मुख्यमंत्री अंतुलेंच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित सिनेमा म्हणजे ‘आजचा दिवस माझा’

आजवरचे सर्वात वादग्रस्त  मुख्यमंत्री कोण असं विचारलं तर बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचं नाव समोर येईल. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून त्यांची देशभरात चर्चा झाली होती. पण कोकणाचा हा सुपुत्र जातीपातीच्या पुढे गेलेला होता. तालुका पातळीवर पक्षाच्या कामापासून सुरवात करून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या अंतुलेची तळागाळातल्या सामान्य व्यक्तीशी नाळ जोडलेली होती.

त्यांचा स्वभाव फटकळ होता. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जागेवर निर्णय घ्यायचे, विकासकामे लाल फितशाहीमध्ये अडकू नयेत यासाठी ते प्रयत्नशील असायचे, त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असायची. यातून बऱ्याचदा त्यांच्यावर हुकूमशहा म्हणून टीका होत असे. विरोधक त्यांना सुलतान अंतुले म्हणून ओळखायचे पण त्यांना याची पर्वा नव्हती.

एका असाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला ज्यातून त्यांचं संवेदनशील व्यक्तिमत्व दिसून येतं.

गोष्ट आहे १९८० सालची. अंतुले नुकतेच मुख्यमंत्रीपद आले होते. तेव्हाचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटराव देशपांडे यांच्या घरी कोणाचे तरी लग्न होते. स्वतः मुख्यमंत्री त्या रिसेप्शनला हजर राहणार होते.

ठरल्या वेळी अंतुलेंच कार्यक्रमस्थळी आगमन झालं. जस्टीस देशपांडे यांनी समारंभात उपस्थित असणाऱ्या सन्मानीय व्यक्तींची अंतुलेंना ओळख करून देण्यास सुरवात केली. प्रत्येक जण उभे राहून मुख्यमंत्र्यांशी दोन शब्द बोलत होता. ओळख करून देत देत देशपांडे एका कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीपाशी येऊन पोहचले. न्यायमूर्ती त्या व्यक्तीला म्हणाले,

“उत्तमराव उठा मुख्यमंत्री आलेत. “

ती व्यक्ती खडबडून उठली. अंतुले त्यांना थोड्याशा गुश्श्यातच म्हणाले,

“मुख्यमंत्री आलेले असताना साधं उभं राहण्याचं मॅनर्स नाहीत का ?”

त्यावर देशपांडे त्यांना म्हणाले,

“अंतुले साहेब हे उत्तमराव अग्निहोत्री. हे अंध आहेत. पण संगीततज्ञ आहेत. यांना सुरमणी पुरस्कार देखील मिळालाय.”

ते ओळख करून देत होते आणि मुख्यमंत्री लाजेने शरमिंदा झाले होते.

अंतुलेंच्या पत्नी तिथेच त्यांच्यावर चिडल्या. आपल्या हातून झालेल्या एका अंध कलाकाराच्या अपमानामुळे अंतुले देखील अस्वस्थ झाले होते. त्याच अवस्थेत ते न जेवता वर्षा बंगल्यावर परतले. तिथे गेल्या गेल्या आपले खाजगी सचिव बी.डी. शिंदे यांना बोलावून घेतलं.

शिंदे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. नुसता माफी मागून उपयोगाची नाही. काही तरी करायला हवं.

त्यांचे पी.ए. न्यायमूर्ती देशपांडे यांच्या घरी गेले. उत्तमराव अग्निहोत्री यांच्या बद्दल सगळी माहिती घेतली. ते मूळचे मराठवाड्यातील होते. एकेकाळचे संगीत शिक्षक. दोन मुले व पत्नी एवढं त्यांचं कुटुंब. त्यांनी काही वर्षांपूर्वी शासनाकडे मुंबईत घर मिळावे म्हणून अर्ज केला होता. त्याचा पाठपुरावा कित्येक वर्ष ते करत होते पण शासन दरबारी निर्णय होत नव्हता.

सचिव बी.डी. शिंदे यांनी सगळी माहिती लिहून घेतली, मुख्यमंत्री कार्यालयाला स्मरणपत्राचा अर्ज तिथे बसून लिहून घेतला आणि या सगळ्याची माहिती देण्यासाठी पुन्हा वर्ष बंगल्यावर आले. अंतुले त्यांना म्हणाले,

“उद्याचा दिवस उजाडण्यापूर्वी त्यांना घर देऊनच मी प्रायश्चित्त घेईन.”

