भुजबळ ६ ; नारायण राणे १० ; राज ठाकरे १ : कोण किती आमदार घेवून बाहेर पडलं..

राज्यात विधानपरिषद निवडणुकीनंतर मोठा राजकीय नाट्यक्रम घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसेना आमदार गुजरातमध्ये सुरतला गेल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय.

आणखी कोणता नाराज नेता भाजपच्या मार्गावर तर नाही ना? याची तपासणी महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत.

देवेंद्र फडणवीस आपला नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीची तात्काळ बैठक बोलावल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची मुंबईला हजेरी लागत आहे. कडवे शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उचलेल्या पावलामुळे राजकारणात बरीच खळबळ माजली आहे. 

परंतु शिवसेनेतील नेत्याने शिवसेना सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधीसुद्धा अनेक नेत्यांनी संघटित किंवा वैयक्तिक स्वरूपात शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. . 

१) छगन भुजबळ 

मागासवर्गीय असल्याने मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळत नाही. हा आरोप करत छगन भुजबळांनी शिवसेनेला पहिल्यांदा रामराम ठोकला 

सर्वप्रथम शिवसेनेला रामराम ठोकला होता तो छगन भुजबळ यांनी. मनोहर जोशी हे ब्राह्मण असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार घोषित केलंय. हा आरोप करत छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये शिवसेनेना सोडली होती. पक्षांतरबंदी कायदा लागू नये यासाठी त्यांनी आपल्यासोबत १८ आमदारांना आपल्यासोबत पक्ष सोडायला तयार केलं होतं.

शिवसेनेचा त्यावेळचा दरारा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून काहीही होऊ शकते ही भीती असल्याने १२ आमदार परत शिवसेनेकडे वळले. मात्र उरलेल्या ६ आमदारांना सोबत घेऊन छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

२) गणेश नाईक 

निव्वळ पर्यावरण मंत्रिपदावर आपली बोळवण करण्यात आलीय. असा आरोप करत गणेश नाईकांनी शिवसेना सोडली

छगन भुजबळ हे काँग्रेस पक्षानंतर, शरद पवारांनी १९९९ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. त्यावेळी राज्यात युतीच्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेनेला रामराम ठोकला आणि १९९९ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

गणेश नाईकांनी शिवसेना सोडत असतांना आपण मुख्यमंत्री पदासाठी लायक असतांना निव्व्ल पर्यावरण मंत्रिपदावर आपली बोळवण करण्यात आली आहे. असा आरोप शिवसेनेवर केला होता. परंतु २०१९ मध्ये गणेश नाईकांनी नवी मुंबईतील ४८ विद्यमान नगरसेवक आणि ७० माजी नागसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी खिंडार पडली.  

3) भास्कर जाधव 

उद्धव ठाकरेंनी पीएच्या सल्ल्याने आमदारकीची तिकीट कापलं आणि भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली

यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेचे कार्याध्यक्षपद दिले गेले. उद्धवठाकरेंच्या हातात कार्याध्यक्षपद दिल्याने मात्र शिवसेना सोडणाऱ्यांची रांगच लागली. उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना सोडून जाणाऱ्या नेत्यांपैकी पाहिलं नाव म्हणजे भास्कर जाधव.

पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे बाळासाहेबांनी भास्कर जाधवांना आमदारकीचे तिकीट दिले. त्यांनतर १९९४ आणि १९९९ असं दोन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले.

परंतु २००४ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पीएच्या सल्ल्याने केलेल्या सर्वेच्या आधारावर भास्कर जाधव यांची चिपळूणची आमदारकीची तिकीट कापली. सोबतच बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मात्रोश्रीच्या बाहेर ताटकळत ठेवलं. यामुळे संतप्त झालेल्या भास्कर जाधवांनी २००४ मध्ये शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली. परंतु २०१९ मध्ये ते घरवापसी करत शिवसेनेत परतले.

४) नारायण राणे 

पुत्रप्रेमामुळे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं. मग काय नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली

यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला तो नारायण राणेंच्या पक्ष सोडण्याने. शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती देण्यात आली. परंतु आपली लायकी असतांना सुद्धा निव्वळ पुत्रप्रेमामुळे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं. यामुळे नाराज झालेल्या नारायण राणेंनी  शिवसेनेतील आणखी दहा आमदारांसह २००५ मध्ये शिवसेना सोडली व काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या १० आमदारांपैकी चंद्रपूरचे विजय वड्डेट्टीवरांना वगळता बाकी सगळ्यांनीच काँग्रेस सोडली. यातील गोरेगावचे नंदकुमार काळे, राजापूरचे गणपत कदम, वेंगुर्ल्याचे गणपत कांबळी, संगमेश्वरचे रवींद्र माने आणि पुण्याचे विनायक निम्हण यांनी परत शिवसेनेत परत जाण्याचा निर्णय घेतला. तर नायगावचे कालिदास कोळंबकर, अमरावतीचे प्रकाश भातसाकळे आणि नाशिकचे माणिकराव कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दस्तुरखुद्द नारायण राणे आणि त्यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या श्रीवर्धनच्या शाम सावंत यांनी सुद्धा २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

५) राज ठाकरे 

बाळासाहेबांनी उद्धवला पसंती देत राजला नाकारलं आणि राजने नवनिर्माण केलं

यानंतर शिवसेना सोडणारं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे राज ठाकरे यांचं. राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याची निव्वळ शिवसेनेतीलच नाही तर खुद्द ठाकरे परिवारातील वाद चव्हाट्यावर आला होता. पक्षाचा कार्याध्यक्ष होण्याची क्षमता असतांनाही बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंना बसवलं.

यामुळे राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने या नवीन पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर तीन वर्षांनी झालेल्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १४ आमदार निवडून आले होते.

छगन भुजबळांचा मुंबईत पराभव करून प्रकाशझोतात आलेल्या बाळा नांदगावकरांनी सुद्धा शिवसेनेला रामराम ठोकला व राज ठाकरेंशी जवळीक करत मनसेत प्रवेश केला.

यासोबतच बळवंत मंत्री, अरुण मेहता, बंडू शिंगरे, हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान, माधव देशपांडे, बाळासाहेब विखे पाटील, संजय निरुपम, आनंद परांजपे, अभिजित पानसे इत्यादी नेत्यांनी सुद्धा मतभेदांमुळे वेळोवेळी शिवसेना सोडली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेला बसलेला धक्का मोठा असला तरी नवीन नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.