हिंदी सिनेसृष्टीतली एकमेव अभिनेत्री जी दरवर्षी बाळासाहेबांना हक्काने राखी बांधायची.

राजकारणी माणुस कलाप्रेमी असणं तसं दुर्मिळच. राजकारणाच्या डावपेचांमध्ये खुपदा इच्छा असुनही काही गोष्टी अशा व्यक्तींना करता येत नाहीत. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या राजकारणाच्या व्यस्त दिनक्रमात सुद्धा आवर्जुन मनोरंजनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचे. हिंदी तसेच मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांचे ते चाहते होते.

आज रक्षाबंधन.. भाऊ-बहिणीचा प्रेमळ सण. बाळासाहेब ठाकरे हिंदी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला बहिण मानायचे.

हि बहिण म्हणजे अभिनेत्री वैजयंतीमाला.

वैजयंतीमालाने जवळपास दोन दशकं हिंदी सिनेसृष्टीत एक यशस्वी अभिनेत्री म्हणुन स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिची हिंदी सिनेसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणुन ओळख आहे. वैजयंतीमाला या कुशल भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्या नृत्य प्रशिक्षक सुद्धा असुन, कर्नाटकी संगीत आणि गाण्यांची त्यांना विशेष जाण आहे.

‘बहार’, ‘नागीन’, ‘देवदास’, ‘गंगा जमुना’, ‘संगम’ अशा अनेक हिंदी तसेच तामिळ, तेलगु सिनेमांमध्ये वैजयंतीमालांचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळतो. ‘पद्मश्री’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ अशा अनेक सन्मानांनी वैजयंतीमाला यांना गौरवण्यात आले आहे. १९८४ ते १९९१ या काळात त्या लोकसभेच्या सभासद होत्या. तसेच १९९३ ते १९९९ या काळात वैजयंतीमालांनी राज्यसभेचं सभासदपद भुषवलं आहे.

याच दरम्यान बाळासाहेब आणि वैजयंतीमाला यांची ओळख आणि मैत्री झाली असावी.

बाळासाहेब ठाकरेंना अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंतीमाला यांची अदाकारी प्रचंड आवडायची. अभिनय आणि नृत्याप्रती असणारी वैजयंतीमालांची साधना आणि समर्पण यामुळे बाळासाहेबांच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. बाळासाहेबांनी वैजयंतीमालांना बहिण मानलं.

वैजयंतीमालांनी सुद्धा बाळासाहेबांच्या या नात्याचा स्वीकार केला.

वैजयंतीमाला यांचे पती चमनलाला बाली यांच्याशी सुद्धा बाळासाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. अनेक वर्ष वैजयंतीमाला मातोश्रीवर बाळासाहेबांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरा करायच्या. रक्षाबंधनाच्या दिवशी मातोश्रीवर बाळासाहेबांच्या घरी माणसांचा गोतावळा असायचा.

पण बाळासाहेब आपल्या या लाडक्या बहिणीबरोबर रक्षाबंधन साजरा करायला आणि मनमुराद गप्पा मारायला तासभर राखुन ठेवायचे.

वैजयंतीमाला कधीकधी त्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमांसाठी मुंबईबाहेर असायच्या. त्यावेळेस रक्षाबंधनाला मातोश्रीवर जाणं त्यांना शक्य व्हायचं नाही. अशावेळी रक्षाबंधन चुकु नये म्हणुन त्या बाळासाहेबांना राखी पाठवायच्या. वैजयंतीमालांचं बाळासाहेबांसोबत इतकं जीवलग नातं होतं.

बाळासाहेबांनी वैजयंतीमालांना विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती भेट म्हणुन पाठवली.

‘तु जेव्हा कोणतीही कला सादर करशील तेव्हा हि मुर्ती तुझ्यासोबत राहावी’,

हि भावना बाळासाहेबांची होती. वैजयंतीमाला सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाआधी बाळासाहेबांनी दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणीची मनोभावे पुजा करायच्या आणि मग कार्यक्रम सादर करायच्या.

शिवसेनेच्या अनेक मिटींगच्या वेळेस वैजयंतीमाला पतीसोबत हजर राहायच्या.

या बहिणीला काय खायला आवडतं, हे बाळासाहेबांना पक्क ठाऊक होतं. जेव्हा त्या मातोश्रीवर भेटायला यायच्या, तेव्हा मातोश्रीवर बाळासाहेबांच्या सुचनेवरुन पोहे आणि इडलीचा बेत असायचा. वैजयंतीमालांचे उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी यांच्याशी सुद्धा जिव्हाळ्याचं नातं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं तेव्हा वैजयंतीमालांनी ,

‘मी माझा एक चांगला मित्र आणि भाऊ गमावला’,

या शब्दात भावना व्यक्त केली. एखाद्या राजकारणी माणसावर बाळासाहेबांनी जरी टिका केली तरी त्या व्यक्तीचे बाळासाहेबांविषयी प्रत्यक्ष आयुष्यात सलोख्याचे संबंध होते. इथे तर, बाळासाहेबांनी वैजयंतीमाला यांना बहिण मानले होते. त्यामुळे बाळासाहेब आणि वैजयंतीमाला यांचं हे वेगळं नातं किती सुंदर असेल, याची कल्पना आपण करु शकतो.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.