म्यानमारच्या झाडाझुडपांमध्ये भारताच्या शेवटच्या मुघल बादशाहची कबर आढळून आली.

“ कितना है बदनसीब जफर दफ़न के लिये,
दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में ”

बहादुर शाह जफर

काही वर्षांपूर्वी भारतातून तस्करी केलेल्या काही अमूल्य गोष्टी ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अबॉट यांनी परत केल्या. या घटनेचे सर्व भारतातून स्वागत झाले आणि सोबतच भारतातील मौल्यवान वस्तू, ज्या आज परदेशात आहेत, त्यांनाही वापस घेण्याविषयीची मागणी जोर धरु लागली. ज्यात ‘कोहीनूर’ हिऱ्यापासून अनेक राजांच्या मौल्यवान वस्तू होत्या.

त्याचबरोबर, एका राजाच्या ‘कबरीचीही’ वापसीची मागणी जोर धरु लागली.

सन 1857 चा उठाव म्हणजे इंग्रजांच्या सत्तेला बसलेला पहिला धक्का. या उठावात स्वदेशी सैन्याचे नेतृत्व बहादूरशाह जफर यांनी स्वीकारले. दिल्लीच्या रस्त्यांवरून हा वृद्ध बादशाह घोड्यावरून रपेट मारत असे. सैन्याचे मनोबल वाढवत असे. तरीही तब्बल 133 दिवसांनी दिल्लीचा पाडाव झाला.

सर्व बंडखोरांना अटक करून मारून टाकायचे नाहीतर आजन्म कैदेत टाकायचे, याच हेतूने इंग्रज दिल्लीत घुसले. बादशाह पळाला आणि हुमायूनच्या कबरीत जाऊन बसला. इंग्रजांनी बादशाहास पकडले. त्याच्या दोन्ही मुलांचे शीर कापून बादशहासमोर ठेवण्यात आले. अतिशय भीषण प्रसंग.. तशा परिस्तिथीत बादशाहचा एक हुजऱ्या म्हणाला,

‘दमदमाये में दम नहीं अब खैर मानो जान की ।
ए जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की ।’

त्यावर उसळून, डोळ्यात अंगार आणून बादशाह उद्गारला,

‘गाजियों में बू रहेगी जब तलक इमान की,
तख्ते लंदन तक चलेगी तेग हिन्दोस्तान की..!!’

7 ऑक्टोबर 1857 ला पहाटे 4 वाजता मुग़ल साम्राज्याचा बादशाह ‘बहादुर शाह जफ़र’ याला इंग्रजांनी ‘क्रांतीच्या’ आरोपाखाली अटक केली आणि त्यांना बैलगाडीवरून रंगून (म्यानमार) येथे पाठवले. इथून सुरु झाली एक दुर्दैवी कहानी.

98655648 zafarbed

भारतात राहून 1857 च्या उठावाचे नेतृत्व केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या या बादशाहची अखेरच्या काळात ‘आपले दफन भारतात व्हावे’, ही व्यक्त केलेली शेवटची इच्छा इंग्रजांनी पूर्ण केली नाही. तिकडे, बर्माचे राजा ‘थिबा’ यांनाही इंग्रजांनी अटक करुन याचदरम्यान महाराष्ट्रात पाठवले. अखेर वृद्धत्वामुळे 7 नोव्हेंबर 1862 मध्ये, बरोबर पाच वर्षे आणि एका महिन्याने बहादुर शाह जफ़र यांचा मृत्यु झाला. त्यांचा अंतीम विधीसुद्धा रंगूनलाच करण्यात आला आणि इकडे थिबा राजाचे सन 1916 मध्ये महाराष्ट्रात थडगे रचण्यात आले.

काळ लोटला आणि हा बादशाह काळाच्या ओघात विस्मृतीत गेला. 1991 मधे एका जागेवर अनावश्यक झाडी वाढल्याने बर्मा सरकारने त्या जागेची स्वच्छता केली. तिथेच त्यांना एक विटांनी बांधलेली कबर आढळून आली. अचानक घडलेल्या घटनेमुळे बादशहाचा लोकांच्या स्मृतीत पुनर्जन्म झाला.

हा काळ प्रचंड वेगळा होता. त्यावेळी भारतात देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले चित्रपट येत होते. त्यातून लोकांमधे आपल्या स्वातंत्रलढ्याविषयी जागृती वाढत होती. अभ्यासक नव-नविन माहिती पुरवत होते. अशा वातावरणात या बादशाहची कबर सापडल्याची बातमी भारतात धडकली आणि अनेक अभ्यासकांना ती कबर, तो वारसा भारतात असण्याची गरज वाटू लागली.

यासाठी एक समितीही नेमल्या गेली, ज्यात ज्येष्ठ पत्रकार ‘कुलदीप नय्यर’, ‘सईद नकवी’, ‘शम्सुल इस्लाम’ या अभ्यासकांची नेमणूक होती. पण यातून निष्पन्न मात्र काहीच झाले नाही.

‘मनमोहनसिंह’ यांच्या कारकिर्दीत तर त्यांनी कबरीला प्रत्यक्ष भेट देऊन, तेथील अस्थी भारतात आणण्यासाठी व थिबा राजाच्या अस्थी तिकडे पोहोचवन्यासाठी आणखी एक समिती नेमली.
‘सुषमा स्वराज’ यांनीही आपल्यापरीने जोरदार प्रयत्न चालू केले होते. पण यश कुणाच्याही वाट्याला आले नाही.

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आपल्या म्यानमार दौऱ्यात या शेवटच्या मुघल बादशाहच्या कबरीला भेट देऊन चादर चढवून आले होते.

आपल्या पूर्वजांप्रमाणे आपल्याही मृत्यूची ‘2 गज जागा’ या बादशाहने ठरवून ठेवली होती. महरौली येथील कुतबुद्दीन बख्तियार यांच्या दर्ग्याजवळ आपले दफन व्हावे, अशी बहादूरशाह जफर यांची इच्छा होती. आजही महरौली येथे असणारी ती रिकामी कबरीची जागा त्या बादशाहच्या दुर्दैवीपनाची आठवण करुन देते.

Bahadur Shah Zafar

आपल्याच एका सामान्य नोकराकडून फसवल्या गेलेल्या, भारताच्या स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व असल्याने अटक झालेल्या, केवळ तलवार चालवन्यात ‘गाझी’ नाही म्हणून काळाकडून हिनावल्या गेलेल्या आणि मुग़ल घरान्यात जन्म घेऊनही मृत्यूनंतर सुद्धा अपयशी ठरलेल्या बहादुर शाह जफ़र यांची काहीशी दुर्दैवी कहानी..!!

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. अरुण कोर्डे says

    बोल भिडू
    ————
    कृपया अशुद्ध मराठी लिहून नका. हीच मराठी भाषा आहे असे लोकांचे गैरसमज होतात. लिखाण पूर्ण झाल्यावर तपासून मगच पाठवावे.

Leave A Reply

Your email address will not be published.