रुची सोयाची स्टोरी बघा आणि मग बाबा रामदेवपेक्षा भारी बिझनेसमॅन शोधून दाखवा

 “रुची सोया ही पतंजली आयुर्वेदची कुलवधू आहे. जेव्हा एखादी मुलगी एका नामांकित कुटुंबाचा भाग बनते, तेव्हा तिची ब्रँड इक्विटी आपोआप वाढते. रुची सोयाच्या बाबतीतही तेच झालं आहे.”

२०१७ मध्ये तब्बल बारा हजार कोटींचं कर्ज असलेल्या रुची सोया या कंपनीला २०१९ मध्ये विकत घेऊन फक्त दोनच वर्षात तिला प्रॉफीटमध्ये कसं आणलं या प्रश्नाला बाबा रामदेव यांचं उत्तर होतं. बाबांनी कंपनीच्या यशाचा मार्ग एवढ्या सोप्या शब्दात सांगितला आहे. फालतुचं लोकं ज्ञान पाजळतेत जसा की, बिझनेस करणं हे खायचं काम नाहीये. इथं रामदेव बाबांनी अच्छे सक्सेसफुल बिझनेसमन कैसे बने याचा  ‘रामबाण’ उपाय अगदी सोप्या शब्दात सांगितलंय.

पण आत थोडं मजाकच्या मूडमधून बाहेर येऊ.

ज्यांच्या शाळेत गेल्याचा साधा एक पुरावा सापडत नाही ज्यांना फक्त आपण श्वास अंदर ले…. और अब धीरेसे छोड दे एवढंच म्हणताना ऐकलंय त्या संन्यासी  बाबांनी जे मोठमोठ्या कॉलेजमधून डिग्री घेतलेल्या अगदी लहानपानपासून बिझनेसमन फॅमिलीत वाढलेल्या लोकांनाही जमणार नाही अशी करामत करून दाखवलेय.

आज पतंजली आयुर्वेद आणि रुची सोया यांची एकत्रितपणे २५,३०० कोटी रुपयांची कंपनी आहे, जी नेस्ले, ब्रिटानिया आणि डाबरपेक्षा मोठी आहे. FMCG सेक्टरमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आइटीसी नंतर आज बाबा रामदेवांच्या कंपन्यांचा नंबर येतो.

तर यात बाबा रामदेवांच्या एवढी मोठी झेप घेण्यामध्ये बाबांचं थोडं लक आहे, थोडं बाबांचे कनेक्शन आहेत आणि महत्वाचं म्हणजे यात बिझनेसमॅन पेक्षा जोरात चालणारं बाबांचं डोकं आणि त्यांचा चेला बाळकृष्ण याचाही रोल आहे. ते कसं  ते आता एक एक करून बघू.

तर सुरवात करू बाबांची रुची सोया ही कंपनी का न्यूजमध्ये आहे तिथून.

तर रुची सोया ही पतंजली उद्योगसमूहाची कंपनी सध्या तिचा एफपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

आता आइपीओ (IPO ) तुम्हला माहित असेल आणि एफपीओ (FPO) काय भानगड आहे हे जर विचार करत असाल तर ते एकदा पटकन सांगतो.

 तर IPO आणून एकदा कंपनीचं शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर पुन्हा कधी कंपनीला बाजारात शेअर्स आणायचे असतील तर ती FPO च्या माध्यमातून आणते. आणि यामुळेच बाबांची कामगिरी चर्चेत आली आहे.

तर आपण आपल्या मूळ मुद्यावर येऊ आणि बाबांनी रुचीला अवघ्या दोन वर्षात हजार कोटींची कंपनी कसं बनवलं ते बघू.

तर पाहिलं म्हणजे 

‘शुद्ध बँकिंग, दुसरं काही नाही’ अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या स्टेट बँकेनं बाबांवर दाखवलेला विश्वास

तर स्टोरीला सुरवात होते रुची सोया कंपनीच्या दिवाळखोरीत निघण्यापासून.रुची सरकारी बँकांना  १२१४६ कोटींची देणं लागत होती. मग कंपनीला बँकरप्टसी न्यायालयात उभं करण्यात आलं . तिथं दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीला दोन ऑप्शन असतात. एक तर कंपनी रिसॉल्व्ह केली जाते म्हणजेच कंपनी एका नव्या मालकाला विकली जाते. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे लिक्विडेट केली जाते ज्यामध्ये  कंपनीचे असेट्स एक एक करून विकले जातात.