अंतुलेंचा आदेश सुटला आणि सगळी सरकारी यंत्रणा झाडून कामाला लागली. सगळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना परत ऑफिसवर बोलावून घेण्यात आले. स्वतः मुख्यमंत्री मध्यरात्री मंत्रालयावर येऊन थडकले. कोणी तरी शंका काढली कि कलावंतांना सरकार तर्फे घर देण्याची कोणतीही तरतूद नाही. अंतुलेंनी जागेवर जी.आर.काढला.

त्यांनी उत्तमराव अग्निहोत्रींचा अर्ज तयार करून घेतला, तेव्हाच्या गृहनिर्माण मंत्री प्रतिमाताई याज्ञीक यांच्या घरी सही साठी पाठवून दिला.

पुढे आणखी एक प्रश्न उभा राहिला की हे घर घेण्यासाठी उत्तमराव अग्निहोत्री यांच्याकडे पैसे आहेत का?

अंतुलेंनी रात्री १ वाजता मुख्यमंत्री निधीतून ४८ हजार रुपयांचा चेक उत्तमराव अग्निहोत्री यांच्या नावाने काढला. सगळं शासकीय चौकटीच्या नियमात बसूनच पण हि मदत आजच करायची हे त्यांचं पक्कं होतं.  

तोवर त्यांच्या सचिवाने म्हाडाच्या कोणत्या योजनेत फ्लॅट रिकामा आहे याची माहिती शोधली. ताडदेवजवळ मणियार बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट रिकामा होता मात्र तो दुसऱ्या एका व्यक्तीला अलॉट झाला होता. त्या माणसाला दुसऱ्या फ्लॅटची व्यवस्था करतो असं सांगून तो उत्तमराव अग्निहोत्रींच्या नावावर करण्यात आला.

त्या फ्लॅटमधील जळमटं काढण्यापासून रंगकाम देण्यापर्यंत फ्लॅट सुसज्ज करण्यासाठी म्हाडाचे ठेकेदार रातोरात  कामाला लागले.

त्यांनी पहाटे ६ वाजेपर्यंत तो फ्लॅट सुशोभित करून तयार केला. लगोलग मुख्यमंत्र्यांचे सचिव न्यायमूर्ती देशपांडे यांच्या घरी पोहचले. सकाळचे साडे सहा-सात वाजले असतील. न्यायमूर्तींना कालच्या एका रात्रीत काय काय घडलं हे सांगितलं आणि सकाळी ९ वाजताच गृह्प्रवेशाचा मुहूर्त करायचा आहे हि देखील माहिती दिली.

न्यायमूर्ती देशपांडे हेलावून गेले. आपल्या हातून चुकून घडलेला प्रमाद दुरुस्त करण्यासाठी प्रायश्चित्त घेणारा मुख्यमंत्री आजवर कोणी पाहिला नव्हता.

पण हे प्रायश्चित्त इथेच थांबले नाही. पुढे एकदा मुख्यमंत्री एसएनडीटी विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथल्या कुलगुरूंनी त्यांच्यापुढे काही मागण्या मांडल्या. तेव्हा अंतुलेनी त्यांना उत्तमराव अग्निहोत्री यांना नोकरीवर घेण्याची विनंती केली. त्यांना द्यावा लागणाऱ्या पगाराएवढी रक्कम शासकीय अनुदानाच्या रूपात विद्यापीठाला दिली व तिथेच नोकरीची ऑर्डर काढायला लावली.

मनात आणलं तर शासकीय यंत्रणा कशी काम करू शकते पण त्यासाठी अंतुलेंसारखा रिंगमास्टर लागतो हे या प्रसंगामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर .

काही वर्षांपूर्वी याच सत्य घटनेवर आधारित आजचा दिवस माझा हा सिनेमा चंद्रकांत कुलकर्णी यांनी सचिन खेडेकर ,महेश मांजरेकर, अश्विनी भावे यांना घेऊन बनवला होता. त्यातील मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांचा कॅरेक्टर म्हणजे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले.

संदर्भ-‘अंतुलेंनी स्वतः शिक्षा घेतली तेव्हा..’ पत्रकार अतुल कुलकर्णी 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.