शिवरायांच्या सैन्यात लढलेल्या पारशी योद्ध्याच्या वंशजाने पाकिस्तानला ६५ च्या युद्धात हरवलं..

११ सप्टेंबर १९६५ भारत पाकिस्तान युद्ध ऐन भरात होते.  पाक सैन्याला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी आर्मीला पंजाबमधून सीमा पार जाण्याचे आदेश दिले होते. भारतीय लष्कराचे पहिले चिलखती दल सियालकोटच्या भागात जाऊन पोहचले देखील होते. भारतीय रणगाडे पाकिस्तानी शेतात घुसून तिथल्या उसाचा फडशा पाडत होते.

लाहोर जिंकणे जिंकणे त्यांचं टार्गेट होतं. त्यासाठी फिल्लोरावर मागील बाजूकडून हल्ला करून सियालकोट भागावर वर्चस्व मिळवण्याची प्लॅनिंग बनवण्यात आली होती. हि जबाबदारी देण्यात आली होती पूना हॉर्सच्या एका तरुण अधिकाऱ्याकडे. त्याच नाव लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर.   

आदी तारापोर हे मूळचे मुंबईचे. पारशी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याला शौर्याची मोठी परंपरा होती.

असं सांगितलं जात की तारापोर यांचे मूळ पुरुष रतनजीबा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अधिकारी होते. त्यांनी व त्यांच्या सोबत पारशी तरुण सैनिकांनी सुरत लुटीवेळी भाग घेतला होता. रतनजीबा यांच्या पराक्रमामुळे खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना ‘तारापूर’सह १०० गावांची मनसब दिली.

या तारापूर गावावरून त्यांना तारापोर हे आडनाव मिळाले असं आजही त्यांचे वंशज अभिमानाने सांगतात. याच रतनजीबा तारापोर यांचा शौर्याचा वारसा पुढे अनेक पिढ्यानी सांभाळला. मराठेशाही बुडाल्यावर इंग्रजांची भारतावर सत्ता आली तेव्हा हे तारापोर हैदराबादला स्थलांतरित झाले. आदी तारापोर यांचे आजोबा निजामाच्या सैन्यात अधिकारी होते.

आदी तारापुर यांना लहानपणापासून रणगाड्यांचे आकर्षण होते. हैद्राबाद संस्थानातर्फे गोवळकोंडा येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. १ जानेवारी १९४२ रोजी सातव्या हैद्राबाद इन्फ्रन्ट्रीमध्ये त्यांची नेमणूक झाली. पण सशस्त्र दलामध्ये जायचे त्यांचे स्वप्न होते.

अर्देशिर यांनी ग्रेनेड थ्रोइंग रेंजवर शिक्षण घेताना दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे आणि शौर्यामुळे त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले. त्यांचे शौर्य पाहून त्यांच्या बटालियनची तपासणी करणारे कमांडर इन चीफ मेजर जनरल अल. एड्रोस यांनी त्यांची आर्मर्ड डिव्हिजनला बदली करण्याची विनंती मान्य केली.

दुसर्‍या महायुद्धामध्ये त्यांनी मध्यपूर्वेत काम केले. तिथेही त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. स्वातंत्र्यानंतर ते भारतीय भूसेनेत ‘पूना हॉर्स’ या रेजिमेंटमध्ये रुजू झाले.

६५ च्या युद्धाआधी त्यांची लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती देण्यात आली आणि सियालकोट भागातील फिल्लोरावर ताबा मिळवण्याची महत्त्वाची कामगिरी सोपवली.

११ तारखेला फिल्लोरावर भारतीय सैन्य चालून येतेय हे पाहिल्यावर त्यांना रोखण्यासाठी भले मोठे पाकिस्तानी रणगाडा दल काश्मीरमधून हलवण्यात आले. पाकिस्तानी एअरफोर्स हवेतून मारा करतच होते शिवाय वजिराली येथून १३५ रणगाडे, २४ पॅटन टॅंक आणि १५ शर्मन रणगाडे असलेले पाकिस्तानी कॅव्हिलरी दल फिल्लोराच्या दिशेने चालून आले.

दोन दिवसातच चावींडाच्या जवळ या दोन्ही सेनांची गाठ पडली. भारतीय रणगाड्यावर अनपेक्षितपणे हा पाकिस्तानी हल्ला सुरु झाला. अनेक शक्तिशाली तोफगोळे रणगाड्यांवर येऊन पडू लागले. वरून पाकिस्तानी विमाने आणि समोर अक्राळविक्राळ रणगाडे सेना अश्या कचाट्यात भारतीय सेना अडकली.

तारापोर यांनी ठरवलेलं काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. पूना हॉर्स आणि गढवाल रायफल्सच्या जवानांना एकत्र केलं. हि संख्या पाकिस्तानी रणगाड्याच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी होती, त्यांच्या मदतीसाठी म्हणून ४३ रणगाडे पंजाबमधून पाठवण्यात आले पण त्यांना पोहचण्यासाठी भरपूर वेळ लागणार होता. संकट मोठं होतं मात्र भारतीय जवानांचा हौसला मात्र बुलंद होता.

त्या दिवशी दोन्ही देशांमध्ये घनघोर युद्ध झालं.

तारापोर यांनी चविंदाच्या लढाईसाठी खास योजना आखली. त्यांच्याच रणनीतीमुळे पाकिस्तानी रणगाडे संख्येने जास्त असूनही भारतीय रणगाड्याना लक्ष्य करण्यात अपयशी ठरत होते. १७ पुन्हा हॉर्सच्या जवानांनी रणांगणांत शौर्याची परिसीमा गाठली.

खुद्द तारापोर यांच्या रणगाड्यावर दोन वेळा अटॅक झाला, भयानक मारा होत असतानाही तारापोर यांनी आपली व्यूहात्मक जागा सोडली नाही व आपल्या मागे असलेल्या पायदळाचे शर्थीने संरक्षण केले.  ते जबर जखमी झाले पण आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत ते रणभूमीवर लढत राहिले. एक एक करत शत्रूचे पॅटन रणगाडे भारतीय जवानांनी उडवण्यास सुरवात केली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कळेचना या हल्ल्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे. अखेर नेहमीप्रमाणे पाक रणगाडे पाठ दाखवून पळू लागले.

तारापुर यांनी आणि त्यांच्या जवानांनी ६० पाकिस्तानी रणगाडे जाळून खाक केले होते. चविंडाची रणभूमी पॅटन रणगाड्यांची स्मशानभूमी बनली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढे मोठे रणगाडा युद्ध खेळण्यात आले आणि त्यात भारतीयांचा विजय झाला.

पण दुर्दैवाने या युद्धात आपल्या सैन्याने तारापुर यांच्या सारखा महत्वाचा सेनानी गमावला. पूना हॉर्सने पुढे चाल करीत वझीरवाली, जस्सोरण आणि आसपासचा प्रदेश काबीज केला. भारताने या १९६५च्या युद्धात मोठा विजय मिळवला.  पुढे तहात घातलेल्या अटींमुळे आपल्याला माघार घ्यावी लागली.

तारापोर यांनी गाजवलेल्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पराक्रम गाजवणाऱ्या रतनजीबा यांचे नाव त्यांनी राखलं होतं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.