रिसॉल्व्ह केल्यांनतर कर्जदारांना त्यांचे पैसे भेटण्याची अशा जास्त असते त्यामुळे ते हाच ऑप्शन निवडतात. आणि रुची सोयाच्या बाबतीत हाच ऑप्शन निवडण्यात आला.

आता १२,१४३ कोटींचं कर्ज असलेली कंपनी कोणी काय म्हणून घेइल. मग बँका कोणीतरी दिवाळखोरीतली कंपनी घेण्यासाठी पुढं यावं म्ह्णून काही उपाय करतात त्यातलाच एक असतो कर्जाचा बोजा कमी करण्याचा.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ९३३ कोटींचं कर्ज माफ करत १८१६ कोटींपैकी फक्त ८८३ कोटीच परत करण्याची ऑफर दिली. तर बाकीच्या पीएनबी, सीबीआय या बँकांनीही रुची सोयीची निम्म्याहून अधिक कर्जे माफ केली. 

लायबिलीटी मग निम्म्याहून कमी केल्यानंतर  NCLT ने रुची सोया विक्रीसाठी काढली. या सौद्यात शेवटी मग दोनच बोलीदार राहिले – पतंजली आणि अदानी विल्मर. सुरुवातीला बोली लावलेल्या अदानींनी माघार घेतली आणि बाबांच्या  पतंजलीनं रु. ४३५० कोटीची बोली लावत हि कंपनी विकत घेतली.

आता बाबांनी एवढे पैसे कसे जमा केले तर स्टेट बँक जीणं रुची सोयाचं ९३३ कोटींचं कर्ज माफ केलं होतं त्याच बँकेनं इतर बँकांबरोबर मिळून तीच रुची सोया घेण्यासाठी बाबा रामदेवांना ३२५० कोटींचं कर्ज दिलं.

म्हणजे बाबांना फक्त स्वतःच्या खिशातले १००० कोटीच ह्या डीलमध्ये टाकले.

आणि रुची सोया घेताना बँकांची बाबा रामदेव यांना डबल  मदत झाली एकदा कर्ज माफ झाल्याने आणि एकदा कर्ज दिल्याने.

बर रुचीची घौडदौड इथंच थांबली नाहीये. ..

शेअरबाजरात आधीच लिस्टेड असलेल्या  या कंपनीचे आता बाबा रामदेव यांच्या कंपनीकडे  जवळपास ९९% शेअर होते असं सांगण्यात येतं. आणि बाजारात फक्त १%. त्यामुळे डिमांड सप्लाय गॅप वाढला. त्यात बाबा कंपनीचा नफा पण दाखवत होते. त्यामुळे मग रुचीचा स्टॉक स्टॉक रु.३.५० पासून वाढायला लागला आणि  दोन वर्षांत तो पोहचला १०५३ रुपयांवर. रूची सोया ही कंपनी पतंजलीने डिसेंबर २०१९ मध्ये स्वतःचे केवळ १००० कोटी आणि बाकी बँकांच्या कर्जातून विकत घेतली होती तिचे आजचे मूल्य आहे  ३१९९० कोटी. आता तुम्हीच मोजा किती टक्क्यांनी वाढ झाली.

आता तुम्ही म्हणाल हे शेअर मार्केट, ipo, fpo  कसं  काय जमतं.

तर हा प्रश्न बाबांनापण विचारण्यात आला होता. आणि त्यावर बाबा रामदेव यांचा दावा आहे की मार्केट कसे चालते हे समजण्यासाठी त्यांना फक्त दोन तास लागले. त्यांनी रुची सोया विकत घेतल्यानंतर लगेचच, एका वरिष्ठ शेअर बाजार विश्लेषकाला त्यांनी त्यांच्या त्यांच्या हरिद्वारच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतले आणि त्याच्याकडूनच शेअर बाजाराचे १०१ नुक्से शिकले. बाबा सांगतात

“विश्लेषकाने मला मार्केट कॅपिटलायझेशन आणि मार्केट व्हॅल्यू कसे तयार केले जाते याबद्दल समजावून सांगितले. लिस्टेड कंपनी चालवताना मला तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात – गुंतवणुकीवर परतावा, कर्ज आणि झिरो वर्किंग कॅपिटल. त्यानंतर मग मी त्याला रुची सोया कर्जमुक्त करण्याच्या आणि माझ्या भागधारकांना जास्तीत जास्त RoI (गुंतवणुकीवर परतावा) देण्याच्या माझ्या योजनेबद्दल सांगितलं आणि त्याला सुचायचंच बंद झालं. त्यानंतर त्याने मला विचारले की मी झिरो वर्किंग कॅपिटल कसं करणार.

