हुतात्मा बाबू गेनू यांच्या बलिदानाला इंग्रजांनी अपघात ठरवले होते.

गोष्ट आहे १९३० सालची. भारत पारतंत्र्याच्या जोखडाने बांधलेला होता. तरुणांना आता वसाहतीचे राज्य नाही तर संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते. ३१ डिसेंबर १९२९ रोजी रात्री बारा वाजता तेव्हाचे कॉंग्रेस अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला व वंदे मातरम च्या गजरात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली.

२६ जानेवारी १९३० रोजी संपूर्ण देशभरात भारतीय जनतेने स्वातंत्र्यदिन देखील साजरा केला. पुण्याच्या कॉंग्रेस कमिटीमध्ये न.चि.केळकर यांचं अध्यक्षतेखाली शपथ देखील घेण्यात आली,

“यापुढे ब्रिटीश राजवटीला शरण जाणे हा मानव व ईश्वर यांच्याविरुद्ध गुन्हा ठरेल.” 

६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे मीठ उचलले व देशभरात सविनय कायदेभंगाला सुरवात झाली.

मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, सरकारी कामावर बहिष्कार, विदेशी कापडाची होळी, करबंदी अशा अनेक पद्धतीने हा लढा लढायचं ठरल होत. अबालवृद्ध स्त्रियापुरुष लहानमुले या आंदोलनात उतरली.

आजवरच्या इतिहासात हे सर्वात मोठ आंदोलन छेडल गेलं होतं. मात्र संपूर्ण आंदोलन गांधीजींच्या अहिंसक पद्धतीने चालवलं जात होतं.

सगळा देश पेटून उठला होता. पुण्यात देखील या चळवळीचा जोर खोलवर पसरलेला होता. सर्वत्र निषेध मोर्चे निघत होते. कॉलेजच्या मुलांनी हरताळ सुरु केला होता. पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी विदेशी कापड खरेदी करायचे नाही असे निश्चित केले.

सत्याग्रहींनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन प्रचार केला. जुन्नर शहरात नगरपालिकेवर राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला. 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव पेट्यातील म्हाळुंगे पडवळ गावचा बाबू गेनू सैद नावाचा तरुण मुंबईमध्ये गिरणीत कामाला होता. गावाकडे  तापलेले वातावरण यामुळे भारावून गेलेल्या बाबू गेनू याने मुंबईत आल्यावर आंदोलनात उडी घेतली.

१२ डिसेंबर १९३० रोजी जॉर्ज फ्रेझर या प्रसिद्ध मँचेस्टर व्यापाऱ्याने जुन्या हनुमान गल्लीतील आपल्या गोदामातून कापडमाल कोटातील दुकानाकडे हलवला. परंतु काळबादेवी परिसरात बाबू गेनू व त्याच्या ३०० सहकाऱ्यांनी या परदेशी माल घेऊन जाणाऱ्या ट्रकपुढे धरणे आंदोलन सुरु केले.

सत्याग्रहीनी ट्रक अडवलेला पाहताच जॉर्ज फ्रेझर जवळच्या प्रिन्सेस स्ट्रीटवर गेला व तिथल्या पोलीस चौकीतून मदत आणली. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माघार घेण्यास नकार दिला.

ट्रकपुढे आडवे झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले होते.

पोलिसांनी या तरुणाला बाजूला होण्यासाठी खडसावले. जबरदस्तीने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण नाही, वीर बाबू गेनू बाजूला हटण्यास तयार झाले नाहीत. आपल्या हातातील तिरंगा झेंडा फडकवत ‘भारत माता कि जय’ च्या घोषणा देत ट्रकला पुढे जाऊ देण्यास मनाई करत राहिले.

संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने अखेर इशारा दिला व पोलीस शिपायाने ट्रक तसाच पुढे घेतला. अवघ्या २२ वर्षांच्या वीर बाबू गेनू यांच्या शरीरावरून गाडी गेली. रक्ताच्या चिंधड्या उडाल्या पण पोलिसांना दया आली नाही.

