फिल्मस्टार नर्गिसच्या प्रयत्नांमुळे निळू फुले श्रीराम लागूंचा सामना थेट बर्लिनमध्ये झळकला होता..

मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही, थिएटर नाही अशी ओरड सध्या ऐकू येत असली तरी एक काळ हा सुवर्णकाळ होता ज्यावेळी मराठी नाटकच नाही तर चित्रपट सुद्धा दर्जेदार होते. हल्ली मराठी दिग्दर्शकांनी बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये सिनेमा पोहचवून मराठी सिनेमाचा उत्कर्ष केलाच आणि मराठी भाषा सर्वदूर पोहचवली.

पण सगळ्यात आधी बर्लिन फिल्म फेस्टिव्हल मध्ये पोहचलेला मराठी सिनेमा होता

‘ सामना ‘

सामना हा चित्रपट मराठी सिनेमा विश्वातला मैलाचा दगड म्हणता येईल इतका अत्युच्च दर्जाचा होता. ज्यावेळी दिग्गज लोकांची भट्टी जमून येते तेव्हा अद्भुत काहीतरी निर्माण होते, तसंच घडलं ते सामनाच्या बाबतीत.

लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, निर्माते रामदास फुटाणे आणि अभिनयाची जुगलबंदी असलेले निळूभाऊ आणि डॉ. श्रीराम लागू. हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज झाला तेव्हा भयंकर धुमाकूळ घातला. चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले. दगडफेक, अश्रूधूर वैगरे इथपर्यंत सामना चित्रपट प्रसिद्धीस पावला होता.

ग्रामीण संस्कृतीच्या विरोधात रचलेलं कथानक आहे असे आरोप चित्रपटावर होऊ लागले. औरंगाबादच्या एका थिएटरमध्ये सामना चित्रपट चालू असताना जमाव थेटरात घुसला आणि त्यांनी थेट पडदा फाडून टाकला आणि चित्रपट बंद केला होता.

पुढे सामना हिंदीतही तयार केला गेला पण तो कधी आला आणि कधी गेला कुणालाही कळले नाही. सामना ने त्यावेळी महाराष्ट्रात धडाक्यात उसळी मारली होती. दगडफेकीपर्यंत प्रकरण गेलं म्हणून लोकं अजूनच उत्सुकतेने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करू लागले. सामनाने व्यावसायिकरित्या बॉक्स ऑफिसवर कमाई करायला सुरवात केली होती.

सगळीकडून निळूभाऊ आणि श्रीराम लागूंवर कौतुकाचा वर्षाव होत होता. सामनाचे शो सुद्धा हाऊसफुल चालले होते. त्याच वेळी बातमी येऊन धडकली कि १९७५ सालच्या ‘ बर्लिन फिल्म फेस्टिव्हल ‘ साठी भारतातर्फे ‘ सामना ‘ ची निवड झाली आहे.

जगात अनेक चित्रपट महोत्सव होत असतात त्यातल्या त्यात बर्लिन फिल्म फेस्टिवल हा मानाचा समजला जाणारा चित्रपट महोत्सव होता.

संपूर्ण भारतातून सामना हा चित्रपट निवडला गेला होता आणि हा सिनेमा निवडला होता तो नर्गिस दत्त यांनी.

भारताच्या चित्रपट निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यान्ची त्या वर्षी निवड झाली होती.

नर्गिस यांचं वास्तव्य मुंबईत असल्याने त्यांना उत्तम मराठी बोलता येत असे. श्रीराम लागूंच्या नटसम्राटच्या तीनशेव्या प्रयोगाला त्या अध्यक्षा म्हणून आल्या होत्या. ज्यावेळी नर्गिस दत्त यांनी सिनेमा पाहिला त्यावेळी त्यांना तो इतका आवडला होता कि त्यांनी हट्ट करून भारतातला त्या वर्षीचा ऑल टाइम हिट चित्रपट म्हणून सामनाची निवड केली.

आता इथं सामनाच्या टीमने अडचण दर्शवली कि पण चित्रपट तर प्रादेशिक भाषेत आहे , परदेशातल्या व्यक्तींना कुठे मराठी कळणार आहे ?

त्यावर नर्गिस दत्त यांनी सांगितलं कि,

प्रादेशिक भाषेत असला म्हणून काय झालं ? कुठल्याही इंग्रजी चित्रपटाला सब टायटल्स असतातच कि !

शेवटी पहिल्यांदाच एखादा मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला जाणार होता. नर्गिस दत्त यांनी जब्बार पटेल, निळूभाऊ, श्रीराम लागू आणि रामदास फुटाणे यांच्यासोबत एक अधिकारी पाठवून त्यांची व्यवस्था बर्लिन फिल्म फेस्टिव्हल साठी केली.

नर्गिस दत्त आणि सुनील दत्त हे अगोदरच बर्लिनला असणार होते. बर्लिन फिल्म फेस्टिव्हल मध्ये सामना दाखवण्यात आला. प्रेक्षकांमध्ये बसून निळूभाऊ आणि लागू यांनी चित्रपट पाहिला. सिनेमा संपल्यावर स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटात सामनाच्या टीमचं स्वागत झालं.

नर्गिस दत्त यांनी हा मराठी सिनेमा चित्रपट महोत्सवात झळकवण्यासाठी इतके प्रयत्न केले पण बर्लिनमध्ये त्यांना हा चित्रपट पाहता आला नाही. कारण सुनील दत्त आणि नर्गिस दत्त हे ट्राफिक जॅम मध्ये अडकले होते. पण त्यांनी तिथेही सामनाच्या चमूचं अभिनंदन केलं.

बर्लिनमधल्या नर्गिस दत्त यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला आणि चित्रपटाचं यश साजरं केलं. निळूभाऊ त्या पार्टीत जरा लाजत होते पण थोड्या वेळाने कंफर्टेबल झाल्यावर निळूभाऊंनी मग नर्गिस सोबत फोटो घेतला.

मराठी सिनेमा पहिल्यांदा बर्लिनमध्ये नेण्याचं श्रेय जात ते नर्गिस दत्त यांना. सामना आजही प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट आहे.

संदर्भ : लमाण- डॉ. श्रीराम लागू

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.