म्हणून भांडारकरांना डावलून संस्कृत शिकवण्याची जबाबदारी एका इंग्रजाला देण्यात आली

इंग्रजांनी आपल्या देशात शिक्षण देणाऱ्या संस्था बनवल्या, मान्य. बरंच चांगलं काम झालं हे पण मान्य. पण हे सगळं घडत होतं ते भारतीयांना डावलून.

असाच हा किस्सा, भांडारकर आणि पीटर पॅटर्सन यांच्यातला. 

कित्येक वर्षे ब्रिटीशांनी भारतात स्थापन केलेल्या संस्थांमध्ये भारतीयांनाच मोठा संघर्ष लागला लागला होता. अनेक माणसांना फक्त भारतीय आहे म्हणून चांगल्या संधींना मुकावं लागत होतं. अशातच संस्कृत शिकवण्याची संधी एका २५ वर्षांच्या नवख्या पोराला देण्यात आली होती.

हा बाहेरून आलेला माणूस होता पीटर पॅटर्सन..!

पौर्वात्य भाषा आणि संस्कृत नावाचं एक वेगळं डिपार्टमेंट कॉलेजात होतं. त्या डिपार्टमेंटला शिकवायला हा माणूस भारतात आला.

ग्रेट ब्रिटन जवळच्या बेटांवर राहणाऱ्या पीटर पॅटर्सनचा बाप तिथला मोठा व्यापारी होता. घरात मजबूत पैसे असल्यानं पीटर पॅटर्सनला मनासारखं शिक्षण घेता आलं. एडिनब्रा विद्यापीठात त्याला ऍडमिशन मिळालं.

याच कॉलेजात जर्मन प्रोफेसर सायमन ऑफ्रेख संस्कृत विषय शिकवायचे. त्यांच्या हाताखाली पीटर पॅटर्सनने संस्कृतचा अभ्यास केला. या कॉलेजात त्याला या विषयात गोडी निर्माण झाली.

पुढच्या शिक्षणासाठी त्यानं ऑक्सफर्ड विद्यापीठ निवडलं.

तिथं जगातले सगळ्यात ग्रेट संस्कृत अभ्यासक शिकवायला होते. त्यांच्यापैकीच एक नाव होतं ते  फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांच. या माणसाचं नाव इकडे विवेकानंदांपासून ते छोट्यामोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहित होतं. भारताविषयी त्यानं सांगितलेलं विधान आणि ग्रंथांचा त्याने लावलेला अर्थ आजही ग्राह्य मानला जातो.

पीटर पॅटर्सनची संस्कृत विषयातील गती वाखाणण्याजोगी होती त्यामुळे त्याला बोडेन हि नावाजलेली शिष्यवृत्ती देण्यात आली.

१८७३ ला तो मुंबईत आला, इथे त्याला संस्कृत शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याची हीच निवड वादग्रस्त होती. 

नेमका मुद्दा होता…

जर्मनी आणि इंग्लंड भारताचा सगळ्यात भारी अभ्यास कोण करतंय हा..!

इंडोलॉजी अर्थात भारतातील गोष्टींचा अभ्यास हा युरोपात लोकांचा आवडीचा विषय झाला होता. १८१४ साली कॉलेज डी फ्रान्समध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या विभागाची स्थापना करण्यात आली. १८१९ मध्ये ऑगस्ट विल्यहम व्हॉन श्लेगल हा बॉन विद्यापीठात संस्कृतचा पहिला शिक्षक बनला.

इंग्लड मुळात या स्पर्धेत उशिरा उतरलं. १८३२ साली इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डने संस्कृत अध्यासन तयार केलं. त्याला बोडेन अध्यासनाचे नाव देण्यात आले.

हम्बोल्ट विद्यापीठानं भारतावर अनेक संशोधने केली. त्याचाच कित्ता एडिनब्रा विद्यापीठ यांनी गिरवला. मार्टिन हॉग हा पहिला जर्मन माणूस १८५९ साली पुण्यातल्या डेक्कन कॉलेजात भाषाशास्त्र शिकवायला आला होता.  

ज्या जागेसाठी पीटर पॅटर्सनची नियुक्ती झाली होती ती जागा खास जर्मन प्रोफेसरची होती..

जॉर्ज ब्यूह्लर नावाच्या माणसानं १८६३ ते १८६९ सालापर्यंत हे पद सांभाळलं होतं. त्यांना मधल्या काळात बॉम्बे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एक नवी संधी मिळाली आणि ते तिकडं रुजू झाले.

त्यांची जागा आधल्या मधल्या काळात चालवत होते ते पुण्याचे थोर संशोधक आणि प्राध्यापक रामकृष्ण गोपाळ भांडारकर.

