शिवचरित्राच्या प्रकाशनासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी एकेकाळी कोथिंबीर सुद्धा विकली होती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहताना आपले डोळे दिपून जातात. आजूबाजूचं काही दिसेनासं होतं, काही सुचेनासं होतं. महाराजांचं चरित्र शब्दांत सांगणं महाकठीण. कारण त्यात अनेक पैलू, अनेक जाणीवा, अनेक कथा अन् अनेक मूल्यं. त्यामुळे महाराजांचं चरित्र एखाद्याला सांगणं म्हणजे आव्हान. हे आव्हान स्वीकारणारा एक माणूस म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

अनेक रात्री जागून लिहिलेलं शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठी पुणे ते मुंबई असा प्रवास करत कोथिंबीर विकून पैसे उभे केले होते त्याचाच हा किस्सा… 

शिवशाहीर पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. वयाच्या सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास पुरंदरेंनी सुरुवात केला. कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. दिवसाची रात्र करीत अनेक दप्तरांमध्ये बसून शिवचरित्रासाठी लागणारी माहिती गोळा केली.  

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.

याच चिकाटीमुळे बाबासाहेबांचे शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. पण किती हि किंमत मोजावी लागली तरी चालेल शिवचरित्र प्रकाशित करायचंच हे पुरंदरेंनी मनोमन ठरवलंच होत. त्यासाठी त्यांनी कष्टाचा मार्ग पत्करला. 

ते साल होत १९५० च. रात्रीच्या पॅसेंजरमधून स्वच्छ पांढरा पायजमा व पांढरा शर्ट घातलेले पुरंदरे हातात टोपल्या घेऊन भायखळा स्टेशनमध्ये उतरायचे. प्लॅटफाॅर्मवरच टोपल्यांमधून ताजी कोथिंबीर काढून त्याच्या जुड्या करायचे आणि लगबगीने जवळच्याच सावता माळी मंडईत जाऊन विकायचे. ही विक्री आटोपली की पुन्हा ट्रेनने पुण्याला परतायचे. 

असे अनेक वर्षे चालले होते. या कोथंबीरीच्या जुड्या विकून त्यातून जो काही पैसा उभा राहिला, त्यातून पुरंदरेंनी शिवचरित्र प्रकाशित केलं. या शिवचरित्राला अमाप लोकप्रियता लाभली आणि बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर म्हणून अवघ्या देशाला परिचित झाले. 

याच शिवचरित्राचे पहिले जाहीर व्याख्यान नागपूरात पार पडले. २५ डिसेंबर १९५४ रोजी शिवचरित्रावर झालेल्या या व्याख्यानासाठी १०० लोकांची उपस्थिती होती. पुढेही ते शिवचरित्र कथनाचा ध्यास घेत जग फिरले. वयाच्या शंभरीतही बाबासाहेबांचा शिवशाहीरी बाणा ताट होता.

बाबासाहेब तरुणपणापासून पुण्यातच स्थायिक झाले. त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम सुरु केलं. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्र्यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या भव्य नाट् कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. 

छत्रपतींच्या राज्याभिषेकाला जेव्हा ३०० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त किल्ले रायगडावर झालेल्या भव्य ऐतिहासिक सोहळ्यास गो. नी. दांडेकर व बाबासाहेब गड चढून एकत्रच गेले होते. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.२०१९ मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आणि २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.