बाळासाहेबांनी विचारलं मुख्यमंत्रीपद चालवलशील काय? राणे म्हणाले पळवून दाखवतो…

नव्वदच्या दशकातला काळ. मंत्रालयावर शिवसेना भाजपचा भगवा झेंडा फडकत होता. मुख्यमंत्री पदी मनोहर जोशी होते. जोशी हे सेनेच्या पहिल्या फळीचे नेते. ते अनुभवी होते, प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती. मात्र सत्तेचा रिमोट मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हाती होता.

सुरवातीच्या काही काळानंतर मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात अंतर पडू लागलं. मनोहर जोशी हे शिवसेना प्रमुखांच्या खास विश्वासातले होते मात्र त्यांच्या कारभारावर टीका होऊ लागल्यावर बाळासाहेब देखील अस्वस्थ झाले. जाहीर कार्यक्रमात सरकारचं कान पकडण्यास देखील ते पुढं मागं पाहत  नव्हते.

यातूनच शिवसेनेत मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागलेत अशी चर्चा सुरु  झाली. रोज पेपर मध्ये जोशी जाणार अशा बातम्या छापून येऊ लागल्या.

जर मनोहर जोशी गेले तर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या. शिवसेनेचा वाघ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ मागेच पक्ष सोडून काँग्रेस मध्ये दाखल झाले होते. काही जण म्हणत होते बाळासाहेब ठाकरे उद्धव किंवा राजला मुख्यमंत्री करून पद आपल्या घरात ठेवणार. तर काही जण म्हणत होते की बाळासाहेब जुन्या नेत्यांपैकी एखाद्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देणार.

या सगळ्या नावांमध्ये एक नाव चमकू लागलं होतं,

नारायण तातू राणे.

अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेबांचा कार्यकर्ता. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचं नाव पुढं असायचं. शिवसेना प्रमुखांच्या सभेला नारायण राणे आणि हनुमंत परब हि दुकली  एकच हार घेऊन ती बाळासाहेबांच्या गळ्यात घालायची.

FB IMG 1604284549350 720x375 1

त्यातूनच त्यांचे या दुकलीकडे लक्ष वेधलं गेलं. कडवट कार्यकर्ते म्हणून त्यांनी या दोघांची नोंद घेतली.

संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे त्यांची बारकाईने नजर असायची. रस्त्यावर लढाई करणाऱ्या या कर्तबगार मावळ्याला बाळासाहेबांनी १९८५ साली मुंबई महानगरपालिकेचं तिकीट दिलं. पुढे बेस्टचा चेअरमन, आमदार, सेनेची सत्ता आल्यावर मंत्री या सगळ्या चढत्या शिड्या राणे पार करत गेले.

बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास आणि आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यावर होता. 

नारायण राणे खटपट्या आहे आणि तो मुख्यमंत्रीपद व्यवस्थित सांभाळेल याबद्दल बाळासाहेब ठाकरेंना मोठी खात्री होती. राणेंच्या देखील मनात मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावे अशी इच्छा असायची आणि त्यात गैर देखील काही नव्हतं.

पण सेनेत बाळासाहेबांचा शब्द हाच अंतिम असायचा. तिथे जाऊन पद मागणे वगैरे काही प्रकार काही चालायचा नाही. शिवसेनाप्रमुख विचार करून जो निर्णय घेतील तोच सर्वमान्य ही आजवर चालत आलेली पद्धत होती.

article 2647705 1E71515100000578

बाळासाहेब साहेब एका दिवशी स्वतःच राणेंना म्हणाले,

‘नारायण, तुला मी मुख्यमंत्री करणार.’

राणे म्हणाले,

‘साहेब गेल्या वर्षभरापासून ऐकतोय हे.’

ते म्हणाले, ‘तुला सांगितलं ना, बघ मी करतो.’

असेच काही दिवस गेले. एकदा अचानक रात्रीचे १२ वाजून गेले असताना त्यांचा राणेंना फोन आला आणि त्यांना मातोश्रीवर बोलावून घेण्यात आलं. बाळासाहेब म्हणाले,

‘नारायण, तुला मुख्यमंत्री केलं तर तू चालवशील का?’

नारायण राणे आपल्या खास शैलीत म्हणाले,

‘साहेब, मी चालवेन नाही तर पळवेन.’

बाळासाहेब ‘ठीक आहे’ असं म्हणाले. दुस-या दिवशी त्यांनी आशीष कुलकर्णीना मनोहर जोशींना पत्र द्यायला सांगितलं,

‘राजीनामा घेऊन भेटायला या.’

त्याच दिवशी शिवसेना भवनला त्यांनी आमदारांची मिटिंग लावली. मनोहर जोशी त्यावेळी लोणावळ्याला गेले होते. ते आले आणि त्यांनी राजीनामा दिला. बाळासाहेब सभेला आले. गेटमधून बाहेर पडले. आमदारांसमोर आले. सगळे अगदी गंभीर बसले होते. कोणी बोलत नव्हतं. त्यांनी माइक घेतला आणि म्हणाले,

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्या पक्षाचे आहेत. त्यांना मी आत्ता राजीनामा द्यायला सांगितला आहे. थोडय़ाच क्षणात ते येतील.’

इतकेच बोलून बाळासाहेब ठाकरेंनी माइक ठेवला आणि ते निघून गेले.

तिथं जमलेल्या कोणालाच कळेना की, सर्व नेतेमंडळींनी आता नेमकं काय करायचं?

तिथे सुभाष देसाई उपस्थित होते. ते राणेंना म्हणाले,

अहो विचारा राणेसाहेब, एक मुख्यमंत्री उतरला तर दुस-याचं नाव सुचवावं लागतं.’

नारायण राणेंना माहीत होतं पुढचा मुख्यमंत्री म्हणून आपलंच नाव आहे. त्यांनी सुभाष देसाईंना सांगितलं ,

‘मी नाही विचारणार.असं करा, मी तुम्हाला फोन लावून देतो, तुम्ही विचारा.’

देसाईंनी फोन लावला. ते बाळासाहेबांना म्हणाले,

‘कसं आहे की, एक मुख्यमंत्री उतरला तर दुस-याचं नाव सुचवावं लागतं.’

त्यावर शिवसेनाप्रमुख म्हणाले,

‘अहो, मी तुम्हाला सांगितलं ना की, नारायण राणे म्हणून. नारायण राणे यांचं नाव जाहीर करून टाका.’

आणि अशाप्रकारे तडकपडकी नारायण राणे मुख्यमंत्री झाले.

नारायण राणे एकेठिकाणी सांगतात,

“हे असं केवळ बाळासाहेब ठाकरेच करू शकतात. या लोकशाहीत असा मुख्यमंत्री कधीच होत नाही. हे तेच करू शकतात. कोणाला विचारलं नाही, चर्चा नाही, काही नाही.. केलं मुख्यमंत्री. त्यांच्या सोबत राजकारणाचे धडे शिकायला मिळाले. माझ्या जीवनात आईवडिलांच्यापेक्षाही बाळासाहेबांचं प्रेम आणि मार्गर्शन अधिक मिळालं यातच मला धन्यता वाटते.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.