परदेशी माल असणाऱ्या ट्रकच्या समोर ठाणं मांडून उभा राहिलेल्या ध्येयनिष्ठ बाबू गेनू सैद यांना हौताम्य आले.

ही खबर वाऱ्याच्या वेगाने मुंबईत पसरली.

दुसऱ्या दिवशी मांडवीतून निघालेल्या त्यांच्या अंतिमयात्रेत कन्हैयालाल मुन्शी, युसुफ मेहरअली, दादाभाई नौरोजी यांची नात पेरीन कॅप्टन यांच्या समवेत २० हजार लोकांनी सहभाग घेतला. उत्फूर्तपणे एवढी जनसंख्या उपस्थित असण्याची ही पहिलीच वेळ होती.

प्रेतयात्रा शांतपणे व अहिंसा मार्गाने चालली होती. बाबू गेनू अमर रहे याच्या घोषणा दिल्या जात होत्या. पत्रके वाटली जात होती. गिरगावच्या चौपाटीवर दहन करण्यास पोलिसांनी नकार दिला. लोकांनी गोंधळ करताच जनरल विअर याने लाठीचार्ज केला.

अखेर सोनापुर स्मशानभूमीत स्नेहलता हजरत यांनी बाबू गेनू यांच्या चितेला अग्नी दिला.

मुंबईत दुसऱ्या दिवशी गिरणी कामगारांनी संप सुरु केला. बाबू गेनू जरी मुंबईत धारातीर्थी पडले असले तरी पुण्यातही यांचे पडसाद उमटले.जुन्नर, घोडेगाव, मावळ परिसरात मूक मोर्चे काढण्यात आले. पुणे म्युन्सिपालटीने आपले कामकाज तहकूब केले. अनेक ठिकाणी आंदोलने केली गेली.

चळवळ दडपली तर लोकांना दहशत बसेल असा ब्रिटीशांचा अंदाज खोटा ठरला.

बाबू गेनू यांच्या बलिदानातून अनेक तरुण, गिरणी कामगार यांनी प्रेरणा घेतली व स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

प्रचंड वाढलेल्या दबावामुळे अखेर इंग्रज सरकारने बाबू गेनूंच्या बलिदानाच्या चौकशीसाठी मुंबईततील कोरोनर कोर्टात केस सुरु केली. सरकारतर्फे मानकर वकील होते तर बाबू गेनू यांच्या तर्फे बाळूभाई देसाई यांनी केस लढवली.

तुकाराम सुर्वे व इतरांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या बाजूने साक्ष दिली. तर पोलिसांच्या रिपोर्टमध्ये बाबू गेनू यांचा मृत्यू ट्रकखाली चिरडल्यामुळे झाला नसून ट्रकचा धक्का लागल्यामुळे डोके फुटले व मृत्यू झाला असे लिहिले होते.

अखेर कोर्टाने पोलीस रिपोर्ट ग्राह्य मानत इंग्रज सरकारच्या बाजूने निर्णय दिला. बाबू गेनू यांचं हौतात्म्याला अपघात ठरवले गेले.

या निकालामुळे लोकांचा इंग्रजांच्या कोर्टाच्या न्यायवृत्तीवरून विश्वास उडून गेला.

आजही २२ वर्षांच्या बाबू गेनू यांचे बलिदान नवीन पिढीला राष्ट्रप्रेमाचे महत्व शिकवते. त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी सरकार तर्फे ठिकठिकाणी बाबू गेनू यांचे स्मारक उभारण्यात आले असून तर त्यांनी जिथे प्राणार्पण केले त्या मुंबईच्या रस्त्याचे नाव बाबू गेनू स्ट्रीट असे करण्यात आले आहे.

संदर्भ-भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पुणे जिल्ह्याचे योगदान : डॉ.भूषण फडतरे

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.