तिला कळालं आपला नवरा भुरटा चोर आहे, मग तीने आपल्या नवऱ्याला भारताचा डॉन बनवलं !
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हात असतो. हे वाक्य तंतोतंत खरं आहे. बायको ठामपणे पाठीमागे उभी असेल तर पुरूष काहीही करू शकतो. असाच किस्सा आहे भारताच्या प्रसिद्ध डॉनचा. पुर्वी तो चहाचा गाडा चालवायचा. सोबत भूरट्या चोऱ्या करायचा. त्याच्या बायकोला एकदिवस त्याचं खरं रुप कळालं. अशा वेळी आपल्या नवऱ्याला या मार्गावरून पाठीमागे आणून चांगल्या मार्गाने घेवून जाणं हे त्याच्या बायकोचं कर्तव्य होतं. पण तिने नेमकं उलटं केलं. तिथे आपल्या नवऱ्याला डॉनगिरीचा रस्ता दाखवला. तिच्या मदतीनेच नवरा डॉन झाला,
त्याचं नाव रवी पुजारी.
रवी पुजारी मुळचा कर्नाटकातल्या मंगलोरचा. मुंबईच्या अंधेरीमध्ये तो चहाचा गाडा चालवायचा. सोबत भुरट्या चोऱ्यामाऱ्या करण्यात त्याचा हातखंडा होता. छोट्या मोठ्या चोऱ्या करणं हाच त्याचा धंदा होता. चहाचा गाडा तर फक्त दाखवण्याची गोष्ट होती.
अशातच रवी पुजारीची ओळख पद्मा खन्नासोबत झाली. पद्मा खन्नाला सरळमार्गी वाटणारा रवी पुजारी मनापासून आवडला. दोघांनी लग्न केलं. मुलं झाली. दरम्यानच्या काळात वरकमाईसाठी भुरट्या चोऱ्या करण्याचा रवी पुजारीचा बिझनेस चालूच होता. अशातच एक दिवस आपल्या नवऱ्याच खरं रुप अचानक दिसावं अशी घटना घडली. पोलीस रेकॉर्डवर नाव आल्याने रवी पुजारीचं बिंग फुटलं. पद्मा खन्नाला रवी पुजारी भूरटा चोर असल्याचं समजलं.
इथे पद्मा रवी पुजारीला सोडून जाईल असा फिल्मी सिन येईल अस आपल्याला वाटलं असेल. पण खऱ्या आयुष्यात मात्र नेमकं उलटं झालं. पद्माने रवीला डॉनगिरीचा मार्ग दाखवला. एका अर्थाने ती रवीचा ब्रेन म्हणून काम करू लागली. रवी पुजारी छोटा राजनच्या गॅंगमध्ये सामील झाला.
राजन सांगेल ती छोटीमोठ्ठी कामे करायची इतकी एकच गोष्ट रवी पुजारीला ठावूक होती. राजनने सांगितलेल्या हॉटेल-बार मालकांकडून तो पैसै उकळायचा, खंडणी गोळा करायचा. आपला वाटा प्रामाणिक नवऱ्यासारखा बायकोला येवून द्यायचा.
गृहणी कम बॅंकर अशा दुहेरी भूमिकेत पद्मा पूजारी काम करु लागली. ती नवऱ्याची एका अर्थाने CA होती. छोटा राजनच्या टोळीत सामील होवून राजनचा विश्वास संपादन करण्याचा मार्ग देखील तिनेच दाखवला होता.
त्यानंतरच्या काळात राजनचा रवी पूजारीवर विश्वास वाढू लागला. रवी पुजारी आत्ता बॉससाठी मोठ्या डिल करु लागल्या. आखाती देशांबरोबरच तो जगभरातील देशांमध्ये सौदे करु लागला. पोलीसांच्या रडारवर आल्यानंतर रवी पूजारी बाहेरच राहू लागला. इंटरपोलने कितीही प्रयत्न केला तरी रवी पूजारी सापडत नव्हताच.
या दरम्यान पद्मा पूजारी आपल्या दोन मुलांसह अंधेरीतल्या एका छोट्या घरात रहायला होती. तिच्याकडे पाहिल्यानंतर कोणाला देखील वाटले नसते की ही आपला नवरा रवी पूजारीच्या दुष्कृत्यात सहभागी आहे. त्याचा ब्रेन आहे. पोलीसांचा देखील हाच समज झाल्यामुळे ती निवांतपणे अंधेरीतल्या आपल्या घरात रहात होती.
