बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे,” सावरकर नेहरूंपेक्षा जास्त गुण मी वाजपेयींना देईन”

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे शिवशाहीर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेबांच्या शिवचरित्राचं गारुड मराठी भाषेच्या सीमा ओलांडून देशभरात पसरलं आहे. जानता राजा बाबासाहेब पुरंदरे यांची लोकप्रियता सर्व भाषा धर्म पंथ यांच्या सीमापार पोहचलेली होती.

यातच होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

अटलजींना छत्रपती शिवरायांचं राजकारण समजून घेण्यात रस असायचा. शिवरायांनी प्रतिकूलतेतून स्वराज्य कसं निर्माण केलं, यामागचं त्यांचं नियोजन, मुत्सद्देगिरी जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे. बाबासाहेबांच राजा शिवछत्रपती त्यांनी वाचलेलं.

बाबासाहेब पुरंदरे आणि अटलबिहारी वाजपेयींची गाढ मैत्री होती. पुरंदरे दिल्लीला कधी गेले की वाजपेयी त्यांना आवर्जून भेट द्यायचे. ‘बाबाजी आये क्या’, असा त्यांचा प्रश्न असे. मराठी त्यांना उत्तम यायचं. म्हणजे, सगळं समजायचं. बोलायचे मात्र ते हिंदी लहेजा घेऊनच. मराठी माणसाशी आवर्जून ते मराठीत बोलायचे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांच्या निवांत गप्पा व्हायच्या.

शिवव्याख्यानाचे हजारो कार्यक्रम पार पाडणारे बाबासाहेब स्वतः मात्र अटलबिहारी वाजपेयींच्या वक्तृत्वाचे फॅन होते. आपल्या एका लेखात ते म्हणतात,

लहानपणापासून अनेक थोरामोठांची भाषणं मी ऐकली आहेत. त्यांचे पक्ष कोणते, त्यांचा विचार कोणता या राजकारणाशी माझा संबंध नसायचा. पण त्यांच्या भाषणांचा आनंद लुटण्यासाठी मी जात असे. माझ्यावर प्रभाव पडलेल्या वक्त्यांपैकी दोन-तीन नावं चटकन आठवतात. ते म्हणजे, स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर आणि अटलबिहारी वाजपेयी. दोघंही अत्यंत प्रभावी. श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारी वक्तृत्वशैली त्यांच्याकडे होती. लाखोंची गर्दी खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे होती. पण तरी मी अटलजींना तात्यारावांच्या पुढे एक पाऊल ठेवेन.

अटलजींची संवादशैली नैसर्गिक होती. सावरकरांचं भाषण काहीसं प्रचारकी असायचं. जोर देऊन ते बोलायचे. सरोजिनी नायडू यांचंही वक्तृत्व खूप प्रतिभाशाली होतं. पंडित नेहरूंचं वक्तृत्व मात्र तितकंसं दर्जेदार नव्हतं. किंबहुना वाजपेयी आणि नेहरूंची तुलना करताना वाजपेयींना जर मी दहा गुण दिले, तर नेहरूंना एकच गुण देईन. अर्थात विद्यार्थी या नात्यानं माझं स्वतःचं मत झालं.

बाबासाहेब पुरंदरे अटलबिहारी वाजपेयींची तुलना मराठी इतिहासातल्या संताजी धनाजींशी करतात.

त्यांच्या मते अटलजींच्या काळात झालेलं कारगिल युद्ध हे त्या वेळच्या गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं. पण मोठ्या धीरानं त्यांनी या संकटाचा सामना करून पाकिस्तानविरोधातलं युद्ध जिंकलं होतं. रणभूमीवरची अत्यंत विषम, व्यस्त लढाई आपल्या जवानांनी जिंकलीच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानला एकटं पाडण्यात अटलजींनी यश मिळवलं.

बाबासाहेब आपल्या लेखात म्हणतात,

शाहिरी अतिशयोक्ती करायची म्हटलं तर ते मोगल की तुरुक कोण होते माहिती नाही, पण शिवाजी आणि संताजी-धनाजी यांच्यानंतर पाकिस्तानचा एवढा मोठा पराभव अटलजींनीच केला.

बाबासाहेब पुरंदरे आणि अटलजींची मैत्री अगदी मोकळ्या ढाकळ्या स्वरूपाची होती. एकदा वाजपेयी पंतप्रधान असताना बाबासाहेब पुरंदरे दिल्लीला गेले होते. तेव्हा वाजपेयी सरकार एनडीएतील मित्र पक्षांच्या टेकूने उभे होते. हे मित्र पक्ष बऱ्याचदा अटलजींची अडवणूकच जास्त करायला पाहायचे. एकदा यावरून बाबासाहेब पुरंदरे यांनी अटलजींना एका संस्कृत श्लोक सांगितलं. 

त्या श्लोकात असं म्हटलं होतं, 

“शंकराला दोन पत्नी. पार्वती आणि गंगा. या दोघींचं आपसात पटत नाही. शंकराचं वाहन नंदी, पार्वतीचं वाहन सिंह आणि गंगेचं वाहन मगर. या तिघांचं एकमेकांशी जुळत नाही. शंकराला दोन मुलं गणपती आणि कार्तिकेय. या दोघांमध्येही आपसात बंधुभाव नाही. गणपतीचं वाहन उंदीर आणि शंकराच्या गळ्यात नागराज. या दोघांचं एकमेकांशी जन्माचं वैर. म्हणजे, अवतीभोवती सगळा विसंवाद, मेळ खाणारी एकही गोष्ट नाही, सगळे वादच. तरीही शंकर हसतखेळत सुखानं संसार करतो.” 

असा अर्थ सांगून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, एनडीए सरकारचं नेतृत्व करणाऱ्या अटलजींची अवस्था ही त्या शंकरासारखीच आहे. विसंवादी वातावरणातही तुम्ही हसतमुखानं सगळं निभावून नेता. 

हे ऐकवल्यावर अटलजी प्रचंड खुश झाले. दिलखुलास हसत टाळीसाठी हात पुढे केला होता.  

बाबासाहेब पुरंदरेंच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमाला वाजपेयी आवर्जून उपस्थित राहिले होते. पुरंदरेंना पुण्यभूषण पुरस्कार देखील वाजपेयींच्या हस्तेच मिळाला होता. देशाचा हा सर्वोच्च नेता बाबासाहेबांचा आदर करायचा यामागे त्यांची छत्रपती शिवरायांबद्दल असलेलं प्रेम आणि शिवभक्ती देखील होती. हाच या दोघांच्या मैत्रीला जोडणारा दुवा होता.

संदर्भ- अटलजींच्या मृत्यूनंतर दिव्यमराठी साठी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला लेख 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.