मी त्याला म्हणालो –

 उधार में पैसे लो और नागद में बेचो (पैसे उधार घ्या आणि रोखीने विकले) तुमचे वर्किंग कॅपिटल झिरो होते”

आता  या झाल्या बाबांच्या हवेतल्या गप्पा, पण शेअर बाजारात आल्यानंतर अशा मोठ्या गप्पा मारून चालणार नाहीयेत त्यांना काय आहे ते क्वार्टर टू क्वार्टर परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे.

आणि बाबांच्या या मोठ्या दाव्यांना सध्यातरी मार्केट विश्लेषक सिरिअसली घेण्यास तयार नाहीयेत. 

त्यांना रुची सोयाची यशोगाथा पचण्यास अजून तरी जड जातेय. त्यात पतंजली आयुर्वेदची झपाट्यानं झालेली वाढ आणि त्यानंतरची तेवढ्याच झपाट्याने झालेली घसरण अजूनच शंका निर्माण करते. पतंजलीने २०१७ मध्ये १०,००० कोटी रुपयांच्या महसुलाल जमा केल्यानंतर, वर्षभरातच तो ८५०० कोटी रुपयांवर घसरला होता. कंपनीचे प्रवर्तक नोटाबंदी, जीएसटी आणि कमकुवत वितरण प्रणाली यामुळे घसरण झाली असं म्हणत असले तरी पतंजली आयुर्वेदमध्ये कॉर्पोरेट प्रशासन आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याची विश्लेषकांची धारणा आहे. कंपनीच्या क्वालिटी स्टॅंडर्डमध्ये सतत गडबड दिसून येत असल्याने हा अविश्वास अजूनच वाढतो.

पण एवढं सगळं असूनही बँका असू दे की इन्वेस्टर्स हे रामदेव बाबांच्या रुचीवर पैसे लावण्यास तयार आहेत.

त्यामुळं पिक्चर अभी बाकी आहे म्हणत स्टोरी पुढे नेऊ …

टेक सॅव्ही बाबा 

आचार्य बाळकृष्ण जे बाबांचे राइट हॅन्ड म्हणून ओळखले जातात त्यांचा पण ब्रँड बनवण्याच्या मागं मोठा हात  आहे. जे आचार्य बाळकृष्ण क्वचितच लॅपटॉप वापरतात त्यांचा दावा आहे की त्यांनी टेक्नॉलिजीबद्दल टेक सल्लागारांकडून  ऐकूनच शिकले आहेत.  ते सांगतात

” यातून मी शिकलो पण मला हे देखील जाणवले की यांच्या उपायांनी माझा उद्देश साध्य होणार नाही”

मग मार्च २०२० मध्ये, पतंजली आयुर्वेदने  डायरेक्ट त्यांचे भरुवा सोल्यूशन्स टेक स्टार्ट-अप लॉन्च केले. 

सध्या भरुवा सोल्युशन्स पंजाब नॅशनल बँकेसोबत भागीदारी करून एक फिनटेक सोल्यूशनची चाचणी करत आहे. ज्यामध्ये रुची सोयीच्या वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना कर्ज देण्या सोपं होईल. त्यांच्या या सिस्टिममुळे बँका रिअल टाइममध्ये व्यवसायाच्या स्तिथीवर  लक्ष ठेवू शकतात. किरकोळ विक्रेता किंवा वितरकाकडे किती स्टॉक किंवा इन्व्हेंटरी आहे ते ते ठरवू शकतात हे त्यांना रिअल टाइममध्ये कळेल.

मात्र आयुर्वेद वैद्यांची तांत्रिक उपायांची भूक इथंच संपत नाही. त्यांना रु. २० -कोटीची भरुवा सोल्यूशन्स FY22 अखेरीस रु. १०० कोटी कमाईकडे न्यायची आहे. 

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा स्वतः या व्यवसायात लक्ष घालून आहेत.