भांडारकर सर तेव्हा अधूनमधून एल्फीस्टनला जॉर्ज ब्यूह्लरच्या जागी बदली शिक्षक म्हणून शिकवायला जायचे. त्यामुळं जॉर्ज ब्यूह्लर निघून गेल्यांवर त्यांच्या जागी रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची वर्णी लागणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्यांना कॉलेजच्या इतर लोकांकडूनही चांगला सपोर्ट होता.

१८७२ ला मात्र जॉर्ज ब्यूह्लर निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी वर्णी लागली ती पीटर पॅटर्सनची

पीटर पॅटर्सनच्या नावाला आपले गुरु मॅक्स म्युलर यांच्याकडून सरळ पाठिंबा होता. त्यामुळं रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांना डावललं गेलं आणि पीटर पॅटर्सनची नियुक्ती त्यामुळं चर्चेचा विषय ठरली.

भारतीयांना सातत्याने कमी लेखण्याची ब्रिटिशांची सवय अजून कायम होती. १८५७ च्या उठावानंतर हि बाब अजूनच प्रकर्षाने पुढं यायला लागली होती. पण पीटर पॅटर्सनची बुद्धिमत्ता आणि विषयातील रस हे त्याच्यानिवडीमागचे काही मुद्दे होतेच.

मात्र खरा वाद सुरू झाला तो त्याच्या निवडीच्या दहा वर्षांनंतर

१८८१ साली बॉम्बे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एक नवा प्रकल्प सुरु झाला होता. बॉम्बे संस्कृत सिरीज. जुन्या संस्कृत ग्रंथाना नव्या स्वरूपात संपादित करून प्रकाशित करणे हा या मोहिमेचा हेतू होता.

पीटर पॅटर्सनने हि कामगिरी आपण पार पाडली असल्याचा दावा केला आणि पुस्तकं आपल्या नावाने छापून आणली.

हे संपादन आपणच केल्याचा त्याचा दावा होता.

पण हा प्रकल्प मुळात १८६४ मध्येच ब्यूह्लर आणि अजून एका जर्मन प्राध्यापकाने सुरु केला होता अशी बातमी फुटली. कीलहोर्न नावाच्या प्राध्यापकाने हा प्रकल्प पूर्णपणे ओढून नेऊन संपवला होता. त्याने जर्मनीतून यावर देखरेख ठेऊन केली होती.

त्यामुळं पीटर पॅटर्सनचं भांडं फुटलं. त्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लावण्यात आलं आणि त्याची चौकशी सुरु झाली. त्याच्यावर कमिटी बसवण्यात अली. त्याच्या संशोधनाचा पडताळा करण्यात आला.

बॉम्बे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये लोकांना पीटर पॅटर्सननं टेपा मारल्याचं जाणवलं.

आपल्या प्राध्यापक पदाच्या पोस्टवरून त्याला हटवण्यात आलं. पण त्याला डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलं. आत्ता तुम्ही म्हणाल असं का? तर त्याला दोन भारतीयांनी पाठींबा दिलेला होता. एकाच नाव होतं,  काशिनाथ तेलंग आणि दूसऱ्याचं नाव होतं शंकर पंडित.

दोघेजण इंग्रजांच्याकडे नोकरीस होते. त्यांनी मुंबई सरकारपुढे पीटर पॅटर्सनच्या बाजूने जबाब दिला. त्याने बॉम्बे संस्कृत सिरीजच्या कामात मदत केल्याचं दोघांनी शपथेवर सांगितलं.

या घटनेनंतर सरकारला आपली चूक कळून आली.

त्यांनी रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांना सन्मानाने बोलावून डेक्कन कॉलेजात संस्कृत प्राध्यापकाची नोकरी देऊ केली.

आणि पीटर पॅटर्सन हा संस्कृत प्राध्यापकाची नोकरी करणारा शेवटचा युरोपियन ठरला. तिथून पुढं इंग्रज सरकारने कानाला खडा लावला आणि तिथून पुढं हि जागा फक्त भारतीयांसाठी राखीव ठेवण्यात आली.

कालांतराने भांडारकर मागच्या गोष्टी विसरून पॅटर्सनचे चांगले मित्र बनले आणि पुढे अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी सोबत काम केलं. भांडारकर आपल्या संशोधनासाठी जगभर प्रसिद्ध झाले आणि जगातील प्राचीन ग्रंथांच्या  मोठ्या भांडारापैकी एक असणाऱ्या पुण्यातील संस्थेला त्यांचं नाव देण्यात आलं.

आज आपण भांडारकर  प्राच्यविद्या संशोधन मंदिर म्हणून ओळखतो ती हीच संस्था होय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.