इंदिरा गांधी म्हणाल्या, “गरीब असलो म्हणून काय झालं फॉरेन मध्ये नेहमी ताठ मानेनेच राहायचं.”

पुण्यातला एक मुलगा १९५१ सालात भारतातली सर्वोच्च दर्जाची स्पर्धा परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेत जिल्हाधिकारी होतो आणि या सेवेतील कॅबिनेट सेक्रटरी या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारतो. त्यांचं नाव होत भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुख.

पुण्यातल्या मुंजाबाच्या बोळात राहणारे भालचंद्र देशमुख त्यावेळच्या मुंबई इलाख्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय ए एस बनले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते खास सेक्रेटरी होते.

पुढं राजीव गांधींनी त्यांना १९८६ च्या दरम्यान दिल्लीला बोलावून घेतलं आणि कॅबिनेट सेक्रेटरी या प्रशासनातील सर्वोच्च पदावर नेमणूक केली. १९८९ मध्ये राजीव गांधींनी त्यांना आपले प्रिंसिपल सेक्रेटरी म्हणून नेमले. राजीव गांधींनंतर व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर पंतप्रधान झाले. पण त्यांनी ही देशमुखांना प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या पदावर ठेवले.

असे राज्यापासून ते केंद्रापर्यंत सर्वांच्याच जवळ असणारे हे बी. जी. देशमुख इंदिरा गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अशा या देशमुखांची जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या श्रम संघटनेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली तेव्हा इंदिरा गांधी देशमुखांना म्हणाल्या होत्या,

आपण गरीब असलो म्हणून काय झालं आंतरराष्ट्रीय समुदायात ताठ मानेने वागा. 

आंतरराष्ट्रीय श्रम संघटना याचं अध्यक्षपद भारताकडे यावं यासाठी बी जी देशमुखांनी कसे प्रयत्न केले याचाच हा किस्सा. 

दरवर्षी श्रम संघटना आपला नवीन अध्यक्ष निवडणुकीने ठरवीत असे. हा अध्यक्ष जे सरकारी प्रतिनिधी असतात त्यांच्याकडून निवडला जाण्याची एक कायमस्वरूपी प्रथा होती. या प्रथेला अपवाद फक्त एकदा १९७७ मध्ये झाला. त्या वेळी कामगार संघटनेचा प्रतिनिधी, अध्यक्ष म्हणून निवडला गेला.

१९८५ मध्ये मात्र उद्योगपतींच्या गटाने अध्यक्ष पदावर आपला दावा केला.

परंतु यामुळे आशियाई राष्ट्रातील सरकारी प्रतिनिधींच्या गटावर अन्याय होत होता. कारण आता या गटापैकी कोणाएकाची निवड करण्याची वेळ होती. म्हणून आशियाई देशांच्या गटातील देशांनी भारताला प्राधान्य द्यायचे ठरवले.

भारत सरकारचे प्रतिनिधित्व बी. जी. देशमुख करत असल्याने त्यांचे नाव आपसूकच अध्यक्षपदासाठी आशियाई राष्ट्रांनी पुढे आणलं. परंतु उद्योगपतींच्या गटाचा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेवर जबरदस्त प्रभाव होता. युरोपीय देश व अमेरिका राष्ट्र यांचे सरकारी प्रतिनिधी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा उद्योगपतींच्या गटाला साथ देत होते. तेव्हा आता उद्योगपतींचा गट आणि आशियाई राष्ट्रातील सरकारी प्रतिनिधींचा गट यांच्यात स्पर्धा सुरू झाली.

सगळ्या आशियाई सरकारी प्रतिनिधींनी बी. जी. देशमुख यांचं नाव स्पर्धेतून मागे घेण्यास नकार दिला. पुढ देशमुखांचं नाव पुढं केल्याने उद्योगपतींच्या गटाने कोणताही विचार विनिमय किंवा तडजोडीची भाषा केलीच नाही. उलट आपल्या गटातर्फे उमेदवार जाहीर केला. त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी आपला पाठिंबा दिला तर काहींनी दिला नाही.

त्यावेळी संघटनेचे डायरेक्टर जनरल ऑफ ब्लांचार्ड आणि उद्योगपती गटाचे नवल टाटा आणि स्विझरलँड मधील राजदूत मुचकुंद दुबे यांनी एक तडजोड घडवून आणली. शेवटी सर्वांच्या सहमतीने ठरलं की युरोपीय सरकारी प्रतिनिधींच्या गटाने आपली अध्यक्षपदाची पाळी जरी पुढच्या वर्षी असली तरी ती आणखीन एक वर्षाने पुढे ढकलावी.

त्यानंतर आपसूकच आशियाई राष्ट्रांतर्फे बी. जी. देशमुख निवडले गेले. आणि १९८४-८५  या वर्षाकरता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले.

त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही बातमी ऐकून आनंद झाला. कारण नुकत्याच झालेल्या पॅरिसमधील युनेस्कोच्या निवडणुकीत भारत पराभूत झाला होता. जेव्हा बी. जी देशमुख भारतात आले आणि इंदिराना भेटले त्यावेळी त्या म्हणाल्या,

मिस्टर देशमुख आपण गरीब लोक असलो तरी आपला देश गरीब नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय समुदायात वावरताना नेहमी ताठ मानेने वागत जा, म्हणजे भारत काय आहे हे त्यांना समजेल.

या किस्स्यांवरून हे समजतंय की, इंदिरा गांधींचं देशप्रेम किती टोकाचं होत. हाच आदर्श भावी पिढ्यातील राजकारण्यांनी घ्यावा असा त्यांचा कायम आग्रह असायचा.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.