बॉलिवूडला ठणकावून सांगितलं, “काम मिळालं नाही तरी चालेल पण पगडी उतरवणार नाही”

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. याच आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावरून टिका केली होती. आणि तिला उत्तर दिले गायक दिलजीत सिंग याने.

कंगनाच्या ट्वीटनंतर मागील तीन दिवसांपासून दिलजित दोसांज आणि कंगणामध्ये ट्विटरवर वाद सुरु आहे. यात कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

पण या आंदोलनाला दिलजीत दोसांझने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. शनिवारी सिंधू सीमेवर त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांझ याने १ कोटी रुपयांची देणगी दिली.

यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेला हा गायक नक्की कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी गुगल करणे चाले झाले. पण गुगल पेक्षा इन डिटेल माहिती ‘बोल भिडू’वर आणली आहे.

तर कोण आहे हा दिलजीत दोसांज?

दिलजीत दोसांझ पंजाबी संगीत क्षेत्रातील मोठं नावाजलेलं नाव. त्याचे फॅन्स त्याला ‘किंग ऑफ़ पंजाबी फ़िल्म्स’असं म्हणतात. पण त्याने पंजाबी सोबतच बॉलिवूडमध्ये पण आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलिवुडमध्ये गाण्यापासून अगदी एक्टिंग पर्यंत सगळं करुन बघितलयं. मागच्या वर्षीच त्याचा अक्षय कुमार सोबतचा ‘गुड न्युज’ हा चित्रपट आला होता. त्यानंतर ‘सूरज पे मंगल भारी’ ही कॉमेडी फिल्म पण आलीय.

हिंदी चित्रपाटांमध्ये पंजाबी+हिंदी अशा मिक्स गाण्यांमुळे त्याची लोकप्रियता चांगलीच वाढली आणि एक वेगळी ओळख मिळवलीय.

गुरुबानी किर्तन करणारा दलजीत…

पण ही लोकप्रियता आणि ही ओळख त्याला अशी सहजच नाही मिळालीय. पंजाबमधील दोसांज या एका छोट्याश्या गावातल्या मध्यमवर्गीय मुलाला भारतातील फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं हे काही खायची गोष्ट नव्हती.

दलजीत ने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते, तो स्वतः एका शेतकरी कुटुंबातुन येतो. त्याच लहानपण देखील हालाखीच्या परिस्थितीमध्ये गेले. त्यामुळे दहावी पर्यंतच शिक्षण घेवू शकला. पैशांच्या तंगीमुळे पुढचं शिक्षण थांबवून कामासाठी हातपाय मारायला सुरुवात केली.

गाण्याची आवड मात्र लहानपणापासूनच होती. त्यामुळे गुरुद्वारामध्ये गुरुबानी किर्तन करायला जायचा. आणि इथूनच त्याच्या नशिबाने कुस बदलली. त्याने आपले नाव पण बदलून दलजीत वरुन दिलजीत केले.

गुरुद्वारामध्ये येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना त्याचा आवाज आवडू लागला. गाण्याची शैली आवडू लागली. आणि त्याला संधी मिळत गेल्या. सुरुवातीला स्टेज शो आणि लग्नात गाणं म्हणण्यासाठी ऑफर मिळाल्या.

पंजाबच्या म्युझिक इंडस्ट्रीजमधला प्रवास…

ओळख मिळवत हळू हळू तो पंजाबच्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आला. त्यावेळी त्याला ‘अर्नब पेंडू’ असं ओळखायचे. त्याचा अर्थ होतो ‘अर्बन म्हणजे शहर आणि पेंडू म्हणजे गाव.

त्याच्या गाण्यातील गावाकडील बाज आणि शहरी ठसका याच्या मिश्रणामुळे त्याला ही ओळख मिळाली.

आपल्या करीअरची सुरुवात २००४ मध्ये आलेल्या पंजाबी अल्बम ‘इश्क दा उड़ा अड़ा’ इथून झाली. पुढे त्याच्या अल्बमनी लाईनच लावली. त्याचा स्माईल सारखा अल्बम बराच लोकप्रिय झाला. खरतर याच अल्बमने त्याला त्याची स्वतंत्र ओळख मिळाली.

२०११ मध्ये दिलजीतला पंजाबच्या चित्रपट क्षेत्रात संधी मिळाली. पहिला चित्रपट आला ‘द लायन ऑफ़ पंजाब’. प्रदर्शित पण झाला. मात्र तो काही चांगला चालला नाही. पण त्यातील ‘लख 28 कुड़ी दा’ या गाण्याने सगळ्यांची मने जिंकुन घेतली.

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या अपयशानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचं ॲक्टिंग सोडण्याच ऑलमोस्ट फिक्स झालं होतं. पण दुसऱ्या चित्रपटाच्या शुटिंगल्या त्यापुर्वीच सुरुवात झाली होती.

