वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…

असं म्हणतात की वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून… 

आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड, अमित शहांचे आदेश आणि शरद पवारांनी देखील इतिहासात खेळलेली अशीच एक चाल…तर पहिलं बोलूया आत्ताच्या छोबीपछाडीबद्दल.

देवेंद्र फडणवीस यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. 

अगदी अखेरच्या क्षणी केंद्रिय नेतृत्वाने त्यांना आदेश दिले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या डावपेचात अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मात दिल्याचं बोललं जातंय. २०१४ साली वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळल्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र युग निर्माण झाले. 

या काळात फडणवीस यांच्याच मर्जीने तिकीटवाटप होवू लागलं, त्यांच्याच मर्जीने विधानपरिषद, राज्यसभा मिळू लागली. त्यांच्याच मर्जीने पक्षातल्या बड्या नेत्याना साईडलाईन देखील केलं जावू लागलं.

गेल्या अडीच वर्षाच्या काळात देखील विधीमंडळात फडणवीस यांनी चांगली मुसंडी मारली. बिहार आणि गोवा सारख्या निवडणूकांमध्ये त्यांची हवा झाली.

एकामागून एक पायऱ्या फडणवीस चढू लागले. पण याच दरम्यान केंद्रिय पातळीवर देखील फडणवीस यांच्याबाबत एक अस्वस्थता निर्माण होत असल्याचं बोललं जावू लागलं. फडणवीस यांच वय, त्यांच नागपूरचं असणं, त्यांच ब्राह्मण असणं, त्यांचे संघाचं कनेक्शन अशा अनेक गोष्टी “आज नरेंद्र कल देवेंद्र” या गोष्टीला बळ देणाऱ्या ठरू लागल्या.

अशा वेळी अमित शहांनी उपमुख्यमंत्रीपदाचा डाव खेळून फडणवीस यांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम केल्याचं सांगण्यात येतय… 

बरं असा खेळ पहिल्यांदाच झाला का तर नाही..

अमित शहा जसे चाणक्य, राजकारणातले छक्के पंजे माहित असलेले पैलवान म्हणून ओळखले जातात तसच एक नाव म्हणजे शरद पवार.. शरद पवार देखील कसलेले पैलवान आहेत. त्यांनी देखील याच प्रकारचा डाव २००४ साली खेळला होता..

२००४ सालच्या विधानसभेच्या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने १२४ जागा लढवल्या होत्या तर कॉंग्रेसने तब्बल १५४ जागांवर आपले उमेदवार उभा केलेले. निवडणूकपुर्व आघाडी असल्याने राष्ट्रवादीने तिकीट वाटपातच कॉंग्रेसपेक्षा ३० जागा कमी घेतलेल्या..

ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा अघोषीत करारच आघाडीमध्ये झाला होता. पण निकाल लागला तेव्हा राष्ट्रवादीला तब्बल ७१ जागांवर विजय मिळाला तर कॉंग्रेसला ६९ जागा मिळाल्या.. कॉंग्रेसपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्याने आत्ता फासे राष्ट्रवादीच्या हाती आले होते. चर्चा चालू झाल्या आत्ता राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणार.. 

पण फक्त कॉंग्रेसमुळे दोन जागा जास्त मिळाल्या म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार इतकच कारण नव्हतं, तर राष्ट्रवादीकडे एक असा नेता होता जो या पदावर निर्विवादपणे बसणार होता.. 

अन् ते नाव होत अजित पवार यांच.. 

राष्ट्रवादी पक्षात तेव्हा छगन भुजबळ, आर.आर.पाटील, जयंत पाटील, सुनिल तटकरे, विजयसिंह मोहिते पाटील अशी अनेक नावं होती. पण या नावांपेक्षा सर्वात महत्वाच नाव होतं ते अजित पवारांच… 

अजित पवारांनी राष्ट्रवादीवर आपली पकड मजबूत करण्यास सुरवात केली होती. १९९९ सालच्या विलासरावांच्या सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री होते. पहिल्यांदाच त्यांची वर्षी कॅबिनेट मंत्री म्हणून झाली होती. शरद पवारांचे पुतणे, आक्रमण नेतृत्त्व, कामाची शैली यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पक्षात एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात अजित पवारांना यश मिळत होतं. २००४ साल येईपर्यन्त अजित पवारांच एक स्वतंत्र नेतृत्व निर्माण झालं होतं.. 

त्यामुळेच आत्ता राष्ट्रवादी पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून अजित पवारचं असतील अस बोललं जावू लागलं… 

मात्र इथेच शरद पवारांनी आपला डाव खेळला. जास्त संख्या असूनही महत्वाची खाती आपल्याकडे घेत मुख्यमंत्रीपद कॉंग्रेसला दिलं. उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवून या पदासाठी आर.आर. पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर अजित पवार यांना जलसंपदा मंत्री करण्यात आलं. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात सबकुछ शरद पवारचं हा मॅसेज देखील कार्यकर्त्यांपर्यन्त गेला.  

योगायोग म्हणजे त्यानंतर दोनच वर्षात सुप्रिया सुळेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली व सक्रिय राजकारणात दाखल झाल्या.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.