तिने एका RJ सोबत लग्न केलं आणि गावाकडच्या पोरांचं मॅरेज मटेरियल आयकॉनचं स्वप्न तोडलं….

विवाह पिच्चर तर सगळ्यांनीच पाहिला असेल, त्यातून भलेही आपला काही फायदा झाला नसेल पण त्या काळात विवाह चित्रपटातली अभिनेत्री बघून नवरी पाहिजे तर अशीच पाहिजे असा बोभाटा झालेला. घर सांभाळणारी , नवऱ्याच्या शब्दाच्या पुढे न जाणारी, घरच्यांची काळजी करणारी अशी ती विवाह चित्रपटातील हिरोईन होती.

विवाह पिच्चर मधला जल लिजीए हा सीन आणि मुझे हक हे हे गाणं सध्या मीम मटेरियल म्हणून व्हायरल होत आहे.

पण तो विषय सोडा आज अमृता रावचा बड्डे आहे. तिची बॉलिवूडमध्ये एंट्री कशी झाली आणि कसं यश ती मिळवत गेली याविषयी आपण तिचा प्रवास जाणून घेणार आहोत.

अमृता रावला आपण खरतर ओळखतो ते विवाह चित्रपटापासून. त्या चित्रपटापासून ती बरीच लोकप्रिय झाली. त्याहीमागे जरा जाऊया. अमृता राव हि मूळची महाराष्ट्राचीच. मुंबईत तिचा जन्म झाला आणि मुंबईच ती वाढली. कॉलेजमध्ये असताना तिची बहीण मॉडेल म्हणून काम करत होती त्याचवेळी अमृता रावनेही मॉडेलिंगमध्ये लक्ष घातलं.

अभिनय आणि मॉडेलिंग अशा दोन्ही क्षेत्रात ती काम करत होती. तिचा पहिला चित्रपट जो लोकांसमोर आला तो होता अब के बरस २००२ साली. या चित्रपटामुळे तिला पदार्पणासाठी फिल्मफेअरचं नॉमिनेशन मिळालं. पुढे समीक्षकांनी तिच्या अभिनयाचं आणि लुक्सचं बरच कौतुक केलं. या शाबासकीच्या जोरावर तिला पुढे भगतसिंग द लिजेंड हा चित्रपटही मिळाला.

२००३ साली खऱ्या अर्थाने अमृता राव लोकप्रिय झाली. शाहिद कपूरसोबत तिचा इष्क विष्क हा चित्रपट तुफ्फान चालला. कॉलेजमधल्या तरुणाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटामुळे तिला २००३ सालच डेब्यूट फिल्मफेअर आणि २००४ साली आयफा अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 

शाहरुख खानच्या मैं हूं ना या चित्रपटात तिचा सपोर्टिव्ह रोल संजूसुद्धा चांगलाच गाजला. पुढे तिने वाह, लाईफ हो तो ऐसी, शिकार, प्यारे मोहन, मस्ती अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

नॅशनल सुपरस्टार म्हणून अमृता राव देशभर लोकप्रिय झाली ती म्हणजे विवाह चित्रपटातून. दोन कुटुंबातील भावनिक गोष्टींवर आधारित लग्नसोहळा या थीमवर आधारित हा चित्रपट होता. शाहिद कपूर या चित्रपटाचा हिरो होता आणि यात पूनम नावाच्या पात्राची भूमिका अमृता रावने रंगवली होती. हा चित्रपट भारतातला २००६ सालचा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर होता.

हा चित्रपट सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाच्या अभिनेत्रीची निवड बडजात्यांनी सहजासहजी केली नाही. या चित्रपटासाठी अमृता रावची ४ तास मुलाखत चालली. या मुलाखतीमध्ये सूरज बडजात्यांनी तिला एक हिंदी पुस्तक वाचून दाखवायला सांगितलं होतं. कारण त्यांना अमृता राव चांगली हिंदी बोलू शकते कि नाही हे चेक करायचं होतं. 

विवाह चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली आणि या पिच्चरमधला अमृता रावचा रोल बराच भाव खाऊन गेला. अगदी आजही टीव्हीला हा सिनेमा आठवड्यातून एकदातरी लागतोच. २००८ साली वेलकम टू सज्जनपूर या चित्रपटासाठी तिला अवॉर्डही मिळाला होता. बॉलिवूडमधून ती पुढे साऊथ इंडस्ट्रीमध्ये गेली. तिथेही तिचं चांगलं कौतुक झालं.

जॉली एलएलबी, सिंग साब दि ग्रेट, सत्याग्रह अशा गंभीर आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातूनही ती झळकली.

सगळ्यात जास्त अमृता रावंच कौतुक झालं ते २०१९ साली आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या चित्रपटातून.

ठाकरे या चित्रपटात अमृता रावने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका केली होती.

अजूनही ती छोट्यामोठ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसून येते. एकेकाळी पोरांची क्रश म्हणून ती विवाह चित्रपटापासून फॉर्मला आलेली होती. पुढे तिने एका आर जे सोबत लग्न केलं आणि गावाकडच्या पोरांचं मॅरेज मटेरियल आयकॉनचं स्वप्न तोडलं….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.