पाकीस्तानचा पुरस्कार घेतला म्हणून बाळासाहेबांनी त्यांच्यासोबतची जिगरी दोस्ती तोडली

भारतीय राजकारण म्हटल्यावर चटकन डोळ्यासमोर काही व्यक्ती येतात. त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे राजकारणात जितके अग्रेसर तितकेच त्यांचे राजकारणातील व्यक्तींशी सुद्धा जिव्हाळ्याचं नातं होतं. राजकारणातील अनेक व्यक्ती बाळासाहेबांच्या घरी येऊन त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारायचे.

राजकारणामध्ये जाहीर टिका करत असले तरी बाळासाहेबांविषयी सगळ्यांच्या मनात प्रेम आणि आदर होता.

बाळासाहेबांना कला आणि कलाकार या दोघांविषयी नितांत आत्मीयता होती. कलासृष्टीतील अनेकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मराठी असो, हिंदी असो वा साऊथचा सुपरस्टार रजनीकांत असो. अनेक कलाकार बाळासाहेबांना ‘मातोश्री’ वर आवर्जुन भेटायला यायचे.

अभिनेते दिलीप कुमार आणि बाळासाहेब यांचंही असंच जिव्हाळ्याचं नातं.

दिलीप कुमार आणि बाळासाहेबांचं एकमेकांच्या घरी जाणं-येणं होतं. माँसाहेब आणि दिलीपकुमारजींच्या पत्नी सायराबानो या दोघींचं सुद्धा एकमेकांवर अगदी सख्ख्या बहिणीसारखं प्रेम होतं. एकदा बाळासाहेब माँसाहेबांसह एका समारंभाला गेले असता तिथे दिलीप कुमार आणि सायराबानो उपस्थित होते. सायराबानो काहीशा अस्वस्थ होत्या.

माँसाहेबांना सायराबानोंची अस्वस्थता कळाली.

त्यांनी सायराबानोला कशाचा त्रास होतोय विचारलं.

सायराबानो पाठीच्या दुखण्याने बेजार झाल्या होत्या. माँसाहेबांनी लगेच त्या समारंभात गरम पाण्याची व्यवस्था करुन त्यात मीठ टाकलं. माँसाहेबांच्या या कृतीमुळं सायराबानोंचं दुखणं दूर झालं.

बाळासाहेबांच्या मातोश्री बंगल्यावर ब-याच वेळा रात्रभर खाण्या-पिण्याच्या मैफिली रंगायच्या.

बाळासाहेबांचं देश-विदेशातील दारुच्या ब्रँडविषयी खुप ज्ञान होतं. त्यामुळे खुपदा रात्री ‘मातोश्री’ वर बाळासाहेबांचा मित्रांसोबत दारुचा आणि गप्पांचा सुंदर माहोल निर्माण व्हायचा. दिलीपकुमार खुपदा बाळासाहेबांना फोन करुन रात्री मातोश्रीवर जायचे.

एके दिवशी बाळासाहेब आणि दिलीपकुमार यांचा अगदी साग्रसंगीत कार्यक्रम चालु होता. इतक्यात माँसाहेबांनी कच्चे चणे तळुन आणले. या चण्यांवर माँसाहेबांनी खोबरं पेरल्यामुळे चणे फारच चविष्ट झाले होते. दिलीपकुमार यांनी चणे खाताच त्यांना ते इतके आवडले की

त्यानंतर अनेकदा दिलीपजी माँसाहेबांनी बनवलेले खास चणे खायला बाळासाहेबांच्या घरी जायचे.

एका घटनेमुळे बाळासाहेब आणि दिलीपकुमार यांच्या घनिष्ट दोस्तीमध्ये भिंत आली.

दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावरचा. १९९८ साली पाकिस्तान सरकारने दिलीपकुमारजींना ‘निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तान सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले. दिलीपजींनी हा सन्मान स्वीकारायचा निर्णय घेतला. हे कळताच बाळासाहेब दिलीपकुमारवर चिडले. ते म्हणाले,

‘दिलीप, तुला या भारताने, या हिंदुस्थानने मोठं केलंय.

त्यामुळे तु पाकिस्तान सरकारचा हा पुरस्कार स्वीकारणं मला अयोग्य वाटतं.’

दिलीपजींनी मात्र हा पुरस्कार स्वीकारला. यानंतर मात्र शिवसैनिकांनी दिलीप कुमार यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दिलीपजींच्या स्वदेशाभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर उग्र आंदोलन केले. दिलीपजींनी सन्मान स्वीकारल्यामुळे बाळासाहेब आणि दिलीपजींच्या मैत्रीत मतभेद निर्माण झाले.

बाळासाहेब दिलीप कुमार यांच्यासह नंतर बोलले नाहीत.

हे मतभेद विचारांचे होते, मनाचे नव्हते. बाळासाहेब जरी बोलत नसले तरी जेव्हा दिलीपजींची प्रकृती ठीक नसायची तेव्हा उद्धव ठाकरे स्वतः दिलीपजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायचे.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचं निधन झालं. याचदरम्यान दिलीप कुमार यांची प्रकृती सुद्धा ठीक नव्हती. बाळासाहेबांच्या मृत्युचा धक्का लागेल या कारणाने सायरा बानोंनी दिलीपजींपासुन दोन दिवस हि बातमी लपवुन ठेवली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.