मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं, “दिल्लीत पैसे मागण्याची नव्हे, देण्याची पद्धत आहे “

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी बातमी होती.

ते मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा चुकून त्यांचे नाव निवडले गेले असं लोक म्हणायचे.

इंदिरा गांधीना अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यांची ओळख कित्येकांना प्रसिध्द व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचे बंधू हीच आहे. 

अंतुलेंच्या जागी मराठा मुख्यमंत्री हवा अशी मागणी होत होती आणि म्हणून इंदिरा गांधींनी बाबासाहेब भोसले यांची निवड केली असं सांगितलं जात होतं. तस बाबासाहेब हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनचे काँग्रेसचे नेते, मंत्रीपदावर देखील राहिलेले मात्र वरच्या लेव्हलला काय राजकारण चालतं याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता. विशेषतः दिल्ली त्यांच्यासाठी अनोळखी होती.

असं म्हणतात की आपल्या प्रत्येक निर्णयासाठी ते दिल्लीच्या श्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघायचे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक गंमतीजमती घडायच्या.

असाच एक किस्सा.

मुंबईत विधानसभेची पोटनिवडणूक होणार होती. काँग्रेस तर्फे प्रभाकर कुंटे उभे होते. प्रभाकर कुंटे हे स्वातंत्र्यलढ्यात आणि  गोवा मुक्तीसंग्रामात लढा दिलेले दिग्गज कार्यकर्ते. त्यांनी केलेलं कामगार चळवळीत देखील मोठं कार्य केलेलं. शंकरराव चव्हाणांच्या विश्वासातले नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं.

प्रभाकर कुंटे यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराला पैशांचा निधी लागणार होता. मुख्यमंत्री लगबगीने दिल्लीला गेले. पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट झाली. बाबासाहेब भोसले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या समस्या इंदिराजींच्या समोर मांडल्या. इंदिराजींनी दिलेले आदेश टिपून घेतले. मिटिंग संपता संपता त्यांनी प्रभाकर कुंटे यांच्या निवडणुकीचा विषय काढला आणि त्यांना इंदिरा गांधी म्हणाल्या,

“सीताराम केसरी यांना जाऊन भेटा. “

सीताराम केसरी हे तेव्हा काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते.

त्याकाळी काँग्रेसची परिस्थिती आजच्या सारखी हलाखीची नव्हती. गल्लीपासून दिल्ली पर्यंत सर्व ठिकाणी सत्तेत असल्यामुळे तिजोरी भरलेली होती. मात्र केसरी यांना अतिशय कंजूष म्हणून ओळखलं जायचं. एखाद्या मुनीमजींप्रमाणे ते पक्षाची तिजोरी सांभाळायचे. काँग्रेसचे जुने जाणते नेते. मूळचे बिहारचे असूनही दिल्लीच राजकारण त्यांनी कोळून पिलेलं होतं.

त्यांचा एक डायलॉग त्या काळी फेमस होता.

“ना खाता, ना बहि, जो केसरी कहे वही सही”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे भेट मागत होते आणि केसरी त्यांना अपॉइन्टमेन्टचं देत नव्हते.

कधी सकाळी या तर कधी संध्याकाळी या अस सांगितलं जात होतं . बाबासाहेब भोसले काँग्रेस मुख्यालयाच्या फेऱ्या मारून मारून वैतागले. शेवटी त्यांनी दिल्लीतल्या एका जुन्या मराठी काँग्रेस नेत्याची भेट घेतली आणि त्यांना आपला प्रॉब्लेम सांगितला.

तो नेता बाबासाहेबांना म्हणाला,

शहाणे असाल तर लवकर मुंबईला परत जा. दिल्लीत पैसे मागण्याची नव्हे, देण्याची पद्धत आहे.

सिताराम केसरी यांचा चालूपणा केंद्राच्या राजकारणात फेमस होता. त्यांच्या बद्दलची कुजबुज नेहमी ऐकायला मिळायची. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी निधी मागायची नसते तर वेगवगेळ्या प्रकारांनी पक्षाला निधी गोळा करून द्यायचा असतो असा अलिखित संकेत त्यांनी निर्माण केला होता.

भोळ्या बाबासाहेब भोसलेंना आश्चर्य वाटलं. खुद्द इंदिरा गांधींनी सांगून देखील सीताराम केसरी त्यांना प्रचारासाठी पैसे देण्यास गंडवत होते.  दिल्लीचं राजकारण कस चालतं त्याचा चांगलाच प्रसाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अनुभवायला मिळाला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.