हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मराठी पोरींचा तिखटजाळ अवतार दाखवून दिला तो रंगीला मधल्या उर्मिलाने…!

मुंबईचा वादळी पाऊस. सत्या खिडकीतून पाहत उभा आहे. त्याच्या थंडगार डोळ्यात भविष्याची चिंता आहे. आयुष्याच्या एका वळणावर तो वेटरचा अंडरवर्ल्डचा गुंड झालाय. आपण कुठे आलोय काय करतोय त्याला कळत नाहीय.

पावसाचा जोर वाढतो आणि लाईट जाते. सत्या तसाच थंड डोळ्याने पाऊस बघतोय. अचानक कोणी तरी दार ठोठावतं आणि नाजूक आवाज येतो,

मै विद्या

सत्या दार उघडतो. त्या अंधारात लायटरच्या प्रकाशात ती दिसते. मोठे डोळे, कपाळावर मोठी टिकली, नाकात चमकणारी बारीकशी नथ, कानात मोठाले इयररिंग्ज. टिपिकल मराठी मुलगी.  ती काही तरी फ्युज उडाल्याचं सांगत आलीय.

त्या लायटरच्या प्रकाशात ती दिसते आणि आयुष्यात दगड झालेला सत्याचं काय, पिक्चर बघायला आलेल्या संपूर्ण थिएटरचं फ्युज उडतंय. सत्या मधल्या विद्याच्या रोलमध्ये उर्मिला मातोंडकरने पुन्हा एकदा पब्लिकला धक्का दिला होता.

 उर्मिला मातोंडकर. एका सुशिक्षित मराठी कुटूंबात जन्मलेली मुलगी. शिक्षण सुद्धा मराठी शाळेतच झालं. तुमच्या आमच्यासारख शामची आई ते श्रीमान योगी अशी पुस्तक वाचत मोठी झाली. तस बघायला गेलं तर तिचे वडील श्रीकांत मातोंडकर एक सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार चळवळीतले नेते. राष्ट्र दलाशी ते संबंधित असल्यामुळे सांजवाडी विचारांचा पगडा उर्मीलावर तेव्हापासूनच पडला.

प्रचंड उत्साही आणि चुणचुणीत दिसणाऱ्या सहा वर्षांच्या उर्मिलाची श्रीराम लागूंच्या झाकोळ या सिनेमासाठी विचारणा झाली. तिथून आयुष्याला वेगळंच वळण लागलं. उर्मिलाने गंमत म्हणून केलेलं काम सगळ्यांना प्रचंड आवडलं. शेखर कपूर यांचा कलयुग हा सिनेमा केला आणि लागोपाठच आलेला मासूम या सिनेमात उर्मिला चमकली.

मासूम हा तस बघायला गेलं तर हिंदी सिनेमातील एक माईलस्टोन. थोडासा ऑफबीट समजला जाणारा हा विषय पण नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, सईद जाफरी अशा दिग्गज कलाकारांच्या सोबत इतक्या लवकर काम करायला मिळणे हे उर्मिलासाठी भाग्याचीच गोष्ट होती. गुलझार यांची हळुवार पटकथा, त्यांनीच लिहिलेली जबरदस्त गाणी यामुळे हा सिनेमा ओळखला गेला. 

लकडी कि काठी या अजरामर गाण्यामुळे उर्मिला सुद्धा भारतभरातील घराघरात पोहचली.

बालकलाकार म्हणून यशस्वी कारकीर्द घडवल्यावर अठरा वर्षांची उर्मिला मातोंडकर कमल हासनच्या चाणक्यन या सिनेमातून नायिकेच्या भूमिकेत अवतरली. लवकरच सनी देओलच्या नरसिम्हा, शाहरुख खान सोबतचा चमत्कार असे तिचे सिनेमे आले. हे सिनेमे चालले देखील. गाणी तर विशेष गाजली पण याचा उर्मिलाला विशेष फायदा झाला नाही.

गोड गोड दिसायचं. हिरो बरोबर बागेत गाणी गायची झाडाभोवती नाच करायचा. एवढ्या पुरते उर्मिलाचे रोल मर्यादित होते. गर्ल नेक्स्ट डोअर इमेज असलेल्या उर्मिलाला याहून वेगळे असे काय रोल मिळणार होते म्हणा.

हा फक्त तिचाच प्रॉब्लेम नव्हता तर मराठी मधून हिंदी मध्ये गेलेल्या प्रत्येक कलाकाराचा हाच प्रॉब्लेम होता. एक तर त्याकाळात मराठी अभिनेता हिरोचा रोल करत नव्हता. फिल्म इंडस्ट्रीवर पंजाबी कलाकार राज्य करायचे. जास्तीत जास्त हिरोईन असायच्या मात्र त्यांना सुद्धा वरण भाताची उपमा दिली जायची. सुरवातीला चुलबुली मुलीच्या रोल करायच्या आणि लवकरच आपल्या वयाच्या हिरोच्या आईच्या भूमिकेत शिफ्ट व्हायचं हे मराठी अभिनेत्रींच्या नशिबात येत होतं.

माधुरी दीक्षित सारखी पहिलीच नटी आपण या इंडस्ट्रीवर राज्य करण्यासाठी आलोय हे दाखवून देत होती. पण तिला हि रोल मिळताना बोल्ड टाईपचे नव्हते. मराठी नटींनी फक्त गोडच दिसावं असा बॉलिवूडचा आग्रह होता की काय.

