बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “हे तर चिकणे हिरो आहेत.”

साल होतं १९९५. शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणूक तोंडावर होती. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे, भाजपचे प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे तर काँग्रेस तर्फे शरद पवारांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचाराचे रान उठवले होते.

प्रचारानिमित्त शरद पवार विदर्भात आले होते. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तिथले काँग्रेस उमेदवार सोनूबाबा उर्फ  सुनील शिंदे हे पवारांचे कट्टर समर्थक मानले जायचे. या पूर्वी एस काँग्रेस मध्ये देखील ते शरद पवारांच्या सोबतच होते. पवारांना गांधींनी पक्षात परत आणलं तेव्हा त्यांच्या सोबत इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सोनूबाबा शिंदे हे आघाडीचे कार्यकर्ते होते.

त्यांच्या विरुद्ध होते शेकापचे वीरेंद्र देशमुख आणि भाजपच्या प्रेरणाताई बारोकर. हे सोडून एक काँग्रेसचा बंडखोर उमेदवार देखील अपक्ष उभा होता.

नाव अनिल देशमुख.

अनिल देशमुख यांची ओळख म्हणजे ते काँग्रेसचे मोठे नेते रणजित देशमुख यांचे सख्खे चुलत बंधू. नरखेडच्या पंचायतसमितीची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरवात केली होती. पुढे ते पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील बनले. पण भाऊबंदकीचा वाद आणि स्थानिक समीकरणे यामुळे त्यांना रणजित देशमुख गटाचा पाठिंबा मिळत नसे.

अनिल देशमुखांनी  जवळपास ५ वर्षे काटोल विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलं होतं . त्यांना तिथून काँग्रेसचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या असणाऱ्या सोनूबाबा शिंदे यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं.

या निवडणुकीत अनिल देशमुख अपक्ष म्हणून उतरले. त्यांना चिन्ह मिळाले होते चष्मा.

प्रचारकाळात लोकांच्या तोंडी फक्त चष्मा हे चिन्ह कसे ठेवता येईल याचा विचार कार्यकर्त्यांच्या मनात चालला होता. योगायोगाने त्याकाळात अक्षय कुमारचा सुहाग हा सिनेमा आला होता. त्यातील गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा हे गाणे देशभरात सुपरहिट झाले होते.

हे गाणे अनिलबाबुंच्या प्रचारात वापरायची कल्पना कोणाला तरी सुचली आणि हे गाणे पुढे आले. त्यावेळी एकच धडाका सुरु होता. जिथे जाईल तिथे हे गाणे वाजवायचे असे कार्यकर्त्यांनी पक्कं केल होतं. अनिल देशमुखांच्या संपूर्ण प्रचारकाळात या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्याच्या त्याच्या तोंडात चष्मा हे चिन्ह पोहचले.

देखण्या अनिल बाबूंचा काळा गॉगल घातलेला फोटो प्रचंड फेमस झाला होता.

सुनील शिंदे यांना हि निवडणूक जड जाणार असा अंदाज आला. त्यांनी काटोल मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांची सभा लावली. तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हि सभा होती. या सभेला अनिल देशमुख यांचे अनेक समर्थक हजर झाले. पवारांची सभा सुरु झाल्यावर त्यांना अनेक प्रश्ने व जाब  विचारून अनिल देशमुखांच्या समर्थकांनी बेजार केले.

गोंधळ वाढल्यावर मुख्यमंत्री शरद पवार यांना काटोल मधली प्रचारसभा थांबवावी.   

तो पर्यंत शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते म्हणून प्रस्थापित झाले होते. त्यांच्या सभा उधळून लावणे सोडा पण त्यांना जाब विचारण्याची गुस्ताखी देखील कोणी केली नव्हती. पण अनिल देशमुखांच्या समर्थकांनी हा पराक्रम करून दाखवला.

गोरे गोरे मुखडपे या गाण्याचा परिणाम असा झाला की त्यावर्षीच्या निवडणुकीत अनिलबाबू देशमुख प्रचंड मतांनी निवडून आले. पवारांचे उमेदवार सुनील शिंदे हे तर तिसऱ्या स्थानावर राहिले. भाजपच्या नेत्याचं तर डिपॉझिट जप्त झालं.

संपूर्ण महाराष्ट्रात हा चमत्कार करणारा नेता म्हणून अनिल देशमुख यांचं नाव गाजलं.

इकडे राज्यात देखील काँग्रेसचं पानिपत झालं होतं. पवारांना पुन्हा सत्ता स्थापनेसाठी अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक ठिकाणी काँग्रेसचेच बंडखोर नेते अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेनेने या अपक्ष आमदारांना आपल्या कडे वळण्याचं काम दिलेलं मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे.

बाळासाहेबांचे सुपुत्र एवढीच ओळख असलेले उद्धव ठाकरे शिवसेनेत नव्यानेच सक्रिय झाले होते. त्यांच्या मदतीला गोपीनाथ मुंडे देखील धावून आले. असं म्हणतात की काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विलासराव देशमुखांनी देखील आपल्या समर्थक आमदारांची रसद त्यांच्या पाठीमागे उभी केली.

उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने अनेक अपक्ष आमदारांनी युतीला पाठिंबा द्यायचं ठरवलं. युतीची सत्ता येणार जवळपास निश्चित होत पण तत्पूर्वी बाळासाहेब ठाकरेंचा हिरवा कंदील मिळवणे आवश्यक होते.

युती सरकारला आपला पाठिंबा देण्यासाठी तरुण अपक्ष आमदार अनिल देशमुख आणि इंदापूरचे हर्षवर्धन पाटील मातोश्री वर आले. बाळासाहेब ठाकरेंशी त्यांची भेट झाली. तेव्हा बाळासाहेब या देखण्या आमदारांना बघून गंमतीने म्हणाले,

“अरे हे तर चिकणे हिरो आहेत. यांना कशाला मातोश्रीवर बोलवलं, मीच याना भेटायला गेलो असतो.”

अनिल देशमुखांचा चष्म्याचा किस्सा आणि पवारांची उधळलेली सभा या गोष्टी बाळासाहेबांच्या कानावर आल्याचं असाव्यात. त्यांनी कौतुकाने आपला आशीर्वाद दिल्यावर हे दोन्ही नेते मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. 

अनिल देशमुख यांना युतीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपद दिलं. त्यांची शालेय शिक्षण व सांस्कृतिक राज्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार त्यांच्याच कारकिर्दीत सुरु झाला. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.