राष्ट्रावर संकट येतं तेव्हा पक्षीय राजकारण विसरायचं असतं, याचा धडा वाजपेयींनी घालून दिला
एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती. भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु संसदेचे नेते होते. त्यावेळी संसदेत काँग्रेसकडे प्रचंड बहूमत होतं. विरोधी पक्ष फक्त नावापुरतेच होते.
अनेक विरोधी पक्ष नेत्यांमध्ये देखील नेहरूंच्या नेतृत्वाविषयी एक आदरपूर्वक दरारा होता. त्यामुळे विरोधी नेते दचकून असायचे. अशावेळी संसदेत फक्त ४ सदस्य असणाऱ्या पक्षाचा तरुण खासदार पाठीमागच्या बेंचवर वरून नेहरुंवर प्रश्नांची सरबत्ती करायचा.
तो तरुण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे तळागाळात जाऊन कार्य करणाऱ्या व श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वारसदार. वाजपेयी आपल्या जबरदस्त वक्तृत्व शैलीने सभा जिंकत.नेहरूंच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. आणि त्याच वेळी भारत पाकिस्तान युद्धाने डोकं वर काढलं.
विरोधक शास्त्रीजींच्या राजीनाम्याची मागणी करु लागले. अशावेळी अटलबिहारी वाजपेयी शास्त्रीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले होते. त्याचाच हा किस्सा.
३ मे १९६५ रोजी भारत-पाक सीमेवर कुरबुरी वाढत होत्या. कच्छच्या रणात पाकने घुसखोरी केली. पाकिस्तान तेथे अमेरिकी बनावटीचे रणगाडे घुसवत होता. याच सुमारास अमेरिकेने शास्त्रीजींना दौऱ्याचे औपचारिक निमंत्रण दिले.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने ते स्वीकारले. मात्र अचानक ते रद्द झाले. हा देशाचा अपमान होता. तिकडे पाकचा शस्त्रपुरवठा वाढत होता. दक्षिण आशियातील साम्यवादाचा प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेला मित्र म्हणून पाकिस्तान हवा होता.
कच्छच्या रणात चकमकी वाढत असताना अयूबखान यांनी अचानक शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताला कोंडीत पकडण्याचा हा डाव होता.
अशा बाका प्रसंगावेळी अख्खा देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा होता. केवळ संरक्षणमंत्री असलेले यशवंतराव चव्हाणचं नाही तर पंतप्रधानांसहित सगळ्या सरकारचं लक्ष या युद्धावर होते. मात्र त्यावेळी बाहेरच्या आक्रमणावेळी अंतर्गत अशांतता डोकं वर काढण्याची शक्यता होती.
अटलजी हे कसे वेगळ्या मुशीतून घडले होते, याचे एक उदाहरण या काळात दिसले. पाकिस्ताच्या संघर्षात भारताची पीछेहाट होत असल्याचे निमित्त सांगून शास्त्रीजींच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. शास्त्रीजींना पंतप्रधान होऊन जेमतेम वर्ष होत होते. त्यांच्याकडे नेहरूंचा करिष्मा नव्हता. मात्र ते शंभर टक्के सचोटीचे व कणखर होते.
राजीनाम्याच्या मागणीमागे शास्त्रीजीना पाण्यात पाहणारे स्वपक्षीय नेते होते. यावेळी अटलजी शास्त्रीजींच्या बाजूने ठाम उभे राहिले. शास्त्रीजींच्या पारदर्शी नैतिकतेवर विश्वास दाखवत अटलजी म्हणाले,
आपल्या जाण्याने हे संकट दूर होणार आहे, हे लक्षात आले, तर पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतील. पण इथे शास्त्रीजींनी राजीनामा देताच तेथे कच्छचे रण पाकमुक्त होणार आहे का? मग पक्षांतर्गत राजकारणासाठी अशी मागणी का होत आहे?
संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणांनाही अटलजींनी धीर दिला. ते म्हणाले,
हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्रातून धावून आलेला हा सह्याद्री काय करतो आहे’, असे कुणी विचारले, तर मी सांगतो, तो सह्याद्री एकटा काय करणार? त्याला सगळ्यांची साथ नको का?
राष्ट्रावर संकट येते, तेव्हा पक्षीय राजकारण विसरायचे असते, याचा धडा अटलजींनी घालून दिला. आता सारा देश पाठीशी उभा आहे. तेव्हा विजय मिळवा असे बजावायला ते विसरले नाहीत. युद्ध होणार, हे तर दिसतच होते. त्यामुळे आशा जागवत अटलजी म्हणाले, “हे युद्ध आपण जिंकणार आहोत. सरकारने नेतृत्व करावे. आम्ही अनुयायी बनून तुमच्या मागे येतो. मात्र कच खाल्लीत, तर तुम्हांला क्षमा नाही.”
हे हि वाच भिडू
- ग्वालियरमधल्या या दुकानातील बुंदीचे लाडू खायला स्वतः पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यायचे…
- अँबेसेडर सोडून BMW घेणारे पहिले पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी…
- तिहार जेलमधल्या कैद्यांनी वाजपेयींना पत्र लिहून कारगिलला पाठवण्याची मागणी केली होती…