२००० सालच्या सुमारास रवी पुजारीने छोटा राजनची गॅंग सोडली. आपलं स्वत:च अस्तित्त्व तयार करण्याच्या पाठीमागे पुजारी लागला होता. त्याला हा सल्ला देखील त्याच्या बायकोनेच दिला होता. तिने रवीला सांगितलं की, बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि बडे उद्योजक यांच्यावरच लक्ष केंद्रीत करायचं.
दक्षिण पुर्व आशियात राहून तो मुंबईत गॅंग कंट्रोल करु लागला. बॉलिवडूच्या बड्या सेलिब्रिटीकडून खंडण्या गोळा करु लागला. करिष्मा कपुरच्या नवऱ्याला ५० कोटींसाठी धमकी देण्याचा, महेश भट यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यासारखे अनेक आरोप रवी पुजारावर नोंद करण्यात आले.
या दरम्यान म्हणजेच २००५ साली कहानीत ट्विस्ट आला आणि पहिल्यांदा रवी पुजाराची बायको पद्मा पुजारी पोलिसांच्या रडारवर आली.
झालं अस की आपल्या मुलांचा नवीन पासपोर्ट बनवण्यासाठी तसेच आपला पासपोर्ट रिन्युव्ह करण्यासाठी पद्मा पुजारीने अर्ज केला होता. अर्ज दाखल करताना देण्यात आलेली कागदपत्र खोटी असल्याचं लक्षात आलं. १९९५ साली पद्मा पुजारीने स्वत:साठी घेतलेल्या पासपोर्टसाठी देखील खोटी कागदपत्र वापरल्याची माहिती उघड झाली. याच पासपोर्टवर ती बऱ्याचवेळा आफ्रिका तसेच आखाती देशात गेल्याची गोष्ट उघड झाली. त्यावरूनच पोलीसांना ती रवी पुजारीसोबत अजूनही कॉन्टॅक्टमध्ये असल्याचा संशय आला.
४ ऑक्टोंबर २००५ रोजी पद्मा पुजारीला अटक करण्यात आली. ३० दिवसांनी तीला जामिन मिळाला. कोर्टात श्याम केसवानी या तिच्या वकिलांनी तिचा रवी पुजारीच्या दुष्कृत्यांशी संबध नसल्याचं सिद्ध केलं.
मात्र पोलीसांनी तिचा माग सोडला नाही. रवी पुजारी गॅंग चालवतो पण ते सर्व पद्मा पुजारीच्या सल्ल्यानेच या संशयापर्यन्त पोलीस आले होते पण कोर्टामध्ये हे सिद्ध करणं अशक्य होतं. जामिनावर सुटल्यानंतर पद्मा पुजारीचे फोन टॅप करण्यात येवू लागले. सर्व बाजूंनी तिची कोंडी करण्यात आली.
पण पद्मा पूजारी मात्र खोट्या पासपोर्टच्या आधारे नेपाळमार्ग पळून गेल्यानंतरच पोलीसांना कळालं. पद्मा पूजारी मुंबईतून गायब झाली ती कायमची. २०१९ च्या सुरवातीस डकार्थ सेनगल येथून रवी पुजारीला ताब्यात घेण्यात आलं. पण जामीन मिळाल्यानंतर रवी पुजारी पुन्हा गायब झाला.
स्वत:ला देशप्रेमी डॉन, भारताचा डॉन सिद्ध करण्यासाठी त्याने मागच्या काळात जिग्नेश मेवाणीला फोन करुन धमकी देखील दिली होती.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास आवळला. सेनेगल वरून त्याला भारतात आणण्यात आलं. आता मुंबई पोलीस कस्टडीमध्ये त्याची रवानगी होत आहे. रवी पुजारीचा दरारा आजही कायम आहे.
पण त्याहूनही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पद्मा पुजारीची. भूरट्या चोऱ्या करणाऱ्या नवऱ्याचा ब्रेन होवून मुंबईमध्येच अगदी साधं आयुष्य जगून कित्येक वर्ष तिने पोलींसाना गंडवलं.
हे ही वाच भिडू.
- मुख्यमंत्र्यांची सुपारी घेणारा डॉन पोरगीच्या नादात मेला !
- दाऊद इब्राहीमवर खूनी हल्ला करणारा एक गुजराती डॉन देखील होता.
- दाऊदला शारजामध्येच संपवण्याचा प्लॅन बनला होता