पप्या गायकवाड पेक्षा लाईकचा धुरळा उडवणारं अंड..

भावा थंडी वाजतीय तर अंडी खा हे जोक लई जुने झालेत. थंडीच्या दिवसात अंडीची चर्चा होणारच आणि हे अंड तर गिनीज बुकातले रेकॉर्ड तोड करणारे अंडे आहे. या अंड्याने भल्या भल्यांना घाम फोडलाय. कुठे काय विचारता?

इंस्टाग्रामवर.

तर नाईनटीज आणि त्या पूर्वीच्या किड्यांना हे प्रकरण नेमकं काय आहे ते अंड फोडून सांगितलं पाहिजे. तर झालय असं सध्याचं सोशल मिडीयाच जग हे लाईकच्या पेट्रोलवर चालतय. डीपी सोडलाय १००० लाईकचा दणका द्या ची आवाहन होतात. कोण कोण पोरगीच्या हृदयाला भोक आहे एक लाख लाईक मिळाले तर ऑपरेशन फ्री असं डायरेक्ट आमच्या नाजूक हृदयाला पीळ पाडत्यात. कोण देवासाठी लाईक मागतो तर कोण कलाम साहेबांच्या सुभाषितावर.

याच लाईकचा हिशोब अपने कोण और पराये कौन यासाठी लावला जातो. लाईकवरन दोस्ती मध्ये कुस्ती होते, नवरा बायकोमध्ये भांडण होत्यात, युवा नेते आपल्या नेत्यांसाठी लाईकचा धुरळा उठाव्त्यात. 

एक दिवस लोणावळ्याचा पप्या गायकवाड येतो आणि सगळ्यांचाच बाजार उठवतो.

जीव तोडून अभ्यासपूर्वक लेख लिहिला तर इनमिन १५ लाईक. दोस्ताचा डीएसएलआर कॅमेरा वापरून काढलेल्या फोटोला लईत लई ५० लाईक, पोरगी बरोबरच्या फोटोला १५० लाईक आणि कुत्र्याबरोबरच्या क्युट फोटोला २३५ लाईक, मॉडेल पोरींच्या सेल्फीला 1k लाईक असली गणित असताना पप्प्याच्या फोटोनी एका दणक्यात 50k लाईक क्रॉस करून सगळी गणितच बदलून टाकली. त्याच्या एका एका फोटोला ५-५ लाख लाईक होते.

पप्या सुपरस्टार झाला. त्याला tag करून आपल्या पण फोटोला काही लाईक पदरात पाडून घ्यायची स्पर्धा सुरु झाली. राडा करणारा पाटलांचा बंड्या, बाबांची लाडकी संध्या, गावचा डॉन संत्या असल्यांचा पप्प्या गायकवाड देव होता.  एडीट करून डोक्यावर लावलेला हेअरस्टाईल, डोळ्यावर लावलेला गॉगल आणि शब्दांच्या आधी हॅशटॅग कंपल्सरी झाले.

२०१८ साल संपत आलं तोवर पप्प्याची मोहिनी उतरली होती. फेसबुक व्हाटसअप बुढ्ढाबुढ्ढी साठी उरलय. मिलेनीयल किड्स टिकटॉक आणि इंस्टावर आढळतात.

हे वार फक्त भारतात नाही तर पूर्ण जगभरात आहे. तिथं पप्यासारखंच कार्डीयाशियन भगिनी सोशल मिडिया वर राज्य करतात. हां त्या पप्या पेक्षा दिसायला सेक्सी आहेत हे मात्र खर.

याच कार्डीयाशियन भगिनी पैकी एक आहे कायली जेन्नर. हिने मागच्या वर्षी आपल्या पोरीच्या जन्मानंतरचा एक फोटो इंस्टाग्राम वर अपलोड केलेला त्या फोटोला १.८ कोटी इतके लाईक आले होते. (मिलियन बिलीयनचे हिशोब आमचे कच्चे आहेत, चूकभूल द्यावी घ्यावी)

कायलीचं बाळ म्हणजे तिथलं तैमुर. त्या फोटोवर झालेल्या लाईकच्या पावसामुळ गिनीजबुकमध्ये नोंद झाली. हा विक्रम कोणीच मोडू शकला नव्हता.

४ जानेवारी २०१९ला इंस्टावर एक नवीन रोज उगवणाऱ्या लाखो अकाऊंट प्रमाणे एक नवीन अकाऊंट उगवलं.”world_record_egg”. बायोमध्ये लिहिलं होत “egg gang”.आणि एका अंड्याचा फोटो. एकच फोटो आणि फक्त एवढ्या भांडवलावर या अंड्याने जगभर हवा केली.

वर्ल्ड रेकॉर्ड करणे हेच आपले एकमेव ध्येय असलेले हे अंडे बघता बघता व्हायरल ट्रेंडीग वर गेले.

काल या अंड्याने कायलीच्या फोटोला माग टाकून गिनीज बुकात इंट्री मारली. आज बघितलं तर कायलीच्या पोरीच्या फोटोच्या डबल लाईक अंड्याने पटकावले आहेत. वानराच्या शेपटी प्रमाणे लाईक वाढतच आहेत. आत्ताचा काउंट विचारला तर ४ कोटी ६ लाखच्या जवळपास आहे. रात्रीच्या वाचकापर्यंत ही पोस्ट येई पर्यंत ५ कोटी, साडे ५ कोटी सहज क्रॉस करेल.

या अंड्याचे आईबाबा आणि या अकाऊंटचे मालक कोण आहेत अजून पण माहित नाही. हे त्यांनी का केले हे पण माहित नाही.

फक्त या फोटो मुळे एकच सिद्ध केले की तुम्ही दिसायला कसेही असा, तुमच्या कडे आय फोन, डीएसएलआर असुदे किंवा नसू दे, एडीटच सॉफ्टवेअर असू दे किंवा नसू दे, पोरगी असू दे किंवा नसू दे, कुत्र असू दे किंवा नसू दे तुम्ही पण हिट होणार. अंड म्हणतय, पप्या गायकवाड म्हणतय तर तुम्ही का निराश बसलाय?

अपना टाईम आयेगा !!!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.