मनेका गांधींनी रुसून नवीन पक्ष काढलेला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुद्धा त्यात सामील होणार होते

‘वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा’ अशा उक्तीला सार्थ ठरवणारे एक मुख्यमंत्री महाराष्ट्र्राला लाभले होते….बाबासाहेब भोसले. विनोदवीर अशी ओळख असणारे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री पद गेल्यावर मनेका गांधींच्या पक्षात जाणार होते. त्याचाच हा किस्सा.

मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर अंतुले यांचं नाव कथित सिमेंट घोटाळ्यात आलं. त्यामुळे इंदिरा गांधींच्या मर्जीत असलेल्या अंतुलेंना आपली खुर्ची नाइलाजाने सोडावी लागली. मुख्यमंत्रिपदावर मराठा मंत्री असावा, अशी इंदिरा गांधींची इच्छा होती.

बाबासाहेब भोसले स्वातंत्र्य चळवळीतून आलेले होते, त्यांची प्रतिमा स्वच्छ होती, त्यांनी कधीही मुख्यमंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही पदासाठी लॉबिंग केल्याचं ऐकिवात नव्हतं, ते उच्चविद्याविभूषित होते आणि उत्तम इंग्रजी बोलत असत या देखील त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या.

आणि झालं बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले.

बाबासाहेब भोसले हे व्यक्तिमत्त्व तस विनोदी होतं. माध्यम आणि प्रसिद्धी पासून दूर राहिलेले पण नंतर आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे पत्रकारांचे आवडते नेते बनलेले भोसले यांचा प्रवास जितका संघर्षमय होता, तितकाच रंजकही होता. बाबासाहेब भोसलेंची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द अल्पकाळ असली तरी त्यात संघर्ष मोठ्या प्रमाणात होता.

असं म्हणतात मुख्यमंत्रिपद बाबासाहेबांच्या नसानसात भिनला होतं.

झोपेत देखील आपण मुख्यमंत्री आहोत हे ते विसरत नसत. बाबासाहेबांचे बोलणं म्हणजे सतत हास्याची कारंजी. मुख्यमंत्री पद गेलं पण मुख्यमंत्रीपदाची वस्त्र त्यांना सोडलीच नाहीत. एटीकेटी घेऊन जसा विद्यार्थी वर ढकलला जातो तसे बाबासाहेब एटीकेटी मुख्यमंत्री वाटायचे.

ज्यावेळी त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं तेव्हा अशोक जैन हे राजकीय पत्रकार त्यांच्या जवळ होते. त्यावेळचे बरेच पत्रकार पत्रकार स्वतः राजकारणात रस घेऊन सत्तेच्या सारीपाटावरच्या सोंगट्या हलवण्यात मश्गुल असायचे. पुढाऱ्यांना सल्ला देण्यात ते धन्यता मानायचे. परंतु जैन यांना अशा गोष्टीत रस नव्हता.

बाबासाहेब यांच्याबाबत त्यांना थोडीशी मुरड घालावी लागली. कारण त्यांची आणि अशोक जैनांची ओळख जुनी होती. ते तेव्हा कुर्ल्याला नेहरू नगरात राहात होते. बाबासाहेब ही नेहरु नगरात राहत असल्याने त्यांची आणि अशोक जैनांची नेहमी गाठ पडायची.

बाबासाहेबांचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते हवालदील झाले, सैरभैर झाले. त्यावेळी मनेका गांधी यांनी नवा पक्ष काढण्याचं ठरवलं होतं.

संजय गांधींना विमान चालवण्याचा छंद होता. तेच त्यांच्या मृत्यूचे कारणही बनले. दिल्लीत झालेल्या एका विमान अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. संजय यांच्या मृत्यूच्या अनेक तासांनंतर मनेका यांना ही बातमी देण्यात आली होती. या दुर्घटनेच्या वेळी वरुण गांधी हे केवळ ३ महिन्यांचे होते.

संजय यांच्या मृत्यूनंतर इंदिरा आणि मनेका गांधी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर १९८१ मध्ये मेनका ते घर आणि संपत्ती कायमची सोडून बाहेर पडल्या होत्या.त्यानंतर त्यांनी अकबर अहमद यांच्या सोबत मिळून राष्ट्रीय संजय मंच हा नवा पक्ष काढला होता.

त्या नव्या पक्षात सामील व्हावं असं बाबासाहेबांना वाटत होतं. तेव्हा मनेका गांधी यांची भेट होईल का ? तुम्ही अशी भेट घडवून आणायला मदत कराल का ? अशी विनंती त्यांनी जैनांना केली.

जैनांनी मनेका गांधी यांची भेट करण्याची व्यवस्था केली. दिल्लीतील लोदी हॉटेलमध्ये ही गुप्त भेट झाली. त्या वेळी ही घटना अगदी सनसनाटी ठरली असती. पण बाबासाहेबांना वचन दिल्याप्रमाणे जैनांनी त्यांची  बातमी कधीही दिली नाही. पुढं बाबासाहेबांचा मनेका गांधींच्या पक्षात सामील व्हायचा विचार बारगळला.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.