अशातच उर्मिलाने एक तेलगू सिनेमा साइन केला. याचा हिरो होता नागार्जुन. तर दिगदर्शक होता राम गोपाल वर्मा. सिनेमाचं नाव अंथम. 

शिवाच्या नंतर राम गोपाल वर्मा आणि नागार्जुन हि जोडी काही तरी अफलातून करेल असं सगळ्यांना वाटलेलं. तो सिनेमा हिंदीत द्रोही म्हणून रिलीज झाला पण बॉक्स ऑफिसवर काही विशेष चालला नाही. या सिनेमामुळे एकच झालं, राम गोपाल वर्माला उर्मिला गवसली.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये जोहरी म्हणून ओळखल्या रामूला जाणवलं की उर्मिला हि फक्त गर्ल नेक्स्ट डोअर चे रोल करायला जन्माला आली नाही. तिचा मेक ओव्हर केला तर संपूर्ण बॉलिवूडवर कहर बनून कोसळायला ती मागे पुढे बघणार नाही.

तसंच घडलं. रामूने आमिर खान, जॅकी श्रॉफ अशा तगड्या हिरोंना घेऊन एक नवीन सिनेमा बनवला. हिरो ते होते पण चर्चा फक्त उर्मिलाची झाली.

तो पिक्चर होता रंगीला.  

सिनेमाची सुरवात होते याई रे याई रे गाण्यापासून. नव्या पिढीचं अँथम ठरेल असा बिन्दास्तपणा पुरेपूर उतरवणारा डान्स करत जेव्हा उर्मिला स्क्रीनवर अवतरली तेव्हा हीच का ती मराठी वरणभट समजली जाणारी उर्मिला मातोंडकर आहे का हा प्रश्न पब्लिकला पडला. 

अगदी पहिल्या सिन पासून उर्मिलाने रंगीलाच्या प्रत्येक फ्रेमवर अधिराज्य गाजवलं. प्रखर रंगाची उधळण असलेल्या या सिनेमात उर्मिला बिनधास्त वावरली. मराठी पोरी बोल्ड कपडे घालू शकत नाहीत हे तिने खोटं ठरवलं.अगदी भिडू जॅकीच्या बनियान मध्ये सुद्धा किती सेक्सी दिसता येत हे उर्मिलाने रंगीला मध्ये सिद्ध केलं.

 तन्हा तन्हा गाणं तर अफाट होतंच. उर्मिलाचा डान्स बघून जॅकी प्रमाणे आपण सुद्धा आउट झालो होतो. रहमान या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदीत उतरला होता. त्याने प्रत्येक रस प्रत्येक राग या गाण्यातून हिंदीच्या पब्लिकला दाखवला.

आजही रंगीलाची गाणी हेडफोनवर किंवा गाडीत ऐकताना अगदी तितकीच ताजीतवानी आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेली वाटतात. पण लक्षात राहते त्यावर नाचणारी उर्मिला.

रंगीला मध्ये उर्मिलाने आपण बोल्ड दिसू शकतो हे सिद्ध तर केलंच पण आपला अभिनय देखील तितकाच सशक्त आहे हे सुद्धा तिने सिद्ध केलं. रंगीला नंतर तिला तसलेच रोल ऑफर झाले असतील पण ती आली वर सांगितलेल्या प्रमाणे सत्या मधल्या विद्याच्या रूपात. संपूर्ण मारधाड असणाऱ्या या गँगस्टर सिनेमात साडीत वावरणारी उर्मिला तुफान वादळात टिकून राहिलेल्या एखाद्या फुलाप्रमाणे वाटली.

रामगोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर या जोडीने प्रत्येक जॉनर मध्ये अनेक भारी भारी सिनेमे केले. सगळेच सिनेमे रामूने दिगदर्शित केलेलं असं नाही. पण त्याच्या प्रोडक्शन मधल्या सिनेमात उर्मिला होतीच. कौन, जंगल, मस्त, भूत, प्यार तुने क्या किया, एक हसीना थी तुम्ही फक्त नाव घ्या. उर्मिलाने ऍक्टिंग मधून आग ओकली आहे.

पुढे तीच आणि रामूचं काय बिनसलं माहित नाही. पण उर्मिलाच्या अभिनय क्षमतेला इतर कोणी म्हणावं तेव्हढा न्याय देऊ शकला नाही. पिंजर सारखा बाप सिनेमा तिने केला पण पुढे तिची जादू  ओसरल्यासारखी वाटू लागली.

आता तर काय ती राजकारणात गेलीय. स्वतःच्या आंतरधर्मीय लग्नापासून ते राजकारणात रोखठोक भूमिका घेतल्याबद्दल तिला जोरात ट्रोल केलं जातंय. पण ठाम वैचारिक पार्श्वभूमी असलेली उर्मिला सगळ्यांना पुरून उरलीय. राजकारणात ती यशस्वी होईल किंवा नाही पण मराठी अभिनेत्रींवरचा वरण  भाताचा ठपका हटवून कोल्हापुरी ताबंड्या पांढऱ्या सारखा तिखटजाळ पणा देखील दाखवता येतो हे तिने सिद्ध केलं. त्यासाठी तिला कायम ओळखलं जाईल. हे हि नसे थोडके. 

हे हि वाच भिडू :

    

Leave A Reply

Your email address will not be published.