मुख्यमंत्री झाल्यापासून नितीश कुमारांनी कोणकोणती फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे ?

गेल्या महिन्यात बिहारमध्ये अगदी एका दिवसात सत्तापालट झालेलं आपण सर्वांनी बघितलं. भाजपसोबत असलेली युती तोडून नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं. नवीन सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनीच शपथ घेतली.

नितीश कुमारांनी यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन स्वतःच्या नावे आठ वेळा या पदावर विराजमान होण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र यावेळी त्यांच्या या पदग्रहणासोबत त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केल्याचं दिसत आहे. त्यांनी सुरु केलेल्या या प्लॅनिंगकडे बघता अनेकजण नितीश कुमार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये सामील होण्याची तयारी करत असल्याचं म्हणत आहेत.

मात्र नितीश कुमारांनी या चर्चांवर उत्तर देताना त्यांचा पंतप्रधान पदासाठीचा कोणताच प्लॅन नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे जेडीयूने त्यांच्या बाजूने पोस्टरबाजी सुरु केली आहे आणि पक्षाचे अनेक नेतेही त्यांच्यासाठी बॅटिंग करत असल्याचं दिसतंय.

होणाऱ्या चर्चा, त्यावर नितीश यांचं वक्तव्य आणि पक्षाच्या नेत्यांची वागणूक यातील गोंधळ समूजन घेण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून नितीश कुमारांनी कोणकोणती फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे? यावर एकदा नजर टाकूया… 

नितीश कुमारांची ही फिल्डिंग म्हणजे त्यांनी सुरु केलेलं ‘राजकीय भेटींचं सत्र’

१. नितीश कुमार आणि केसीआर

मुख्यमंत्री बनल्यानंतर नितीश कुमारांनी केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधातील पक्षांच्या नेत्यांना भेटणं सुरु केलं आहे. याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली. ३१ ऑगस्टला के. चंद्रशेखर राव यांनी पटना इथे भेट घेतली होती.

त्यावेळी दोघांनी देखील ‘भाजपमुक्त भारत’ या अजेंड्यावर काम करण्याचं सांगितलं होतं.

केसीआर खुल्या पद्धतीने पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये सामील झाले असून त्यांनी देखील असंच भेटीचं सत्र सुरु केलं आहे आणि त्याचाच भाग म्हणजे नितीश कुमार यांच्याशी भेट होती. तर दुसरीकडे नितीश कुमारांचा देखील असाच काहीसा हेतू असल्याचं दिसतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात. 

२. नितीश कुमार आणि राहुल गांधी

केसीआर यांच्यानंतर नितीश कुमार यांनी दिल्लीचं तिकीट काढलं आणि दुसरी भेट त्यांनी घेतली राहुल गांधी यांची. हीच एक गोष्ट खूप जास्त चर्चेत आली. एकतर भाजपचा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचं पूर्वापार वजन राहिलेलं आहे. जरी आता काँग्रेसपेक्षा इतर पक्ष विरोधकांच्या लाईनमध्ये पुढे गेले असले तरी काँग्रेसचं महत्व अजूनही आहेच.

शिवाय दुसरं म्हणजे भाजपच्या विरोधात जे नेते विरोधकांना एकजूट करायचा प्रयत्न करत आहेत, जसं की, केसीआर, ममता… मात्र यांच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस कुठेच दिसत नाही. नितीश यांनी राहुल यांच्याशी भेट घेतल्यावर त्यांच्या प्रयत्नांना मात्र काँग्रेस पाठिंबा देत असल्याचं दिसलं आणि म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

काँग्रेसच्या ताकदीबद्दल बोलायचं झालं तर २०१९ मध्ये त्यांनी ५२ जागा जिंकल्या आणि देशभरातील त्यांचा मतांचा वाटा १९.४६ टक्के होता. सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार चालवत आहे. तर बिहार, झारखंड आणि तामिळनाडूमध्ये ते आघाडी सरकारमध्ये सहभागी आहेत. या भेटीदरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती माध्यमांनी दिली.  

३. नितीश कुमार आणि सीताराम येचुरी 

राहुल गांधींनंतर नितीश कुमारांनी भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची भेट घेतली. यावेळी नितीश म्हणाले होते की, जर दावा पक्ष आणि आम्ही सोबत आलो तर ही मोठी गोष्ट ठरेल. देशात बदल घडवण्यासाठी राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या सीताराम यांना सोबत घ्यावंच लागेल. 

तर या बैठकीनंतर सीताराम येचुरी म्हणाले की, प्रादेशिक पक्ष, डावे आणि काँग्रेस एकत्र आले तर देशात बदल दिसून येऊ शकतात. हा सकारात्मक संदेश असून विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवायला हवं. तर आधी सर्वांना एकत्र आणणं हा अजेंडा आहे, त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल, असं देखील येचुरी म्हणाले होते.