रामदेव यांनी दावा केला आहे की त्यांनी देशभर फिरून प्रत्येक वितरकाला भेटून त्यांचे मनोबल उंचावले आहे.

“मी त्यांना सांगितले की आपण एक कुटुंब आहोत आणि तुम्ही सर्व व्यवसायाचे मालक आहात. रुची सोयाचे पूर्वीचे मालक त्यांच्या वितरकांना कधीच भेटले नव्हते. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत फोटोही काढले.  यामुळं मी २४०० नवीन वितरक आणू शकलो आहे”

बाबांच्या आणखी काही स्मार्ट मूव्ह

  • रुची सोया विकत घेतल्यानंतर रामदेव यांचे पहिले पाऊल होते कंपनीत प्रोफेशनल मॅनेजमेंट आणणे. उदाहरणच द्यायचे तर त्यांनी रिलायन्स रिटेल आणि कारगिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अस्थाना यांना CEO म्हणून नियुक्त केलं आणि संजीव खन्ना, ज्यांनी यापूर्वी ITC, मेट्रो कॅश अँड कॅरी आणि बिगबास्केटमध्ये काम केले होते, त्यांना COO म्हणून आणलंय.
  • रामदेव म्हणतात की त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये जबाबदारी फिक्स केली आहे. रामदेव सांगतात  “अधिग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्लांटमध्ये क्वालिटी कंट्रोल मॅनेजर नव्हते. मग आमचा पहिला निर्णय होता सर्व ठिकाणी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर नियुक्त करणं. त्यांचे युनिट फायदेशीर आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी आम्ही वैयक्तिक प्लांट व्यवस्थापकांना जबाबदारी दिली आहे. जेणे करून आम्ही त्यांना पूर्णपणे जबाबदार केले आहे. त्यामुळे आमचा आज कोणताही प्लांट बंद किंवा तोट्यात नाहीये.”
  • सध्या रुची सोयाचा खप कमोडिटी प्रॉडक्ट मध्ये जास्त आहे मात्र या सेक्शनमध्ये मार्जिन कमी आहे. पण रामदेव बाबांनी हे बरोबर ओळखलंय. त्यानुसार मग त्यांनी ब्रॅण्डला प्रीमियम वस्तूंच्या प्रोडक्शनकडे नेण्यासाठी बरोबर व्हिजन तरी बरोबर आखल्याचं विश्लेषक सांगतात.
  • बाबा रामदेव हे पूर्ण होमवर्क करून, पतंजलीच्या चुका सुधारत पुन्हा fmcg मार्केटमध्ये उतरले आहेत. उदाहरणार्थ रुची सोया विकत घेताना रामदेव यांनी बघितलं होतं की कंपनीचे सगळे प्लांट चालू स्तिथीत आहेत. एनसीएलटी प्रक्रियेदरम्यानही रुची सोया प्लांट चालू ठेवण्यात आले होते. तेल प्लांटकार्यक्षम न ठेवल्यास, ते गंजतात आणि कामाचे उरत नाहीत.

आणि या सगळ्याबरोबरच अजून एक महत्वाची गोष्ट पतंजलीकडे आहे म्हणजे

स्वतः भगवाधारी रामदेव बाबा ..

आपल्या अनुयायांना भगवे वस्त्र परिधान करुण योगाचे धडे,आयुर्वेदिक औषधांचे सल्ले देणाऱ्या बाबांना संत मानणारा एक वर्ग आहे. आता तर रामदेव यांनी आपल्या ब्रॅण्डला स्वदेशीचा शिक्का पण लावलाय. भारतातील टियर III/IV मार्केटमध्ये लाखो लोकांनी जवळजवळ पूजलेला हा  माणूस आहे. पतंजलीच्या सर्व उत्पादनांच्या पॅकवर रामदेव बाबांचा फोटो असतो आणि या बाजारपेठेतील ग्राहक फक्त रामदेव यांच्यामुळे पतंजली उत्पादने खरेदी करतो.

त्यामुळे अब्जोधीश झालेल्या बाबांची चिकाटी आणि कॉन्फिडन्स रूची सोया ब्रँडला इथपर्यंत घेऊन आलाय हे ही तितकंच खरं आहे. त्यामुळे आम्हला फक्त धावायचं कळतं चालायचं नाही असं म्हणणाऱ्या रामदेव बाबांची ही वाटचाल बघण्यासारखी असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.