हातात बंदूक घेतलेल्या अंजलीने क्रिकेट सोडूनसुद्धा जग जिंकता येते हे दाखवून दिलं

भारत म्हणजे क्रिकेट वेड्यांचा देश. एक काळ असाही होता मुलं खेळायचं म्हंटल की बॅट आणि बॉल घेऊन घरातून बाहेर पडणार. शाळेत कबड्डी खोखो रनिंग आणि गल्लीत क्रिकेट नाही तर जास्तीत जास्त फुटबॉल. अशा वेळी एक टिपिकल महाराष्ट्रीयन मुलगी अख्ख्या भारताला नेमबाजी हा देखील खेळ आहे हे शिकवते, त्यात जगातली चॅम्पियन बनते हे म्हणजे अचाटच होतं.

नाव अंजली वेदपाठक !!

तिचा जन्म मुंबईचा. घर मध्यमवर्गीय. पोरीला लहानपणापासून खेळायची आवड. तेरा चौदा वर्षाची असताना टीव्हीवर कार्ल लुईसची ऑलिम्पिकमध्ये केलेली लयलूट बघून आपण सुद्धा असच काही तरी करून दाखवायचं हे तिच्या मनात घट्ट बसल होतं. त्यातून एनसीसीला गेली. तिथेच रायफल शुटींगची तिची पहिली ओळख झाली.पण असाही काही खेळ असतो हे तिला माहित नव्हत.

एनसीसी आवडायचं, तिथले कँप्स आवडायचे ट्रेकिंग जायला मिळते म्हणून अंजलीने एनसीसी साठी फेमस असलेल्या किर्ती कॉलेजला अॅडमिशन घेतल.

तिथे गेल्यावर एकदा तिला आणि तिच्या एनसीसीमधल्या काही मुलीना रायफल शुटींग शिकायला पाठवलं. झालं अस होतं की तिच्या कॉलेजमधल्या काही मुली शुटींगच्या नॅशनल लेव्हेल ज्युनिअर चॅम्पियनशिप साठी जाणार होत्या पण कसल्या तरी परीक्षेमुळे त्यांचं जाणं रद्द झालं. म्हणून या एनसीसीच्या मुलीना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आल.

अंजली एनसीसीमध्ये होती खरी पण तिला खरच बंदूक चालवायला यायची नाही.

तरी तिच्या शिक्षकांनी तिकडे बळजबरीने पाठवलं. पहिल्याच दिवशी अंजलीने मारलेल्या सगळ्या गोळ्या चुकल्या. तिने आणि तिच्या मैत्रिणीने दिपाली देशपांडेने ठरवलं आता परत तिकडे जायचं नाही.

पण तस घडायचं नव्हतं. त्या दोघींच्याही नशिबात देशाला शुटींगमध्ये पदके मिळवून देणे लिहीलेलं होतं,

त्यांच्या मॅडमनी रागे भरून अंजलीला आणि दिपालीला परत शुटींग रेंजवर उभ केलं. भीष्मराज बाम बाम नावाचे निवृत्त पोलीस महासंचालक ही टीम स्पर्धेला घेऊन जाणार होते. त्यांनी कसबस समजावलं.

एनसीसीमध्ये शिकलेली जिद्द,चिकाटी कामी आली. इच्छा नसूनही सात दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केलं.

अहमदाबादला ती स्पर्धा होणार होती. अवघ सात दिवस हातात बंदुक घेतलेल्या या मुलीनां मेडलची अपेक्षा नव्हतीच. एखाद्या पिकनिकला जायला मिळतंय असा विचार करत त्या स्पर्धेसाठी अहमदाबादला आल्या.

योगायोग म्हणा किंवा उपजत टॅलेंट काही पण पहिल्यांदाच स्पर्धेत खेळणाऱ्या फक्त एक आठवडा ट्रेनिंग घेतलेल्या अंजलीने त्या  नॅशनल लेव्हेल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राला पहिलं रौप्यपदक मिळवून दिल.

तो दिवस तिच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.

अंजलीचा कॉलेजमध्ये सत्कार झाला, एनसीसीत सत्कार झाला, पेपरमध्ये फोटो आले.

घरचे सगळे खुश होते नेमबाजी खेळात करीयर करायचं तिने ठरवलं.घरच्यांची तिला काय ना नव्हती. पण त्यासाठी लागणारे महागडे कीट, लाखो रुपयांची रायफल अशा गोष्टी त्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. अंजली सांगते,

“तेव्हा परिस्थिती अगदीच बीकट होती. वरळीला शूटिंग रेंज म्हणजे चार खांब होते आणि पत्र्याचं छप्पर होतं. 7-8 जणींमध्ये 2 रायफल्स होत्या. त्याही चालल्या तर चालल्या अशी अवस्था होती. पण त्यात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही 7-8 जणी एकत्र होतो, आमच्या आवडी-निवडी जुळत होत्या म्हणून ते सुरू राहिलं. मी एकटीच असते, तर हे अवघड झालं असतं.”