सीताराम येचुरी यांच्या पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांना १.७५ टक्के मते मिळाली होती. सध्या केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण बहुमताचं सरकार आहे.

४. नितीश कुमार आणि डी राजा 

सीताराम येचुरी यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांचीही न चुकता भेट घेतल्याचं दिसलं. सीपीआय कार्यालयात जाऊन त्यांनी डाव्या पक्षाच्या दुसऱ्या नेत्याला देखील सोबत येण्याचा आवाहन केलं. यावेळी नितीश यांच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर डी. राजा यांनी ‘योग्य निर्णय’ म्हणत समर्थन केल्याचं देखील सांगण्यात आलं. 

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये डी राजा यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना ०.५८ टक्के मतं मिळाली होती. सध्या बिहारमधील नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येही ते सहभागी आहेत.

५. नितीश कुमार आणि एचडी कुमारस्वामी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचीही भेट नितीश कुमार यांनी घेतली. नितीशकुमार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या घरी पोहोचले होते तिथेच त्यांनी कुमारस्वामी यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास दीड तास बैठक चालली. या बैठकीनंतर विरोधकांना एकत्र आणण्याच्या नितीशकुमार यांच्या मोहिमेचं कुमारस्वामी यांनी कौतुक केल्याचं सांगितलं गेलं.

शिवाय या प्रचारात नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन देखील कुमारस्वामी यांनी दिलं आहे, असं सांगण्यात येतंय. तर या भेटीनंतर २०२४ च्या निवडणुकीसाठी जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) एकत्र येतील, अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. 

सध्या कुमारस्वामी यांची पार्टी देशात कुठेच सत्तेत असली तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाने एक जागा जिंकली होती आणि त्यांना ०.५६ टक्के मतं मिळाली होती. 

६. नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल 

नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीकडे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या प्रतिस्पर्धीची भेट म्हणून बघितलं गेलं. कारण स्वत: अरविंद केजरीवाल सांगितलं आहे की ते राष्ट्रीय पातळीवर मोदींना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. 

असं असताना आपलं मिशन हे केवळ विरोधकांना एकत्र आणण असल्याने नितीश कुमार यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्याचं सांगितलं गेलं.  

या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत माहिती दिली की नितीश कुमार आणि त्यांच्यात  देशाशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न जसे की, शिक्षण, आरोग्य, ऑपरेशन लोटस, भाजपकडून उघडपणे आमदार विकत घेणं, लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडणं, भाजप सरकारांचा वाढता हुकूमशाही भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर चर्चा झाली, अशी माहिती दिली.

७. नितीश कुमार आणि ओमप्रकाश चौटाला

नितीश कुमार यांनी गुरुग्राममध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची देखील भेट घेतली. ओ.पी. चौटाला काही दिवसांनंतर फरीदाबादमध्ये रॅली काढणार आहेत. ज्यासाठी त्यांनी बिगर काँग्रेस-भाजप नेत्यांना आमंत्रण देणार असल्याचं म्हटलं आहे. ओ.पी चौटाला यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माहिती देताना म्हटलंय की, ओपी चौटाला यांनी देखील भाजपपासून विभक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाला योग्य म्हटलं आहे.

ओमप्रकाश चौटाला यांच्या इंडियन नॅशनल लोकदलाचा हरियाणात एकच आमदार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नव्हती आणि केवळ ०.०४ टक्के मतं मिळाली होती. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याशीही दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर चर्चा केली, असं सांगितलं जातंय. 

८. नितीश कुमार आणि शरद यादव 

दिल्ली दौऱ्यादरम्यान नितीश आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आवर्जून भेटल्याचं दिसलं. त्यांनी जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांची देखील भेट घेतली. माध्यमातील माहितीनुसार, शरद यादव आणि नितीश कुमार या दोघांनाही असं वाटतं की, नितीश कुमार यांनी सध्या तरी स्वत:ला पंतप्रधानपदाचा  उमेदवार म्हणून मोहीम राबवू नये आणि म्हणून सर्वांना प्रथम एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

अशा जवळपास १० नेत्यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार पुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रालोद, आयएनएलडी, टीएमसी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय.

केसीआर आणि ममता बॅनर्जी यांच्या फॉर्म्युल्याच्या धर्तीवर आता नितीश कुमार देखील विरोधकांना एकत्र करत असल्याचं दिसतंय. ते पंतप्रधान पदासाठी हे करत आहे किंवा नाही हा विषय वेगळा ठवल्यास त्यांच्या या प्रयत्नांना कसा प्रतिसाद मिळतो, हे बघणं गरजेचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.