पण या नंतर आलेल्या ‘जिन्हें मेरा दिल लुटया’ हा चित्रपट चांगला चालला. आणि इरादा पुन्हा बदलला.

दिलजीतने 2009 मध्ये रॅपर हनी सिंहसोबत ‘गोलियां’ गाणे गायले होते. याच्या जुगलबंदीने त्याला इंटरनॅशनल स्टार बनवले होते. यानंतर हनी सिंहसोबत दिलजीतचा ‘पंगा’ आला होता. हा सुपरहिट ठरला. IMDB ने त्याला २०१६ मध्ये पंजाबी अॅक्टर्समध्ये टॉप स्थान दिले होते.

मग झाला बॉलिवूड प्रवेश…

वर सांगितल्या प्रमाणे त्याच्या पंजाबी + हिंदी वर्जनमुळे त्याला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली आणि त्याचा प्रवेश हिंदी इंडस्ट्रिजमध्ये झाला. रितेश देशमुखच्या ‘‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटासाठी त्याने पार्श्वगायन केले.

पुढे बॉलिवूडमध्ये त्याला पंजाबी पेक्षा चांगले यश मिळाले. उडता पंजाब, फिल्लोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये करीना कपूर, शाहिद कपूर अनुष्का शर्मा या मोठ्या कलाकारांच्या सोबत काम करायला मिळाले.

२०१८ मध्ये आलेल्या -सूरमा चित्रपाटामध्ये त्याने भारतीय हॉकी टीमचा माजी कर्णधार संदीप सिंह याचा रोल केला होता. पगडी बांधणारा बॉलिवूडमध्ये यशस्वी होवू शकत नाही या टिकेला त्याने आपल्या कामातुन उत्तर दिले.

पण ऐक वेळ अशी आली की, त्याला लूक बदलण्यासाठी पगडी काढण्यास सांगितले. मात्र काम नाही मिळाले तरी चालेल पण पगडी काढणार नाही असं ठणकावून सांगितले. पण यानंतर देखील तो बॉलिवूडमध्ये आज ही टिकून आहे.

जस पगडीबद्दल तो बोलतो तसाच आपल्यामधील कमीपणा देखील तो लपवत नाही. दिलजीतची इंग्लिश चांगली नाही. याबद्दल त्याने खुलेपणाने मान्य केले आहे. त्याने इंग्लिश शिकण्याचा पण प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही.

पण भाषेला अडथळा न मानत त्याने पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. पीटीसी पंजाबी फ़िल्म अवॉर्ड्स आणि उड़ता पंजाब साठी बेस्ट मेल डेब्यूचा फ़िल्मफेयर अवॉर्ड त्याच्या नावावर आहे.

दिलजित आणि वाद…

असं नाही की दिलजीतच्या सगळ्या चांगल्याच बाजू आम्ही सांगणार आहे तर त्याच्या सोबत काही वाद – विवाद देखील आहेत.

याच वर्षी जूनमध्ये कांग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी दलजीतच्या घराबाहेर प्रदर्शन केले होते. त्याच्या ‘रंगरूट’ आणि ‘पुत जट्टा दां’ ही गाणी खलिस्तानी विचारधारेला खत पाणी घालत असल्याचा आक्षेप घेत बिट्टू यांनी आंदोलन केले होते.

यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलजीत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

याच्या आधी त्याच्या ’15 साल’ नामक एका गाण्यावर वाद झाला होता. यात एका लहान मुलीला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता.

यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या घरासमोर प्रदर्शन केले होते आणि दिलजीतने माफी मागवी आशी मागणी केली होती.

यावर दिलजीत ने सांगितले होते की ‘हे गाणं सामाजिक संदेश देते, की कशा कमी वयात मुली दारु आणि नशेची सुरुवात करतात.

दिलजीतच्या वैवाहिक आयुष्याविषयी खुप कमी लोकांना माहिती असेल. तो कधीच आपल्या पत्नीला मीडियासमोर घेऊन आलेला नाही. परंतू नवरा-बायकोमध्ये चांगले संबंध नाही. रिपोर्टनुसार दोघांचे बोलणेही बंद आहे. त्याच्या पत्नीचे नाव संदीप कौर आहे, ती मुलासोबत अमेरिकेत राहते. संदीप कौरचा एखादा फोटोही उपलब्ध नाही

पुढील काळात दिलजीत यातुन येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला…

दिलजीत चित्रपट आणि संगीत या दोन्ही ठिकाणी काम करतोय. पुढील काळात त्याची दिल्लीतील दंगलीवर आधारित ‘दिल्ली १९८४’ ही वेब सिरीज येत आहे. सध्या त्याचे शाद अली सोबत एका चित्रपटाचे शुटींग चालू आहे. तो देखील चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.