भीष्मराज बाम आणि नेव्हीतून रिटायर झालेल्या संजय चक्रवर्ती या दोघांची खूप मदत झाली. त्या काळी या मुलींच्याकडे गोळ्या नव्हत्या. त्या फक्त होल्डिंग प्रॅक्टिस करायच्या. म्हणजे काय ? तर बंदूक हातात घ्यायची आणि मेन्टली विचार करायचा की मी आत्ता शूट केलं तर काय होईल.

मग स्पर्धेच्या वेळेस बाम सर कुठून तरी पैसे जमवून त्यांना नॅशनल प्रॅक्टिसला पाठवायचे. आणि तेवढ्यातही अंजली आणि टीम बर्‍यापैकी कामगिरी करायच्या. बाम सर स्वत:चा एवढा वेळ देतात,मदत करतात. मग कमीतकमी त्यांच्यासाठीतरी  काहीतरी करून दाखवलं पाहिजे या जिद्दीने त्या मुली लढत राहिल्या. 

या काळात टिकून रहाणं सोपं नव्हतं.कधीकधी खूप नैराश्य यायचं. हे का आणि कशाला करतोय ? असा प्रश्न पडायचा. पण तरी त्यांनी रँकिंग त्यातूनही टिकवून ठेवल होत.

तेव्हा बंगालच्या मुलींच वर्चस्व होतं. त्यांच्याकडे पैसा असायचा. भारीतले कीट, बंदुका असायच्या. सोमा दत्ता ही बंगालची शूटर स्वत: जर्मनीला रहायची. महाराष्ट्रातली अख्खी टीम मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होती. या मुली मुद्दाम बंगालच्या टीमच्या मागे बसायच्या. ते काय विचार करतात, काय साधनं वापरतात, हे बघायच्या. 

अंजली म्हणते,

” माझ्या करियरची जवळपास 10 वर्ष अशी गेली. ती मिळाली असती, तर कदाचित मी अजून पुढे गेले असते. पण मला जेवढं नुकसान झालं, तेवढाच माझ्या खेळाला फायदा झाला. कारण कोणी ना कोणी हे करायलाच हवं होतं. आम्ही जर सुरुवात केली नसती, तर आज हा खेळ इथपर्यंत पोहचलाच नसता. “

याच दरम्यान त्यांची भेट सुप्रसिद्ध सिनेअभिनेता नाना पाटेकरांशी झाली. त्यांना स्वतःला नेमबाजीची आवड होती. लहानपणापासून मिलिट्रीमध्ये जायचं त्यांचं स्वप्न होतं. पन काही कारणाने ते अपूर राहिलेलं. तरी काही क्षणासाठी का होईना ते स्वप्न अनुभवण्यासाठी ते वरळीच्या शुटींग रेंजवर यायचे.

तिथे या छोट्या छोट्या मुली अपुऱ्या साधनानिशी सराव करत आहेत, महाराष्ट्राला मेडल आणत आहेत हे ते पहात होते. एक दिवस त्यांनी या सगळ्यांना हजारो रुपयांचे कीट आणून दिले.

अंजलीला आयुष्यातील पहिले कीट नाना पाटेकर यांच्याकडून मिळाले. हायको प्रॉडक्ट्सच्या मंगला अभ्यंकरनी दिलेल्या मदतीतून अंजलीला पहिली रायफल मिळाली. सालं होतं १९९४. 

तिथून पुढे सहाच महिन्यात अंजलीला पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला मिळाली. पहिल्याच साउथ एशियन गेम्स स्पर्धेत तिला 3 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 2 ब्रॉन्झ मेडल्स मिळाली. हा एक रेकॉर्ड होता. तिथे अंजलीला खूप आत्मविश्वास मिळाला.

1995 मध्ये मीडियानं अंजलीबद्दल ‘स्टार इज बॉर्न’ असं लिहिलं. 

क्रिकेट सोडून पहिल्यांदाच वेगळ्या कुठल्या खेळातल्या खेळाडूची बातमी होत होती. अंजली दिसायला देखणी होती, तिचे फोटो पहिल्या पानावर झळकू लागले. लोकांचीही तिच्याबद्दल नेमबाजी या खेळाबद्दल उत्सुकता वाढली.

