्या ठिकऱ्या उडाल्या. त्याच्या सोबतचे काही सैनिक देखील टिपले गेले. जर्मन सैन्याची निम्मी ताकद कमी झाली. गनिमी काव्याचे बाळकडू प्यायलेल्या यशवंत घाडगेनी जागा बदलून बदलून शत्रूवर वार करण्यास सुरवात केली.

बाकी सगळे सैन्य गारद झालेले असताना हा एकटा मराठी मावळा अख्ख्या जर्मन तुकडीवर भारी पडत होता. एका अंदाजानुसार जवळपास शंभरभर शत्रूचे सैनिक घाडगेंनी आपल्या टॉमीगनने यमसदनी धाडले असतील.

या हातगाईच्या लढाईत ते जर्मन ठाण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. तेवढ्यात त्यांच्या टॉमीगन मधल्या गोळ्याही संपल्या. आता त्यांना मॅगझिन बदलायलाही वेळ नव्हता. त्यांनी आपली टॉमीगन उलटी करुन बॅरेल हातात धरले आणि उरलेल्या दोन सैनिकांना त्या बंदूकीच्या दस्त्याने ठेचून ठार मारले.

तेवढ्यात खंदकात लपलेल्या शत्रूच्या एका स्नायपरने त्यांच्या छातीचा वेध घेतला आणि या शुरवीराची जिवनयात्रा संपली.

तेव्हा ते फक्त २२ वर्षांचे होते. इतक्या कमी वयात एवढा पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकाच शत्रूच्या अधिकाऱ्यांनी देखील कौतुक केलं.

या लढाईने दाखवून दिले की हिटलर मुसोलिनीच्या सैन्यावर एकटा मराठा गडी भारी पडू शकतो.

यशवंत घाडगे यांना त्यांच्या पराक्रमासाठी लाल किल्ला येथे मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य मेडल प्रदान करण्यात आले. त्यांच्या वतीने वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांनी ते मेडल स्वीकारले.

इंग्रजांनी नाईक यशवंत घाडगे यांचे कार्य धाडस याचा योग्य सन्मान केला. इटलीतील कसिनो मेमोरिअल येथे दफनस्थळ उभारण्यात आले. लक्ष्मीबाई यांना दोन घरे बांधून दिली. शिवाय जुन्या माणगाव हद्दीत यशवंतरावांचे स्मारक देखील उभारले.

नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ माणगावच्या मामलेदार कचेरीजवळ त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. अजूनही तेथे दरवर्षी ९ जानेवारीला घाडगे महोत्सव’ साजरा करण्यात येतो.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.