अयोध्येत रामलल्लाच्या आधी हनुमान गढीच दर्शन घ्यावं असं का म्हणतात?

नुकतच अयोध्येमध्ये राम मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. कोट्यावधी भारतीयांच्या धार्मिकच नाही तर सांस्कृतिक  भावविश्वाचा भाग असणाऱ्या रामलल्लाच्या मंदिराची पहिली वीट रचली गेली. पाच शतकाचा अन्याय दूर झाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

परवाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे राम मंदिराच्या भूमीपूजना अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले. फक्त पंतप्रधानच नाही तर गेली अनेक वर्षे अयोध्येत परंपरा आहे की राम लल्लाच्याही आधी हनुमान गढीचे दर्शन घ्यायचे.

या मागे हजारो वर्षांचा इतिहास आहे.

हनुमान गढी हे अयोध्येच्या मधोमध वसलेलं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. याची मूळ निर्मिती दहाव्या शतकात झाली होती अस म्हणतात. त्यापूर्वीही रामायणाच्या काळात जेव्हा भगवान राम लंकेवर विजय प्राप्त करून विमानाने आले तेव्हा त्यांच्या सोबत आलेल्या हनुमंताने जवळच्या टेकडीवरील गुहेत आपलं राहण्याचं स्थान बनवलं होत.

तिथून बजरंग बली अयोध्येच रक्षण करतो अशी मान्यता आहे. पुढच्या काळात इथे छोटे मंदिर उभे करण्यात आले.

मध्ययुगात भारतावर परकीय आक्रमणे झाली. मूर्तीपूजेच्या विरोधात असलेल्या या आक्रमकांनी  भारतातील अनेक मंदिरे तोडली, इथून संपत्ती आपल्या देशात परत नेली. या आक्रमणांचा फटका अयोध्येला देखील बसला. अस म्हणतात की रामजन्मभूमीमध्ये बाबरी मशीद उभी राहिली.

अनेक वर्षे हनुमान गढी येथे हनुमानाची एक छोटी मूर्ती एका झाडाखाली पुजली जात होती. पुढे मुघल साम्राज्य विघटन झाले.

गोष्ट आहे १७५५ सालची. अवधमध्ये नवाबांच राज्य होतं. नवाब शुजा उददौला उर्फ मन्सूर अली खान हा गादीवर बसला होता. तो मोठा पराक्रमी होता. अवधच साम्राज्य मोठं करण्यात त्याचा मोठा हात होता. मुघल बादशाहची वजिरी देखील त्याला मिळाली होती.

अयोध्येशेजारील फैजाबाद ही त्याची राजधानी होती.

एकदा त्याचा लाडका मुलगा कुठल्याशा रोगाने आजारी पडला. अनेक वैद्य हकीम यांना पाचारण करण्यात आलं. काही फरक पडला नाही. नवाबाने पीर फकीर यांना मन्नत मागितली, तरीही मुलगा बरा झाला नाही.

त्याच्या दरबारातील हिंदू मंत्र्यांनी बाबा अभयराम दास यांच्याकडे जाण्यास सांगितले.

बाबा अभयराम हे हनुमानगढीचे महंत होते. झाडाखालच्या हनुमानाची पूजा करणाऱ्या या बाबांना दर्शनाला नवाब शुजाउद्दोल्लाच्या दरबारात हजर करण्यात आले. नवाबाने त्यांचे पाय धरले व शहजाद्याचे प्राण वाचवण्याची विनंती केली.

अस म्हणतात की अभयराम बाबांनी काही मंत्र म्हणून हनुमानाचे चरणामृत नवाबाच्या मुलाला पाजले. काही दिवसांनी तो खडखडीत बरा झाला. नवाबाने अभयराम दास महाराजांना म्हणाला,

हम आपको कुछ देना चाहते हैं,

बाबा म्हणाले, हम साधु हैं हमें कुछ नहीं चाहिए।

नवाबाने वारंवार विनंती केल्यावर बाबा म्हणाले,

हनुमान जी की कृपा से यह ठीक हुए हैं, आपकी श्रद्धा है तो हनुमानगढ़ी बनवा दीजिए।

त्यानंतर नवाबाने हनुमानगढीसाठी ५२ बिघे जमीन दिली. तिथे मंदिर उभारले. सोबतच एक ताम्रपत्र लिहून दिले ज्यात लिहिले होते की,

इस मंदिर पर किसी राजा या शासक का कोई अधिकार नहीं रहेगा और यहां के चढ़ावे से कोई टैक्स वसूल नहीं किया जाएगा.

सर्वांचा नवस, इच्छापुर्ती करणारा देव म्हणून यानंतर हनुमान गढीची ख्याती पसरली. पुढे १८५५ साली राम मंदिरावरून पहिल्यांदा अयोध्येमध्ये हिंदू-मुसलमान दंगल झाली.

काही दंगलखोर हनुमानगढी मध्ये नमाज पढण्यासाठी चालून आले तेव्हा त्याकाळचा नवाब वाजीद अली शाह ने त्यांच्यावर कारवाई केली होती.

आजही हे दक्षिणमुखी मन्दिर हिंदूमुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते. मध्यंतरी अयोध्येत शाह आलम या सगळ्यात जुन्या मशिदीची डागडुजी करण्यासाठी हनुमानगढी सर्वात पुढे आली होती. आचार्य ज्ञानदास यांनीहनुमानगढी तर्फे सगळा खर्च उचलला होता.

अस म्हणतात की ७६ पायऱ्या चढून जो व्यक्ती हनुमानगढी मध्ये मारूतीच दर्शन घेतो त्यालाच राम लल्लाचे दर्शन होते. प्रभू रामचंद्रानी अनेक वर्षांपूर्वी दिलेला हा आदेश हजारो वर्ष झाली पाळला जातोय. फक्त याच कारणामुळे परवा आपले पंतप्रधान हनुमान गढीवर दर्शनासाठी गेले होते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.