याचा परिणाम सरकारवर देखील झाला. प्रशासनाला जाग आली. या खेळात देखील आपणाला मेडल मिळू शकतात याची जाणीव झाली. 1998 मध्ये त्यांनी हंगेरीच्या लास्‌लो यांना कोच म्हणून आणलं. ते यापूर्वी मलेशियाचे कोच होते. तिथल्या नेमबाजांची अवस्था पण भारतासारखीच होती. पण त्यांनी एका वर्षात कॉमनवेल्थ जिंकली होती.

त्यांनी भारतातली नेमबाजीची सर्व परिस्थिती बदलून टाकली. त्यांचं एकच म्हणण असायचं.

“जर तुम्हाला फेरारीशी रेस करायची असेल तर अॅम्बेसिडर गाडीतून तुम्ही जाऊ शकत नाही. हा खेळ खेळायचा झाला तर दर्जेदार साहित्य लागणारच.”

खूप पाठपुरावा करून त्यांनी अंजली आणि टीमसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची जॅकेट्स मागवले बेसिकपासून शिकवलं. म्हणजे श्वासावर कसा कंट्रोल ठेवावा, ट्रिगर खेचताना किती स्टेजेस असतात वगैरे वगैरे. त्यांच्या 3 ते 4 महिन्यांच्या प्रोफेशनल ट्रेनिंगनंतर अंजलीची कामगिरी प्रचंड सुधारली.

वर्षभरात त्यांनी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकली. 

नंतरच्या वर्षात अंजलीने सगळ्या स्पर्धा जिंकल्या. याच काळात अंजलीचं लग्न झालं. अंजली वेदपाठकची अंजली भागवत झाली. लोक म्हणाले की आता तिचं करीयर संपल. पण ते तिने खोट ठरवलं. उलट लग्नानंतर अंजलीचं करियर बहरत गेलं. त्याबद्दल बोलताना अंजली म्हणते,

“घरातून पूर्ण सहकार्य असल्याशिवाय पूर्ण परफॉर्मन्स देता येत नाही. मला सुदैवानं माझ्या आई-वडिलांचा आणि नंतर माझा नवरा, सासू-सासरे यांचा पूर्ण सपोर्ट मिळाला. लग्न झालं, त्यावेळेस माझे कोचही नव्हते. त्यामुळे मला घरच्यांचा सपोर्टचा खूप उपयोग झाला.”

२००२-०३ हे वर्ष तिच्यासाठी एकदम महत्वाच ठरल. त्यावर्षीच्या सगळ्या स्पर्धामध्ये तिने विजय मिळवला. कॉमनवेल्थ, वर्ल्ड कप प्रत्येक स्पर्धामध्ये तिने रेकॉर्ड केले, देशाला खंडीभर गोल्ड मेडल मिळवून दिले. ती जगभरातील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरली.

त्यावर्षी तिला देशातला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.

पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये तिझा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा बनला होता. देशाच्या खूप अपेक्षा होत्या. पण कुठेतरी प्रोफेशनल ट्रेनिंगमध्ये कमी राहिली, अंजलीच ऑलिम्पिकच स्वप्न अधूर राहिलं. सरकारकडून योग्य ती मदत मिळाली नाही याची तिला शेवटपर्यंत खंत राहिली.

२००४ नंतर परिस्थिती बदलली. तिच्या जुन्या कोचना परत आणण्यात आल. सरकारबरोबर कॉर्पोरेट्सचीही मदत झाली. मित्तल चॅम्पियन ट्रस्ट, ह्युंदाई मोटर्सनी मदत दिली. रिलायन्स कम्युनिकेशननी अंजली व इतरांना नोकर्‍या दिल्या. सुमा शिरूर, दिपाली देशपांडे यांनी पुढे मोठी कामगिरी करून दाखवली. मुलांच्यात अभिनव बिंद्रा, गगन नारंग, विजय कुमार यांनी ऑलिम्पिक गाजवलं. आज भारताची नेमबाजीमध्ये दादागिरी चालते

पण अंजलीसाठी जो क्षण गेला, तो परत मिळाला नाही.

आता अंजली फक्त खेळाडू म्हणून नाही तर कोच म्हणूनही काम करते. भारतात नेमबाजी रुजवण्याच क्रेडीट तिला आणि तिचे कोच भीष्मराज बाम यांनाच जाते. अंजलीने त्याकाळात जे यश मिळवले, त्याला  ग्लॅमर लाभल त्यामुळेच इतरांच्या वाटा सोप्या झाल्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.