इंदिराजींचा निरोप आल्यावर माणिकचंदच्या मालकांना थेट थिएटरमधून उचलण्यात आलं

महाराष्ट्रातील यशस्वी उद्योगपतींची यादी काढली तर कै.रसिकलाल धारिवाल यांचे नाव या यादीत नक्कीच वरच्या स्थानावर येईल. उंची पसंद म्हणवल्या जाणाऱ्या माणिकचंद गुटख्याची सुरवात धारिवाल यांनी केली. माणिकचंद साम्राज्य स्थापन केलं.

एक यशस्वी उद्योगपती तर ते होतेच पण त्यांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावलं होतं हे आपल्या पैकी अनेकांना ठाऊक नसते.

रसिकलाल धारिवाल यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचा विडी बनवण्याचा उद्योग होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर घराची जबाबदारी १४ वर्षांच्या रसिकलाल यांच्यावर पडली. स्टेशनरी दुकानापासून सुरवात केली पुढे तंबाखू व्यवसायात आले. माणिकचंदची निर्मिती केली आणि नंतरचा इतिहास तर सगळ्यांना माहीतच आहे.

शिरूर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. तब्बल २१ वर्षे ते शिरूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.

१९७७ साली इंदिरा गांधी महाराष्ट्रात प्रचारदौऱ्यासाठी आल्या होत्या. नुकतीच आणीबाणी मागे घेतल्यानंतरचा हा काळ. काँग्रेसची अनेक शकले झाली होती. इंदिराजींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. सर्वत्र पातळीवर पराभवाचा सामना करावा लागत होता. अनेकांना वाटत होते की त्यांचे राजकारण संपले पण इंदिरा गांधी जिद्दीने पुन्हा पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत होत्या.

याच साठी महाराष्ट्रात झंझावती दौरा आखला होता.

इंदिरा गांधी यांची एक सभा शिरूर मध्ये होणार होती. सभे नंतर इंदिरा गांधी जेव्हा परत मुंबईला जाण्यासाठी निघाल्या तेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला होता. संध्याकाळच्या आत काहीही करून इंदिराजींना मुंबईत जायचे होते. अचानक आलेले हे संकट बघून त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आली. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या रसिकलाल धारिवाल यांनी तातडीने आपली कार आणली व इंदिरा गांधींना मुंबईत पोहचवण्याची व्यवस्था केली.

शिरूर हुन मुंबईला परत जाताना स्वतः रसिकलाल ड्रायव्हिंग करत होते.

तेव्हा त्यांच्या इंदिरा गांधींशी गप्पा झाल्या. त्यांच्याशी बोलताना स्थानिक राजकारण महाराष्ट्रातील बदलणारी गणिते याची  इंदिराजी अंदाज घेत होत्या. हा तरुण हुशार आहे यांच्यात राजकारणात पुढे जाण्याची क्षमता आहे याची त्यांना जाणीव झाली होती.

पुढे १९८० सालच्या विधानसभा निवडणुका आल्या. त्याकाळी काँग्रेसची उमेदवारी देण्यापूर्वी मुंबई मध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व मोठे नेते मुलाखत घ्यायचे. रसिकलाल धारिवाल देखील आपल्या मित्रांच्या आग्रहामुळे मुंबईला मुलखात देण्यासाठी आले.

धारिवाल यांची निवडणुकीची तितकीशी तयारी नव्हती आणि शिरूर मतदारसंघात अनेक दिग्गज नेते असल्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची त्यांना खात्री होती.

त्यामुळे सहज म्हणून त्यांनी मुलाखत दिली. अंतुले यांनी हि मुलाखत घेतली. मुलाखत झाल्यावर धारिवाल आपल्या मित्रांसह मेट्रो थिएटरमध्ये शोले सिनेमा पाहण्यासाठी गेले. 

इकडे काँग्रेस भवन मध्ये जेव्हा आमदारांची लिस्ट फायनल होत होती तेव्हा इंदिरा गांधींचा अंतुले यांना फोन आला. त्यात बोलताना त्यांनी शिरूर मधून धारिवाल यांचे तिकीट पक्के करण्यास सांगितले. तिकीट जाहीर झालं पण धारिवाल तिथे हजर नव्हते. त्यांची शोधाशोध सुरु झाली.

मोबाईल वगैरे नसलेला तो काळ. अंतुले यांनी धारिवाल यांना शोधण्यासाठी माणसे पाठवली. कुठून तरी कळाल्यामुळे हे काँग्रेस कार्यकर्ते मेट्रो थिएटरमध्ये येऊन थडकले. मध्येच सिनेमा थांबवण्यात आला. प्रेक्षकांना कळेना काय झालं आहे.

अचानक रसिकलाल धारिवाल यांचं नाव पुकारण्यात आलं.

धारिवाल याना देखील आश्चर्याचा धक्का बसला. काँग्रेस कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले. पक्षाच्या ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांना कळालं कि आपल्याला आमदारकीचा तिकीट मिळालं आहे आणि तेही इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून.

माणिकचंद वाले धारिवाल तो शोलेचा शो आयुष्यभर विसरू शकले नाहीत. पक्ष फुटला असूनही दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवत इंदिरा गांधींनी पुन्हा शुन्या पासून सुरवात केली होती याचे उदाहरण म्हणजे रसिकलाल धारिवाल.

रसिकलाल धारिवाल याना न मागता हि लॉटरी लागली पण त्यांना त्याचा फायदा उठवता आला नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे  सूर्यकांत पलांडे यांनी त्यांचा पराभव केला. १९८४ च्या निवडणुकीतही धारिवाल यांनाच काँग्रेसचे तिकीट मिळाले होते मात्र तेव्हा बापूसाहेब थिटे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर धारिवाल यांनी पुन्हा निवडणूक लढवली नाही.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.